साध्वी प्रज्ञा सिंह, मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी, भाजपकडून भोपाळ लोकसभा लढवणार

साध्वी प्रज्ञा, मालेगाव, भोपाळ, भाजप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

साध्वी प्रज्ञा

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपकडून भोपाळमध्ये उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भोपाळ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, जिथून काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह रिंगणात आहेत.

दिग्विजय सिंह यांना टक्कर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि शिवराजसिंह चौहान यांच्यापैकी एकाला मैदानात उतरवणार असल्याची चर्चा झाली. मात्र झाशीच्या खासदार असलेल्या उमा भारती निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नाहीत.

साध्वी प्रज्ञा या भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांना भेटल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा सुरू झाली. साध्वी प्रज्ञा यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याचीही चर्चा होती.

भोपाळमधून उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्या म्हणाल्या, "मी भाजपमध्ये औपचारिक प्रवेश केला आहे. मी निवडणूक लढवेन आणि जिंकेनही. ही माझ्यासाठी कठीण गोष्ट नाही."

भाजपने लोकसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची 22वी यादी जाहीर केली. यामध्ये मध्य प्रदेशच्या चार जागांचा समावेश आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या विदिशा मतदारसंघातून रमाकांत भार्गव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुना येथून के.पी. यादव तर सागर मतदारसंघातून राजबहादूर सिंग यांना तिकीट देण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

मालेगाव येथे 2008 मध्ये बाँबस्फोट झाला होता.

साध्वी प्रज्ञा यांचा जन्म मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील कछवाहा गावात झाला होता. त्यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. उजव्या विचारसरणीचा प्रभाव असणाऱ्या प्रज्ञा या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सक्रिय सदस्य होत्या.

प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध प्रज्ञा या 'अभिनव भारत' आणि 'दुर्गा वाहिनी' या हिंदुत्ववादी संघटनांशी संलग्न आहेत.

2008 साली झालेल्या मालेगाव बाँबस्फोटातील आरोपींमध्ये त्यांचं नाव पुढे आलं होतं. या बाँबस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होते तर शंभरहून अधिकजण जखमी झाले होते.

NIA कोर्टाने 2016 मध्ये साध्वीसह अन्य आरोपींना मोक्का या दहशतवादविरोधी कायद्याखालील आरोपांमधून मु्क्त केलं होतं. मात्र त्यांच्यावरील बेकायदेशीर कारवाईंमध्ये सहभागी झाल्याच्या आरोपांखाली UAPA कायद्याअंतर्गत गुन्हे कायम राहणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोर्टाने त्यांच्यावर या कायद्याअंतर्गत आरोप निश्चित केले होते. त्यानुसार खटला सुरू आहे. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)