लोकसभा निवडणूक 2019: सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाणांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार

लोकसभा निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान आज होणार असून, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

11 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं.

बुधवारी दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या ठिकाणी मतदान होत आहे.

फोटो कॅप्शन,

मतदान नक्की कुठे

महाराष्ट्रासह देशात 97 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. बुधवारी आसाम (5), बिहार (5), छत्तीसगढ (3), जम्मू काश्मीर (2), कर्नाटक (14), मणिपूर (1), ओडिशा (5), पुद्दुचेरी (1), त्रिपुरा (1), उत्तर प्रदेश (8), पश्चिम बंगाल(3) यांच्यासह तामिळनाडूतील सर्वच्या सर्व 39 जागांसाठी मतदान होत आहे.

बुलडाण्याचा गड शिवसेना राखणार?

बुलडाणा-गेल्या 20 वर्षात हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे अशी प्रामुख्याने लढत आहे. शिंगणे प्रतापरावांची विजयाची हॅट्ट्रिक रोखणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

2009 मध्ये या दोघांमध्ये झालेल्या लढतीत प्रतापराव जाधवांनी बाजी मारली होती. दहा वर्षांनंतर या दोघांमध्येच चुरस पाहायला मिळत आहे.

काँग्रेसच्या वासनिक कुटुंबीयांनी दहा वर्षं मतदारासंघावर कब्जा राखला होता. 1989च्या निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेनं बुलडाण्यात पाय रोवायला सुरुवात केली.

प्रतापरावांना प्रस्थापितविरोधी लाटेचा फटका बसू शकतो. दुसरीकडे राजेंद्र शिंगणे यांचे वडील भास्करराव शिंगणे यांनी बुलडाण्यात सहकाराची मुहुर्तमेढ रोवली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीत सामील झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी दिली आहे.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यातील 2 मतदारसंघ भाजप, 2 शिवसेना तर 2 मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत.

अकोल्यात प्रकाश आंबेडकर वर्चस्व गाजवणार का?

अकोल्यात भाजपच्या संजय धोत्रे यांच्यासमोर काँग्रेस हिदायत पटेलांचं आव्हान आहे. या दोघांच्या बरोबरीने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे इथून लढत आहेत.

अमरावतीत अडसूळ वि. राणा

अमरावती मतदारसंघात विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात महाआघाडीकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अडसूळ हे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री होते. नवनीत राणा या तेलुगू चित्रपट अभिनेत्री आहेत.

अमरावती लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी धामणगाव रेल्वे आणि मोर्शी, हे दोन विधानसभा मतदार संघ वर्धा जिल्ह्याशी जोडले गेले आहेत. तर बडनेरा, अमरावती, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर, तिवसा या मतदारसंघाचा समावेश अमरावती लोकसभा मतदार संघात आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. राखीव मतदार संघ होऊन 10 वर्ष पूर्ण झालीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत अमरावती राष्ट्रवादी काँग्रेस साठी सोडण्यात आलंय.

फोटो कॅप्शन,

नवनीत राणा

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. त्यांना 3 लाख 29 हजार 280 मते मिळाली होती. 1 लाख 36 हजाराच्या फरकाने नवनीत राणा यांचा पराभव करत आनंदराव अडसूळ लोकसभेत पोहचले. आनंद अडसूळ यांना 4 लाख 67 हजार 212 मते मिळाली होती.

अमरावती लोकसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्यानंतर तब्बल 7 टर्म अमरावती लोकसभा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र 25 वर्षांपासून या मतदार संघात शिवसेनेने आपले पाय बऱ्यापैकी रोवले आहे. गेली दोन टर्म शिवसेनेचे आनंदराव अडसूळ लोकसभा खासदार आहेत.

नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत. पक्षाचं चिन्ह मागे नसल्याचा फटका राणा यांना बसू शकतो.

हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात लढत आहे. वंचित आघाडीचे मोहन राठोड शर्यतीत आहेत.

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचं भवितव्य पणाला

नांदेडमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं भवितव्य पणाला लागलं आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी 'अशोकपर्व' नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज देऊन त्याचा खर्च निवडणूक खर्चात न दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. त्याचप्रमाणे कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याप्रकरणी घोटाळ्यात अशोक चव्हाणांचं नाव अडकलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अशोक चव्हाण

नांदेड येथे विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोनच खासदार महाराष्ट्रातून निवडून आले. तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेही काँग्रेसला या पडझडीतून वाचवू शकले नाहीत. तेव्हा अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून चव्हाणांची जिल्ह्यावर पकड आहे. चव्हाणांसमोर शिवसेनेच्या प्रताप पाटील चिखलीकर उभे आहेत.

परभणीत बंडू बॉस विरुद्ध राजेशदादा लढत

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी मतदारसंघात शिवसेनेने संजय उर्फ बंडू जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्याच्याविरोधात राष्ट्रवादीने राजेश विटेकर यांना मैदानात उतरवलं आहे. शिवसेना बालेकिल्ला राखणार की राष्ट्रवादी झेंडा फडकवणार याकडे राज्याचं लक्ष आहे.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव आणि राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर

परभणी मतदारसंघात परभणी जिल्ह्यातले 4 विधानसभा मतदार संघ आहेत तर जालना जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी हे जालना जिल्ह्यातले मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात आहेत. तर परतूर आणि घनसावंगी या जालना जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघाचा समावेश परभणी लोकसभा मतदारसंघात होतो.

बीडचा गड मुंडे कुटुंबीय राखणार का?

बीडमध्ये प्रीतम मुंडे, बजरंग सोनवणे आणि विष्णू जाधव यांच्यात लढत आहे.

2009 साली बीड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना भाजपाचे लोकसभेतील उपनेते होण्याची संधी मिळाली होती.

2014 साली झालेल्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे मोठ्या फरकाने विजयी झाले होते. या निवडणुकीमध्ये त्यांना 6 लाख 35 हजार 995 मते मिळाली होती. मात्र केंद्रामध्ये नवे सरकार आल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांचं अपघाती निधन झालं.

फोटो स्रोत, PAnkaja munde

फोटो कॅप्शन,

पंकजा आणि प्रीतम मुंडे

2014 साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना भाजपाची उमेदवारी मिळाली. प्रीतम यांना 9 लाख 22 हजार 416 मते मिळाली आणि त्यांनी एक विक्रमच प्रस्थापित केला.

प्रीतम यांच्याविरोधात लोकसभेत अनुपस्थिती आणि खासदार निधीचा पूर्ण वापर न केल्याचा मुद्दा आता विरोधकांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये उमेदवारी दिलेले बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष आहेत. सोनवणे आणि त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत.

बीड जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत अजेंड्यावर असतो. यंदाही तो मुद्दा आहेच.

उस्मानाबादेत नव्या मानकऱ्यांमध्ये मुकाबला

उस्मानाबादमध्ये शिवसेनेकडून उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर त्यांचं नाव देशभर चर्चेत आलं होतं. त्यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे राणा जगजीत सिंह पाटील यांचं आव्हान आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 2004 पर्यंत राखीव होता. 2009मध्ये तेथून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील निवडून आले होते. त्यानंतर 2014मध्ये शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी तेथून विजय मिळवला होता.

लातूरमध्ये विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना मात्र भाजपनं तिकीट नाकारलं आहे. त्यांच्याऐवजी भाजपनं लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. काँग्रेसतर्फे मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लातूरमध्ये सुधाकर श्रृंगारेंसमोर मच्छिंद्र कामतांचं आव्हान

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

लातूर जिल्ह्यातील सुधाकर शृंगारे कंत्राटदार आहेत. त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालं आहे. त्यानंतर त्यांनी बीएससीचं शिक्षण मध्येच सोडून ते मुंबईला गेले. काही कालावधीनंतर त्यांनी लातूरला परत येत कंत्राटदारीचा व्यवसाय सुरू केला.

2016मध्ये लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते वडवळ नागनाथ गटातून भाजपकडून निवडून आले. यानंतर त्यांनी जिल्ह्यातील संपर्क वाढवत विविध कार्यक्रमांना हजेरी लावत संपर्क वाढवला.

लातूरमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर, अहमदपूर, नांदेड जिल्ह्यातील लोहा यांचा समावेश होतो.

1980 ते 1999 पर्यंत काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर लातूरमधून लोकसभेवर निवडून आले. 2004मध्ये लातूरचे सध्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या आई रूपाताई पाटील निलंगेकर भाजपकडून निवडून आल्या. 2009मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर विलासराव देशमुख यांनी तेथून काँग्रेसच्या जयवंत आवळे यांना निवडून आणलं. त्यानंतर 2014मध्ये भाजपचे सुनील गायकवाड यांनी बाजी मारली. ते जवळपास 2 लाख इतक्या मताधिक्यानं निवडून आले होते.

सोलापुरात जयसिद्धेश्वर स्वामी आणि सुशीलकुमार शिंदे समोरासमोर

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्या जागी जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे रिंगणात आहेत.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी लिंगायत समाजाचे धर्मगुरू आहेत. त्यांना भाजपमधून काही गटांचा पाठिंबा होता. शिवाय विद्यमान खासदार बनसोडे यांच्या विरोधात नाराजी असल्याची चर्चा होती, त्यातून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी मिळाली आहे. सोलापुरात लिंगायत समाजाची मतं कळीची ठरणार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सुशीलकुमार शिंदे सोलापुरातून नशीब आजमावत आहेत.

सुशीलकुमार शिंदे यांची राजकीय कारकीर्द समृद्ध आहे. सहावेळा ते आमदार म्हणून निवडले गेले, त्यानंतर खासदार, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय ऊर्जामंत्री, गृहमंत्री, राज्यपाल अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलं आहे.

या दोघांच्या बरोबरीने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर रिंगणात असल्याने सोलापुरातील निवडणूक रंगतदार होणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)