राज ठाकरे म्हणतात... नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून सर्वाधिक सैनिक शहीद झाले : #पाचमोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images/AFP
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :
1) मोदी सरकार आल्यापासून सर्वाधिक सैनिक शहीद झाले - राज ठाकरे
आज नरेंद्र मोदींच्या हाती सत्ता आहे, मग देशावर दहशतवादी हल्ले कसे होतात? दहशतवादी देशात घुसतात कुठून? तुमच्या हातात पूर्ण सत्ता आहे, मग पुलवामा हल्ला झालाच कसा, असे प्रश्न राज ठाकरे यांनी साताऱ्यातल्या एका सभेत विचारला. नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून सर्वाधिक सैनिक शहीद झाले, असंही ते म्हणाले. ABP माझानं ही बातमी दिली आहे.
एका मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणाले की शेतकरी आत्महत्या हा जर निवडणुकांचा मुद्दा होऊ शकतो तर शहीद जवान का होऊ शकत नाही. मोदींच्या याच वक्तव्यांचा आधार घेत पुलवामा ठरवून घडवलं गेलं का? आमचे 40 मारले की काय? असा संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला.
काश्मीरमध्ये चेक पोस्ट मोडून घुसणाऱ्याला भारतीय सैनिकांनी गोळी मारली होती. त्यावेळी मोदींनी सैनिकांना माफी मागायला लावली आणि त्यांच्यावर केसेस टाकल्या होत्या. अशा प्रकारे नरेंद्र मोदींनी सैनिकांचं मनोबल खच्चीकरण केल्याचं ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे निवडणूक लढवणार नसले तरी ते अन्यायाविरुद्ध लढणार असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
2) मोदींना हरवण्यासाठी मु्स्लीम देशातून येतो आहे पैसा - बाबा रामदेव
पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी मुस्लीम देशांमधून कोट्यवधी रुपये येत आहेत, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. News18 लोकमतनं ही बातमी दिली आहे. 'भारत देशात आणि देशाबाहेरही राष्ट्रविरोधी शक्तींच्या कारवाया सुरू आहेत. ख्रिश्चनधर्मीय आणि मुस्लीम देशांमधून हा पैसा येतो आहे. मोदींनी सत्तेत येऊ नये यासाठीच्या कारवायांसाठी कोट्यवधी रुपयांचा पैसा पुरवला जात आहे', असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
त्यामुळं लोकांनी भाजपला मतदान करावं, असं आवाहन बाबा रामदेव यांनी केल्याचंही या बातमीत म्हटलं आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी गेले अनेक दिवस मौन पाळलं होतं
3) उत्तर भारताला वादळाचा तडाखा, 50 ठार
राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात धुळीचे वादळ आणि वीज कोसळून 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
राजस्थानात 21, मध्यप्रदेशात 15, गुजरातमध्ये 10 जणांना जीव गमवावा लागला आहे. या संकटात सापडेल्यांना सर्व प्रकारची मदत देण्याचा केद्र सरकार प्रयत्न करत आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पाऊस आणि वादळाचा फटका बसलेल्या भागांतील परिस्थितीवर सरकारचे बारकाईने लक्ष असून, या राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असे म्हटले.
नैसर्गिक दुर्घटनांत मरण पावलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये निधी पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीतून मंजूर करण्यात आला आहे, असंही पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे.
5) नक्षलग्रस्त भागात आदिवासी मुलीनं सुरू केलं पहिलं मेडिकल स्टोर
छत्तीसगडमधल्या अबुजमड या जंगली भागात 23 वर्षांच्या किर्ता डोर्पा या आदिवासी मुलीनं पहिलं मेडिकलं स्टोर सुरू केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
मुरिया जमातीतल्या या मुलीनं नारायणपूर जिल्ह्यातल्या ओर्चा या ठिकाणी मेडिकल स्टोर सुरु केलं आहे. हा दाट जंगलानं वेढला आहे. तसंच नक्षलवाद्यांचा हा बालेकिल्ला मानला जातो.
याआधी तिथं सरकारचं जन औषधी केंद्र होतं. पण सुरक्षेच्या कारणांवरून ते बंद करण्यात आलं होतं.
"आदिवासी लोकांच्या गरजेची जवळजवळ सर्व औषधे इथ उपलब्ध आहेत," असं किर्ता यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं.
5) 15 दिवसाच्या बाळाला वाचवण्यासाठी 400 किमी प्रवास फक्त साडेपाच तासात
केरळमध्ये 15 दिवसाच्या मुलावर ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी अँबुलन्सनं साडेपाच तासात 400 किमी अंतर पूर्ण केलं. राज्य सरकार आणि लोकांच्या मदतीनं ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आला होता. द इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिली आहे.
मुख्यमंत्री पिनराई विजयनं यांनी फेसबुकवरून लोकांना सहकार्याचं आवाहन केलं होतं.

फाईल फोटो
अँब्युलन्सने फक्त एकाच ठिकाणी इंधन भरण्यासाठी थांबा घेतला होता. सरकारनं या शस्त्रक्रियेचा खर्च करणार असल्याचं सांगितलं. आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)