IPL 2019: धोनी नसण्याचा चेन्नईला फटका, हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पराभव

महेंद्रसिंह धोनी

चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबादच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या ऐवजी सुरेश रैना नाणेफेकीसाठी मैदानात आला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

फिट नसल्यामुळे धोनी हा सामना खेळणार नसल्याचं समजल्यावर सलग तीन पराभवांमुळे हैराण झालेल्या सनरायजर्सचा कर्णधार केन विल्यमसनचा चेहराच खुलला. धोनीच्या अनुपस्थितीचा पुरेपूर फायदा घेत जेव्हा हैदराबादनं सहा विकेट्सनी हा सामना जिंकला तेव्हा तर विल्यमसनचे पाय जमिनीवर ठरत नव्हते.

हैदराबाद समोर विजयासाठी 133 धावांचं आव्हान होतं. सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या 50 आणि जॉनी बेअरस्टोच्या नाबाद 55 धावांच्या मदतीनं हैदराबादनं विजयाचं लक्ष्य 16.5 ओव्हर्समध्ये चार विकेट्स गमावून गाठलं.

त्यापूर्वी हैदराबादच्या सलामीच्या जोडीनं केवळ 5.4 ओव्हर्समध्येच 66 धावांची भागीदारी करत विजयाचा मार्ग सोपा केला होता. डेव्हिड वॉर्नरनं 25 चेंडूंमध्येच अर्धशतक साजरं केलं, तर बेअरस्टोनं केवळ 44 चेंडूंमध्ये 61 धावा काढल्या.

पहिल्यांदा बॅटिंगचा फसलेला निर्णय

नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईचा कर्णधार सुरेश रैनानं पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्वांनाच बुचकळ्यात पाडणारा होता.

यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्याच कर्णधारानं इतका धाडसी निर्णय घेतला नसावा. रैनाचा हा आत्मविश्वास हैदराबादच्या गोलंदाजांनी फोल ठरवला.

चेन्नईच्या सलामीच्या जोडीनं काहीशी बरी कामगिरी केली. सलामीवीर शेन वॉटसनच्या 31 आणि फाफ डू प्लेसीच्या 45 धावांच्या जोरावर चेन्नईनं 20 ओव्हर्समध्ये 132 धावा केल्या.

अंबाती रायडूनंही नाबाद 25 धावा केल्या. नाहीतर चेन्नईची अवस्था अजूनच खराब झाली असती.

लेग स्पिनर राशिद खाननं चेन्नईच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. त्यानं चार ओव्हर्समध्ये 17 धावा देत दोन विकेट्स घेतल्या.

विजय शंकर, शाहबाज नदीम आणि खलील अहमद यांनीही प्रत्येकी एक विकेट घेत हैदराबादच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

धोनीची उणीव जाणवली

महेंद्र सिंह धोनीच्या न खेळण्यामुळे चेन्नईचा पराभव झाला का? खरं तर एका खेळाडूच्या जोरावर तर कोणताही संघ मैदानात उतरत नाही. पण धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईनं ज्या पद्धतीनं सपशेल शरणागती पत्करली, ते पाहता हा संघ धोनीवरच अवलंबून असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. क्रिकेट समीक्षक अयाज मेमन यांनीही हीच बाब अधोरेखित केली.

महेंद्र सिंह धोनी चेन्नईचा केवळ कर्णधार नाहीये तर गुणवान खेळाडूही आहे. त्याच्या नसण्यामुळं हैदराबादचं मनोबल आधीपासूनच वाढलं. महत्त्वाचं म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीतही शांत राहून संघाला विजय मिळवून देणं हा कर्णधारामध्ये असलेला गुण त्याच्यात आहे. सुरेश रैनामध्ये याचाच अभाव दिसला.

धोनीच्या नसण्यामुळं आत्मविश्वासानं मैदानात उतरलेल्या हैदराबादसमोर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय सुरेश रैनानं का घेतला असावा, हाही प्रश्नच आहे.

त्याचं उत्तर देताना अयाज मेमन सांगतात, की हा निर्णय मलाही बुचकळ्यात टाकणारा होता. नाणेफेक जिंकल्यावर काय निवडायचं याबद्दल कोच आणि धोनीसोबत चर्चा झाली होती का?

कधीकधी अतिआत्मविश्वास दाखविण्यापेक्षा शहाणपणानं निर्णय घेणं गरजेचं असतं, असंही अयाज मेमन यांनी म्हटलं.

चेन्नई अगदी कमी स्कोअर असतानाही जिंकत होती. हा धोनीचाच करिष्मा होता.

अर्थात, धोनी अनुभवी आहे आणि स्वतः उत्तम फलंदाज तसंच विकेटकीपर आहे. या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असल्याचं अयाज मेमन सांगतात.

खेळ समजून घेण्याची क्षमता

एक कर्णधार म्हणून खेळ समजून घेण्याची धोनीची क्षमता अफाट आहे. त्याच्याच जोरावर तो बॉलिंगमध्ये हुशारीनं बदल करत समोरच्या फलंदाजाला कायम दबावात ठेवतो.

धोनीनं भारतासाठी खेळतानाच तो किती सक्षम कर्णधार आहे, हे दाखवून दिलंय. त्यामुळं नेहमीच तो दुसऱ्या कर्णधारापेक्षा एक पाऊल पुढचा विचार करतो. रैनामध्ये हा गुण नाही दिसून आला.

अयाज मेमन यांनी जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नरच्या तुफानी बॅटिंगबद्दल बोलताना म्हटलं, की हैदराबादला आतापर्यंत जे विजय मिळाले आहेत, त्यामध्ये या दोघांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे.

वॉनर आणि बेअरस्टो सोडले तर हैदराबादच्या कोणत्याच फलंदाजानं चमकदार कामगिरी केलेली नाहीये. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनचाही खेळ या मॅचमध्ये फारसा खास झाला नाही.

हैदराबादची बॉलिंग मात्र चांगली आहे. टी-20 प्रकाराचा विचार करता राशिद खान हा जगातील सर्वांत उत्तम लेग स्पिनर्सपैकी एक आहे.

अयाज मेमन म्हणतात, "वॉर्नर आणि बेअरस्टोखेरीज इतर फलंदाजांनीही आपल्या कामगिरीत सुधारणा करणं गरजेचं आहे. कारण जर 'लॉ ऑफ अॅव्हरेज' लागू केला तर असाही दिवस असेल जेव्हा या दोघांच्या बॅटमधून धावा निघणार नाहीत."

हैदराबादविरुद्धचा सामना गमावला तरी चेन्नई सुपर किंग्जनं 9 पैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवलाय तर दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. 14 पॉइंट्स सह चेन्नईचा संघ अव्वल क्रमांकावर आहे.

सनरायजर्स हैदराबादचा विचार केला तर चार विजय आणि चार पराभवांसह 8 पॉइंट्स मिळवून हा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)