साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आजही आरोपी: भोपाळ लोकसभा निवडणूक

प्रज्ञा सिंह ठाकूर

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन,

प्रज्ञा सिंह ठाकूर

भोपाळमधून काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्याविरोधात भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना रिंगणात उतरवलं आहे.

साध्वी प्रज्ञा यांचं संपूर्ण नाव प्रज्ञा सिंह ठाकूर आहे. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातल्या कछवाहा गावात त्यांचा जन्म झाला. 2008मध्ये मालेगावमधल्या बॉम्बस्फोट प्रकरणानंतर त्यांचं नाव चर्चेत आलं.

तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह या दोघांनी मला चुकीच्या आरोपा अंतर्गत फसवलं, असा आरोप त्यांनी बीबीसीशी बोलताना केला आहे.

याच प्रकरणात त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत.

मालेगाव स्फोट प्रकरण

29 सप्टेंबर 2008च्या रात्री 9.35ची वेळ. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये अंजुमन चौक आणि भीकू चौक यांच्यामधील शकील गुड्स ट्रान्सपोर्टसमोर एक स्फोट झाला होता. यात 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 101 जण जखमी झाले होते.

या स्फोटासाठी एका मोटारसायकलचा वापर करण्यात आला होता. NIAच्या अहवालानुसार, या मोटारसायकलची नोंदणी प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर होती.

महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाची चौकशी केली आणि या मोटारसायकलीचे संबंध सुरत आणि प्रज्ञा ठाकूर यांच्याशी असल्याचं लक्षात आलं होतं.

फोटो स्रोत, SHURIAH NIAZI/BBC

फोटो कॅप्शन,

साध्वी प्रज्ञा

प्रज्ञा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्य होत्या. पोलिसांनी या प्रकरणाची नाशिक, पुणे आणि भोपाळध्ये चौकशी केली. याप्रकरणी लष्कराचे अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित आणि सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांना अटक करण्यात आली होती.

पुढे चालून या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटना 'अभिनव भारत'चं नाव समोर आलं आणि सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पांडेय यांचंही नाव समोर आलं.

मोटारसायकल आणि प्रज्ञा यांचं कनेक्शन

ATS चार्जशीटनुसार, प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात सर्वांत मोठा पुरावा मोटारसायकल त्यांच्या नावावर असणं, हा होता.

यानंतर प्रज्ञा यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का किंवा MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली. चार्जशीटनुसार, चौकशी अधिकाऱ्यांना मेजर रमेश उपाध्याय आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यामधील एक संभाषण मिळालं, ज्यामध्ये मालेगाव स्फोटातील प्रज्ञा यांच्या भूमिकेविषयी उल्लेख होता.

फोटो स्रोत, Reuters

या प्रकरणाची चौकशी सुरुवातीला ATSनं केली, नंतर हे प्रकरण NIAकडे सोपवण्यात आलं. NIAच्या चार्जशीटमध्ये प्रज्ञा यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं.

या प्रकरणी सर्वांत अगोदर 2009 आणि 2011मध्ये ATSनं स्पेशल मोक्का कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये 14 आरोपींच्या नावाचा समावेश होता. NIAनं 2016मध्ये अंतिम अहवाल सादर केला, तेव्हा त्यात 10 आरोपींची नावं होती.

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन,

कर्नल पुरोहित

या चार्जशीटमध्ये प्रज्ञा सिंह यांना दोषमुक्त ठरवण्यात आलं होतं. त्यांच्यावरील मोक्का हटवण्यात आला आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर करकरे यांनी केलेली कारवाई सुसंगत नव्हती, असं सांगण्यात आलं.

ज्या मोटारसायकलचा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आला होता, ती प्रज्ञा यांच्या नावावर होती. पण मालेगाव हल्ल्याच्या दोन वर्षांपूर्वी रामजी कलसांगरा नावाची एक व्यक्ती तिचा वापर करत होती, असं सांगण्यात आलं. या प्रकरणात कलसांगरा या इंदूरच्या एका व्यापाऱ्यालाही अटक करण्यात आली होती.

चिदंबरम, दिग्विजय यांच्यावर आरोप

या चार्जशीट नंतर NIA कोर्टानं प्रज्ञा सिंह यांना जामीन दिला, पण त्यांना दोषमुक्त केलं नाही. डिसेंबर 2017मध्ये NIA कोर्टानं आदेशात म्हटलं की, प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यावर Unlawful Activities Prevention Act (UAPA ) अंतर्गत खटला सुरूच राहील.

याच आदेशात प्रज्ञा आणि पुरोहित यांच्यावरील मोक्का हटवण्यात आला.

फोटो स्रोत, TWITTER @DIGVIJAYA_28

फोटो कॅप्शन,

दिग्विजय सिंग

प्रज्ञा आणि पुरोहित यांच्यासहित 7 जणांविरोधात आजही UAPAच्या कलम 16 आणि 18, IPCच्या कलम 120 B (गुन्ह्याचा खट), 302 (खून), 307 (खूनाचा प्रयत्न) आणि 326 (ठरावीक उद्देशान नुकसान पोहोचवणं) या कलमांतर्गत खटला सुरू आहे.

समझोता स्फोटातील आरोपीच्या हत्येप्रकरणात नाव

प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात समझोता एक्स्प्रेस स्फोटातील आरोपी सुनील जोशी यांची हत्या केल्याचा आरोप होता. जोशी यांची 29 डिसेंबर 2007ला हत्या करण्यात आली होती.

फोटो कॅप्शन,

समझोता एक्स्प्रेस स्फोट

याप्रकरणी फेब्रुवारी 2011मध्ये प्रज्ञा यांना अटक करण्यात आली होती. पण 2017मध्ये मध्य प्रदेशातल्या देवास कोर्टानं प्रज्ञा यांना सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणी निर्दोष मुक्त केलं होतं.

दिल्ली आणि लाहोर यादरम्यान धावणाऱ्या समझोता एक्स्प्रेसमध्ये 18 फेब्रुवारी 2007ला हरियाणातल्या पानिपतजवळ स्फोट झाला होता. यात जवळपास 68 लोकांचा मृत्यू झाला होता.

अजमेर दर्ग्यातील स्फोट

अजमेर दर्गा स्फोट प्रकरणातही प्रज्ञा ठाकूर यांचं नाव आलं होतं. पण एप्रिल 2017मध्ये NIAनं प्रज्ञा ठाकूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार आणि इतर दोघांविरोधात राजस्थानच्या स्पेशल कोर्टात क्लोजर रिपोर्ट दिला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)