मुकेश अंबानी काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्या प्रचाराच्या व्हीडिओमध्ये कसे? - दक्षिण मुंबई लोकसभा
- ओंकार करंबेळकर
- बीबीसी मराठी प्रतिनिधी

फोटो स्रोत, Twitter / Facebook
मुकेश अंबानी आणि मिलिंद देवरा
मुंबई दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी त्यांच्या प्रचाराचा एक व्हीडिओ ट्वीट केला आहे. पानवाल्यापासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत असा मतदारसंघातील प्रत्येकाचा आपल्याला पाठिंबा मिळतोय, असं देवरा यांनी व्हीडिओमधून सूचित केलं आहे.
या व्हीडिओमध्ये कोटक उद्योग समूहाचे उदय कोटक तसेच क्रिश रामनानी यांच्यासारखे उद्योगपतीही आहेत. परंतु सर्वांत लक्षवेधी नाव आहे ते म्हणजे रिलायन्स उद्योग समूहाच्या अध्यक्ष मुकेश अंबानी यांचं.
"मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतीक परिस्थितीची जाणीव आहे," असं सांगत मुकेश अंबानी हे "Milind is the man for South Mumbai," असं म्हणाले आहेत.
त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतीचा आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एका व्यक्तीचा आपल्याला पाठिंबा आहे, असा संदेश मिलिंद देवरा यांनी लोकांपर्यंत पोहोचवला आहे.
रफाल घोटाळ्याच्या मुद्दयावरून अनिल अंबानी यांच्याविरोधात काँग्रेसने रान उठवले असताना मुकेश अंबानी यांचा देवरा यांनी उघड पाठिंबा कसा घेतला, हा प्रश्न आता विचारला जात आहे.
याबाबत NDTVशी बोलताना मिलिंद देवरा यांनी या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं स्पष्ट केलं आहे.
मुरली देवरा आणि उद्योजक
मिलिंद देवरा यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा एक उद्योगस्नेही राजकारणी म्हणून ओळखले जात. मुंबई दक्षिण मतदारसंघाचं त्यांनी अनेक वेळा प्रतिनिधित्व केलं होतं.
1968 साली ते मुंबई पालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर 1977 साली ते मुंबईचे महापौरही झाले.
"1980 साली त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, तेव्हा त्यांचे 'इलेक्शन एजंट' म्हणून धीरूभाई अंबानी यांनी काम केले होते," असं ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर सांगतात. देवरा यांचे आणि अनेक उद्योगपतींचे चांगले संबंध होते. तसंच मुकेश आणि अनिल यांच्याशीही घरोब्याचे संबंध होते, असं रायकर यांनी सांगितले.
फोटो स्रोत, Getty Images
मित्तल इन्व्हेस्टमेंट आणि आर्सेलर मित्तरचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा प्रतीकात्मक चेक देताना. सोबत मुरली देवरा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री दिनशा पटेल आणि एचपीसीएलचे अध्यक्ष अरुण बालकृष्णन. हा फोटो वर्ष 2007मधील आहे.
संपुआच्या दोन्ही सरकारांमध्ये 29 नोव्हेंबर 2006 ते 18 नोव्हेंबर 2011 या कालावधीमध्ये मुरली देवरा पेट्रोलियम मंत्री होते. दोन दशकांहून अधिक काळ ते मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. आता या पदावर मिलिंद देवरा कार्यरत आहेत.
'दोन गोष्टी वेगवेगळ्या'
मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांच्याबाजूने बोलण्यातून कोणता संदेश जातो, याबाबत बोलताना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर म्हणाले, "अंबानी उद्योगसमूह आता इतक्या मोठ्या पातळीवर गेला आहे की त्यांना आता कोणत्याही राजकीय पक्षाशी देणंघेणं असण्याचं कारण उरलेलं नाही. उलट कोणताही राजकीय पक्ष त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही."
फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मुरली देवरा आणि निता अंबानी. हा फोटो 2006मधील आहे.
तसेच लहान भाऊ अनिल यांना काँग्रेस विरोध करत असताना मुकेश कसे त्यांना पाठिंबा देऊ शकतात, अशी शंका यायची गरज नाही, असंही कुबेर सांगतात.
"कागदोपत्री त्यांचे उद्योग, कुटुंब वेगवेगळे आहेत. काँग्रेसनं अनिल अंबानी यांच्याविरोधात रान उठवलं असलं तरी मुकेश यांनी काँग्रेसविरोधातच बोललं पाहिजे, असं नाही," कुबेर सांगतात.
'सोबो' - एक उच्चभ्रू मतदारसंघ
दक्षिण मुंबई हा आज देशातील श्रीमंत मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. यात कुलाबा, शिवडी, भायखळा, मुंबादेवी, वरळी, मलबार हिल हे विधानसभेचे मतदारसंघ येतात. अनेक उद्योगांची मुख्यालयं, पोर्ट, रिझर्व्ह बँक तसंच फोर्टमधील अनेक जुन्या वास्तू या मतदारसंघामध्ये येतात.
इथल्या उच्चभ्रूंमुळे तयार झालेल्या संस्कृतीला आणि या परिसराला 'सोबो' (साऊथ बॉम्बेचे लघुरूप) म्हटलं जातं.
फोटो स्रोत, Getty Images
मिलिंद देवरा यांच्या विवाहप्रसंगी मुकेश आणि निता अंबानी, सोबत मिलिंद देवरा यांच्या आई दिसत आहेत.
या मतदारसंघाचं आणि उद्योगांचं नाते सांगताना गिरीश कुबेर म्हणाले, "हा मतदारसंघ धनाढ्यांचा आहे. अनेक बँकांची मुख्यालयं इथं आहेत. देवरा कुटुंबाचे आणि अंबानी कुटुंबांचे जवळचे संबंध होते. अंबांनीवरील अनेक पुस्तकांमध्ये याचा उल्लेखही आला आहे."
मिलिंद देवरा यांनी आपल्या व्हीडिओमध्ये रोजगार निर्मितीसाठी आपल्याला उद्योजकांचा पाठिंबा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हीडिओमध्ये प्रत्येक उद्योजक जेव्हा बोलू लागतो तेव्हा त्याच्या नावाबरोबर त्याच्या उद्योगात किती लोक काम करतात याचा आकडाही पडद्यावर दिसतो.
इतकंच नाही तर माध्यमांशी बोलताना देवरा यांनी 'South Bombay means business and business means jobs' असं उत्तर देऊन उद्योजकांशी असणाऱ्या आपल्या नात्यावर शिक्कामोर्तबच केलं.
'ही निवडणूक सर्वांसाठी महत्त्वाची'
केंद्रामध्ये सत्तारूढ असणाऱ्या भाजप-सेना युतीसाठी आणि काँग्रेससाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात.
फोटो स्रोत, Getty Images
2009 सालच्या प्रचारसभेत मिलिंद देवरा
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "रिलायन्स उद्योगसमूहाचे सत्ताधारी राजकीय पक्षांशी नेहमीच चांगले संबंध होते. एकेकाळी प्रणव मुखर्जी त्यानंतर रालोआचे पहिल्यांदा सरकार आल्यावर प्रमोद महाजन यांचे या उद्योगसमूहाशी चांगले संबंध होते.
"माझ्या मते मुकेश अंबानी यांनी कल पाहून काँग्रेसशीही नवे संबंध सुरू केले आहेत. तसेच प्रचारामध्ये किंवा गेल्या पाच वर्षांमध्ये राहुल गांधी यांनी अनिल यांच्यावर सपाटून टीका केली असली तरी मुकेश अंबानी यांच्याविरोधात ते फारसे बोललेले नाहीत. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेतील उमेदवारांमध्ये चुरशीचा सामना होईल असं दिसतं," असं ते पुढे म्हणाले.
दक्षिण मुंबई मतदारसंघात चौथ्या टप्प्यात, म्हणजे 29 एप्रिलला मतदान आहे. मिलिंद देवरा यांच्यापुढे शिवसेनेचे अरविंद सावंत यांचं आव्हान आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)