IPL @ 11: फास्टफूड क्रिकेट, चीअरलीडर्स आणि खेळाचं एंटरटेनमेंट करणारा अध्याय

Image copyright AFP

18 एप्रिल 2008ची संध्याकाळ. बेंगळुरूचं एम.चिन्नास्वामी स्टेडियम खच्चून भरलेलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेकांविरुद्ध उभी ठाकणारी माणसं एकत्र कशी खेळणार, हा प्रश्न जगभरातल्या चाहत्यांच्या मनात होता आणि त्याचं उत्तर या संध्याकाळी मिळणार होतं.

ट्वेन्टी-20 या झटपट प्रकाराची नांदी होणार होती. चीअरलीडर्स हा प्रकारच सर्वस्वी नवीन होता. डीजेचा दणदणाट स्टेडियमला दणाणून सोडत होता.

रात्री 8 वाजता हा आवाज टिपेला पोहोचला. एकीकडे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाची लाल-पिवळ्या जर्सी होती तर दुसरीकडे काळ्या आणि सोनेरी रंगाची कोलकाता नाईट रायडर्सची जर्सी अनोखी होती. कोलकाताच्या खेळाडूंची ते चकाकणारे हेल्मेट कृत्रिम प्रकाशात एखाद्या मुकुटाप्रमाणे झळाळून निघाले होते.

स्विंग बॉलिंगसाठी प्रसिद्ध प्रवीण कुमारने दादा अर्थात सौरव गांगुलीला पहिला चेंडू टाकला. पहिला चेंडू ट्रायल हे लोकल सामन्यांमधलं सूत्र इथेही लागू झालं आणि अंपायर्सनी लेगबायची खूण केली.

पहिल्या ओव्हरमध्ये फक्त तीन रन्स निघाल्या. मात्र यापैकी एकही धाव बॅटने झाली नव्हती.

दुसरी ओव्हर टाकण्यासाठी झहीर खान आला. झहीरच्या पहिल्या चेंडूला मॅक्युलमने सन्मान दिला मात्र पुढच्या चेंडूपासून कत्तल सुरू झाली. 

त्याचा मिडल आणि लेग स्टंपवरचा तो चेंडू ब्रेंडन मॅक्युलमने सहजतेने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिला. त्या षटकाराने IPL काय असणार, हे स्पष्ट झालं.

भारतीय प्रेक्षकांना हे नवीन होतं. गांगुली-मॅक्युलम कोलकातासाठी खेळत होते तर झहीर बेंगळुरूसाठी. टीम इंडियातले एकमेकांचे सहकारी आता एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ब्रेंडन मॅक्युलम

मॅक्युलमने पुढच्या दीड तासात बेंगळुरूच्या बॉलर्सचा अक्षरक्ष: पालापाचोळा केला. अकरा वर्षांपूर्वी वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या बॅट्समनने 158 धावा करणंही अवघड मानलं जायचं.

मॅक्युलमने IPLच्या पहिल्याच सामन्यात 73 चेंडूत 158 रन्स चोपून काढल्या. बेंगळुरूचं छोटं मैदान आणि मॅक्युलमची ताकद या समीकरणाने बेंगळुरूचं कंबरडंच मोडलं.

मॅक्युलमच्या प्रत्येक फोर आणि सिक्सनंतर नृत्य करणाऱ्या चीअरलीडर्सकडे स्टेडियमधले आणि जगभरातले टीव्हीवरचे प्रेक्षकही अचंबित नजरेने पाहत होते. फोर-सिक्सनंतर स्टेडियममध्ये गाणी वाजणंही अनोखं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चीअरलीडर्स हा प्रकार भारतीय प्रेक्षकांना नवीन होता.

मॅक्युलमने दीड तासात धुमाकूळ घालत तब्बल 10 फोर आणि 13 सिक्सेसचा पाऊस पाडला. मॅक्युलमवगळता कोलकाताच्या अन्य बॅट्समनना फारशी चमक दाखवता आली नाही. भारतीयांचा लाडक्या दादाला 10 रन्स करता आल्या.

त्या वेळी आंतरराष्ट्रीय पटलांवर ऑस्ट्रेलियाचा विजयरथ प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत होता. या विजयरथाचा नायक रिकी पॉन्टिंग कोलकाताकडे होता. त्याला केवळ 20 धावा करता आल्या.

ट्वेन्टी-20 स्पेशलिस्ट डेव्हिड हसी केवळ 12 रन्स करू शकला. भारत-पाकिस्तानचे संबंध चांगले असल्याने कोलकाताकडे पाकिस्तानचा मोहम्मद हफीझ होता. त्याने 5 रन्स केल्या. कोलकाताने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात 222 धावांचा डोंगर उभारला. बेंगळुरूकडे झहीर खान, प्रवीण कुमार, अशेल नॉफक, जॅक कॅलिस, सुनील जोशी आणि कॅमेरून व्हाईट होते. मात्र कोणालाही मॅक्युलमचा झंझावात रोखता आला नाही.

मॅक्युलमच्या तडाख्याने खचलेल्या बेंगळुरूचा अख्खा संघ 82 धावांतच आटोपला. बेंगळुरूच्या केवळ एका बॅट्समनला दुहेरी आकडा गाठता आला. कोलकाताकडून अजित आगरकरने 3 तर अशोक दिंडा, सौरव गांगुली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कोलकाता संघातील खेळाडू मालक शाहरुख खानसह

क्रिकेटच्या घटनाक्रमात लिहिल्या गेलेल्या या ऐतिहासिक घटनेला आज 11 वर्षं पूर्ण झाली.

मॅक्युलम नावाचा तो झंझावत आता कॉमेंट्री करतोय. रिकी पॉन्टिंग आणि सौरव गांगुली आता दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग टीममध्ये आहेत. कोलकाता टीमपैकी इशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा आजही IPLमध्ये खेळत आहेत.

योगायोग म्हणजे 18 एप्रिल 2018 मध्ये कोलकाता संघाचा भाग असलेला इशांत शर्मा, गुरुवारी म्हणजेच 18 एप्रिल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळतोय.

बेंगळुरू संघाकडून खेळणारा विराट कोहली आता त्याच संघाचा कर्णधार आहे. वनडे तसेच टेस्टमध्ये खोऱ्याने धावा करणारा विराट जागतिक क्रमवारीतही अव्वल स्थानी आहे.

11 वर्षांपूर्वी बेंगळुरूचा कर्णधार असलेला राहुल द्रविड आता भारताच्या युवा संघाचा कोच आहे. त्या मॅचचा भाग असलेला वसीम जाफर अजूनही खेळतोय. काही महिन्यांपूर्वी रणजी विजेत्या संघाचा जाफर अविभाज्य भाग होता. झहीर खान आता मुंबई इंडियन्स संघाच्या कोचिंग टीमचा भाग आहे.

योगायोग म्हणजे 11 वर्षांपूर्वीच्या IPLच्या पहिल्या मॅचमध्ये भारताचे माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ मॅच रेफरी होते. 11 वर्षांनंतर आज होत असलेल्या दिल्लीत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघादरम्यानच्या मॅचमध्येही श्रीनाथच मॅचरेफरी आहेत.

इतक्या वर्षांमध्ये IPL स्पर्धेने अनेक संक्रमणं पाहिली. लोकप्रियता आणि प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत कोटीच्या कोटी उड्डाणं घेणाऱ्या या स्पर्धेत मग कोच्ची टस्कर्स केरला आणि गुजरात लायन्स अशी आणखी दोन संघांची भर पडली.

पण लोकप्रियतेबरोबरच मॅचफिक्सिंगनेही या स्पर्धेला ग्रासलं. दोन संघांवर दोन वर्षांसाठी बंदीची कारवाई झाली. मधल्या काळात पुण्याचं प्रतिनिधित्व करणारे दोन संघही मैदानात उतरले.

रन्स आणि विकेट्सचा हा संग्राम दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात रंगतो, म्हणजे मुलांची उन्हाळ्याची सुटी. दीड महिन्यात वर्षभराची बेगमी करण्यासाठी जगभरातले खेळाडू उत्सुक असतात. स्पर्धेपूर्वी होणारा लिलावही चर्चेत असतो. असंख्य वाद पाहिलेल्या या स्पर्धेत दर्जेदार खेळाने डोळ्यांचं पारणंही फिटलं.

पण त्यामुळे वनडे आणि टेस्ट अशा पारंपरिक आणि जेंटलमन्स गेमचा ऱ्हास झालाय, अशा टीकेलाही IPLने मैदान मोकळं करून दिलं.

तुम्हाला काय वाटतं?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)