राहुल गांधींनी शेतकऱ्यांना चंद्रावर जमीन देण्याचं आश्वासन दिलं?

राहुल गांधी, काँग्रेस, भाजप

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन,

राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शेतकऱ्यांना चंद्रावर जमीन देण्याचं आश्वासन दिलं या दाव्यासह सोशल मीडियावर व्हीडिओ शेअर केला जात आहे. काय आहे नेमकी गोष्ट?

हा व्हीडिओ 25 सेकंदांचा आहे. राहुल गांधी काय बोलतात हे ऐकायला येऊ शकतं. ते म्हणतात, तुमची शेती या देशात तुम्हाला पैसा मिळवून देऊ शकत नाही. तो पाहा चंद्र. मी तुम्हाला तिथे शेतजमीन मिळवून देईन. येत्या काही वर्षात तुम्ही तिथे बटाट्याचं पीक घेऊ शकाल.

'टीम मोदी 2019' आणि 'नमो अगेन' अशा उजव्या विचारसरणीच्या फेसबुक ग्रुप्सवर हा व्हीडिओ सातत्याने शेअर होतो आहे. हा व्हीडिओ 60 हजार जणांनी पाहिला आहे.

व्हीडिओबरोबर लिहिलं आहे की, काँग्रेस अध्यक्षांना कोणीतरी रोखा. ते आता शेतकऱ्यांना चंद्रावर जमीन देण्याचा वायदा करत आहेत. या मेसेजसह ट्वीटर आणि शेअरचॅटच्या बरोबरीने व्हॉट्सअपवर हा व्हीडिओ शेअर केला जात आहे.

मात्र या सोशल मीडिया युजर्सचा दावा खोटा आहे. व्हीडिओची पडताळणी केल्यानंतर आम्हाला हे समजलं की राहुल गांधींच्या आवाजाबरोबर छेडछाड करण्यात आली आहे. त्यांच्या वक्तव्याचा केवळ एक भाग व्हीडिओत आहे.

या व्हीडिओला लोकसभा निवडणुकांशी बादनारायण पद्धतीने जोडलं जात आहे.

खरा व्हीडिओ

24 सेकंदांचा हा व्हीडिओ राहुल गांधींच्या गुजरातमध्ये झालेल्या भाषणाचा आहे. हे भाषण साधारण अर्धा तास चाललं होतं.

11 नोव्हेंबर 2017 रोजी काँग्रेस पक्षातर्फे सुरू करण्यात आलेल्या नवसृजन यात्रेदरम्यान गुजरातमधल्या पाटन शहरात राहुल गांधींनी केलेल्या भाषणाचा हा व्हीडिओ आहे.

डिसेंबर 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांच्या आधी राहुल गांधींनी गुजरातमध्ये नवसृजन यात्रेला संबोधित केलं होतं.

या यात्रेत प्रभागाचे निवडणुकीची सूत्रं हाती असलेले अशोक गेहलोत यांच्यासह अल्पेश ठाकोर उपस्थित होते.

राहुल काय म्हणाले होते?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते, ''उत्तर प्रदेश राज्यातल्या भट्टा-परसौलमध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला. मी खोटी आश्वासनं देत नाही. कधीकधी तुम्हाला हे आवडणार नाही. मोदीजी तुम्हाला सांगतात की तुमच्या शेतीतून पैसे मिळत नाहीत. तो बघा चंद्र. मी तुम्हाला तिथे शेती मिळवून देईन. येत्या काळात तुम्ही तिथे बटाटे पिकवाल. तिथे मी मशीन्स बसवेन. हे बटाटे आपण गुजरातला आणू. या बोलण्याशी मी स्पर्धा करू शकत नाही. मी खरं बोलतो. खरं काय, खोटं काय हे आता तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकतं."

राहुल गांधींनी गुजरातमध्ये केलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं होतं.

राहुल गांधी यांच्या भाषणाला त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर ऐकता येऊ शकतं. 12 नोव्हेंबर 2017 रोजी हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला होता.

बटाट्यांपासून सोनं बनवण्याचं वक्तव्य

राहुल गांधी यांच्या या भाषणातील आणखी एक वक्तव्य 2017-18 मध्ये सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं.

राहुल गांधी यांच्या भाषणात फेरफार केल्यानंतर त्यांनी बटाट्यापासून सोनं बनवण्याच्या मशीनबद्दल बोलायचा दावा केला होता.

या बोलण्याची मोठ्या प्रमाणावर थट्टा उडवण्यात आली. सोशल मीडियावर राहुल गांधी यांना लक्ष्य करून अनेक विनोदही फिरू लागले.

मात्र ते विधान अपूर्ण होतं.

राहुल म्हणाले होते, "आदिवासींना म्हणाले होते 40 हजार कोटी रुपये देईन. एक रुपयाही दिला नाही. काही दिवसांपूर्वी इथे पूर आला तेव्हा म्हणाले 500 कोटी रुपये देईन. एक रुपयाही दिला नाही. बटाटे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणाले, असं मशीन आणेन ज्यात एका बाजूने बटाटे टाकले की दुसऱ्या बाजूने सोनं बाहेर पडेल. लोकांना इतका पैसा मिळेल की त्याचं काय करावं हे कळणार नाही. हे माझे शब्द नाहीत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शब्द आहेत."

शेतकऱ्यांना चंद्रावर जमीन देण्याची गोष्ट आणि बटाट्यांपासून सोनं बनवण्याच्या मशीनची गोष्ट असो- राहुल गांधी यांनी गुजरातमधील रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचा हवाला देत हे वक्तव्य केलं होतं.

मात्र नरेंद्र मोदींना आपल्या भाषणादरम्यान असं काही वक्तव्य केल्याचा पुरावा कोणत्याही बातमीत, व्हीडिओत मिळत नाही तसंच त्याचा अधिकृत पुरावाही नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)