बालाकोटमध्ये एकही पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारला गेला नाही - सुषमा स्वराज #5मोठ्याबातम्या

सुषमा स्वराज

फोटो स्रोत, Getty Images/AFP

फोटो कॅप्शन,

फाईल फोटो

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :

1) बालाकोटमध्ये एकही पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारला गेला नाही - सुषम स्वराज

फेब्रुवारीत भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या कारवाईत एकही पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारला जाऊ नये, अशा सूचना भारतीय लष्कराला देण्यात आल्या होत्या, असं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे. दैनिक जागरणने ही बातमी दिली आहे.

त्या म्हणाल्या, "पाकिस्तानचा नागरिक किंवा पाकिस्तानी सैनिकांना लक्ष करू नका. पुलवामा हल्ला करणाऱ्यांना जैश-ए-मोहम्मदच्या तळांना लक्ष करा, असं भारतीय हवाई दलाला सांगण्यात आलं होतं."

त्या अहमदाबादमध्ये भाजप महिला कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. 2014 प्रमाणे यंदाही भाजपचं सत्तेत येईल असंही त्यांनी सांगितलं.

"पुलवामा हल्ल्यानंतर आपण सीमेपलीकडे जाऊन हवाई हल्ला केला. हा हल्ला आत्मसंरक्षणासाठी होता, असं आपण आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगितलं. या हल्ल्यात पाकिस्तानचा एकही नागरिक किंवा सैनिक मारला जाऊ नये, असं आम्ही हवाई दलाला सांगितलं होतं," असं त्या म्हणाल्याची माहिती या बातमीत दिली आहे.

2) नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासणीवरून IAS अधिकारी निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची ओडिशातल्या संबलपूर येथे तपासणी केल्यावरून निवडणूक आयोगाने मोहम्मद मोहसिन या IAS अधिकाऱ्याला निलंबित केले. मोहसिन निवडणूक अधिकारी म्हणून काम करत होते. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

त्यांच्यावर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मोहसिन हे कर्नाटक केडरचे IAS अधिकारी आहेत.

विशेष संरक्षण दलाचे कवच लाभलेल्या नेत्यांबाबत जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्यांची पायमल्ली या अधिकाऱ्याने केल्याचा आयोगाचा ठपका आहे.

ज्यांना या दलाचे संरक्षण लाभते त्यांना वाहनाच्या तपासणीत सूट असते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यावर अधिक तपशील देण्यास त्याने नकार दिला.

3) दलितांवर अन्याय झाल्यावर नरेंद्र मोदी गप्प का असतात? - राज ठाकरे

गुजरातच्या उनामध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेव्हा पंतप्रधान गप्प का होते? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेत केला. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरमधल्या अकलूज येथे भाषण करताना स्वत:च्या जातीचा उल्लेख केला. खालच्या जातीतले आहोत म्हणून आपल्यावर आरोप होत आहेत असं मोदी म्हणाले मग गेल्या 5 वर्षात दलितांना मारहाण झाली तेव्हा तुम्ही गप्प का होता? दलितांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य करत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

राज ठाकरे (फाईल फोटो)

उनामध्ये गाय मारली नव्हती तर, गाय गेल्यावर त्यांची कातडी काढायला ज्यांना बोलावलं, त्यांना गोरक्षकांनी मारहाण केली. पण गो-हत्येवर मोदींची जर अशी तीव्र भूमिका असेल तर मग अनेक जैन मित्र बीफ एक्स्पोर्टमध्ये आहेत असे नरेंद्र मोदी सांगत होतात ना? मग नेमकी तुमची भूमिका काय? असा आरोप राज ठाकरेंनी केला.

4) दानवे माझी मेहबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात : अर्जुन खोतकर

"रावसाहेब दानवे हे माझी मेहबूबा आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतो, तर ते माझ्यावर इश्क करतात," अशा शब्दात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दोघांमधील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ते दानवे यांच्या प्रचारादरम्यान बोलत होते, अशी बातमी ABP माझानं दिली आहे.

त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेही उपस्थित होते. गुरवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली होती.

फोटो स्रोत, FACEBOOK

यावेळी भाषणादरम्यान प्रस्तावना देताना अर्जुन खोतकर यांनी दोघांच्या मैत्रीमधलं प्रेम व्यक्त केलं.

खोतकर म्हणाले की, "यावेळी आपल्याला नवीन इतिहास निर्माण करायचा आहे आणि रावसाहेब दानवेंना प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. रावसाहेब दानवे आणि मी दोघेही 30 वर्षांचे जोडीदार आहोत, असंही या बातमी म्हटलं आहे.

5) भारत-पाकिस्तान व्यापार स्थगित, तस्करी होत असल्याचा आरोप

भारत - पाकिस्तान नियंत्रण रेषेवरून होणारा व्यापाराला भारताने स्थगिती दिली आहे. 19 एप्रिलपासून हा व्यापार अनियमित काळासाठी थांबवला जाणार आहे. व्यापार दरम्यान अमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना समोर आल्या आहेत, असं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. द प्रिंट हिंदीनं ही बातमी दिली आहे.

NIAच्या तपासणीत अमली पदार्थांच्य तस्करीच्या घटना समोर आल्या असल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान दिलेला Most Favoured Nation (MFN)चा दर्जा भारतानं काढून घेतला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)