अमित शाह बारामतीमध्ये: भाजप अध्यक्षांना शरद पवार-सुप्रिया सुळे यांच्या गडात घुसण्याचं कारण काय? लोकसभा निवडणूक 2019

  • तुषार कुलकर्णी
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
अमित शाह आज बारामतीत सभा घेत आहेत, जिथून शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत आणि पुन्हा लोकसभा लढवत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अमित शाह आज बारामतीत सभा घेत आहेत, जिथून शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत आणि पुन्हा लोकसभा लढवत आहेत.

भाजप अध्यक्ष अमित शाह यांची शुक्रवारी संध्याकाळी बारामतीमध्ये सभा होणार आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपच्या कांचन कुल इथून उभ्या आहेत.

2014 साली सुळे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा पराभव केला होता. जर गेल्या वेळी (बारामतीत राष्ट्रवादीच्या घड्याळाविरुद्ध) भाजपचं चिन्हं असतं तर आम्ही जिंकलो असतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते.

म्हणजेच बारामतीची निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे?

शरद पवार यांचं बोट धरून आपण राजकारणात चालायला शिकलो, असं नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते. मग त्यांच्याच 'गुरू'च्या कन्येच्या विरोधात भाजप सर्वशक्तीनिशी का उतरला आहे?

प्रत्येक जागा महत्त्वाची

भारतीय जनता पक्ष कोणतीही जागा सहज सोडणार नाही, असा संदेश जावा यासाठी भाजप प्रयत्न करताना दिसत असल्याचं मत राजकीय विश्लेषकांचं आहे.

'लोकमत'च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने सांगतात, "बारामतीमध्ये विजय होवो अथवा न होवो, पण भाजपसाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे आणि जिंकून येण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा संदेश जावा यासाठीच भाजप हे प्रयत्न करताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीला सुप्रिया सुळे या नेहमीपेक्षा कमी लीडने विजयी झाल्या.

"जर तिथे भाजपचं चिन्ह असतं तर ही निवडणूक भाजपला आणखी सोपी गेली असती, असंही भाजपच्या नेत्यांना वाटत असावं. त्यामुळे ते बारामतीबाबत आशावादी असावेत," माने सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

एकमेंकावर थेट टीका

यंदाच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदी शरद पवारांवर वारंवार थेट टीका करत आहेत. तर मोदींचे आरोप हे पोरकटपणाचे आहेत, असा पलटवार पवारांनी केला आहे.

अशा स्थितीमध्ये ते एकमेकांवर टीका करताना का दिसत आहेत असं विचारलं असता माने सांगतात, "आतापर्यंत राष्ट्रीय नेते आपल्या भाषणातून केवळ राष्ट्रीय धोरण, पक्षाचा जाहीरनामा, आंतरराष्ट्रीय संबंध याबद्दल बोलत असताना दिसत पण मोदींची शेवटची भाषणं ऐकली तर आपल्याला असं दिसतं की मोदी हे राष्ट्रीय आणि स्थानिक मुद्दे घेऊन निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत."

"मोदींनी प्रत्येक राज्यात एक-एक केंद्रस्थान पकडलं आहे आणि त्यांना ते लक्ष्य करतात. जसं की आंध्रप्रदेशात ते चंद्राबाबू नायडूंना लक्ष्य करतात तसेच महाराष्ट्रात ते पवारांना करत आहेत. शरद पवारांना लक्ष्य करून उलट त्यांनी शरद पवारांचं महत्त्व वाढवलं आहे.

मोदींची भाषणं ही एकसुरी बनली होती. भाषणं एकसुरी होणं किंवा त्याची चर्चा न होणं हे घातक ठरू शकतं त्यामुळे त्यांनी आपल्या भाषणांचा सूर बदलून महाराष्ट्रात प्रचाराच्या वेळी पवारांवर टीका केली," असं माने सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

"एअर स्ट्राईकनंतर वातावरण भाजपच्या बाजूने झुकलं होतं. आघाडी कमकुवत झाली होती. पवारांवर टीका करून त्यांनी पवारांना मोठं केलं. पवारांवर केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे भाजपला नुकसान होऊ शकतं," असं मानेंना वाटतं.

शरद पवार यांनी कधीही मोदींवर याआधी थेट केली नव्हती. पण यंदा ते म्हणाले आहेत की "मोदींचं वक्तव्य हे पोरकटपणाचं आहे." तेव्हा शरद पवारांच्या या थेट टीकेचं कारण काय, असाही प्रश्न विचारला जात आहे.

राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सांगतात, "पुढील निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळालं नाही तर तो मोदींचा पराभव आहे, हे सांगण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न असू शकतो. भाजपला तुम्ही मोदींना पर्याय निवडायला सुरू करा, असा सुप्त संदेशही ते देत राहतात. अधूनमधून नितीन गडकरी यांचंही नाव पुढे येत राहतं."

बारामतीची जागा 43 वी

"बारामतीमध्ये मागच्या वेळेस कमळ चिन्ह असतं तर बारामती आपली असती. आता गेल्या वेळची चूक पुन्हा करायची नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात झालेल्या कार्यकर्ता संमेलनात म्हटलं होतं. इतकंच नाही तर राज्यात युतीच्या 43 जागा येतील आणि 43वी जागा बारामतीची असेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, cmo maharashtra

पवार घराण्यातील लोकांना लक्ष्य करणं हे मोदी-शाह यांच्या रणनीतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे, असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना वाटतं. "शरद पवार हे मोदी विरोधकांचं नेतृत्व करत आहेत. काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत काहीच केलं नाही. त्यामुळे ते नामशेष झाले आहेत असा समज भाजपने करून घेतला आहे. त्यामुळे राज्यातला प्रमुख विरोधक हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं भाजपला वाटतं. त्यामुळेच त्यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य केल्याचं दिसतं," अकोलकर सांगतात.

मोदींची सभा कुठेही झाली म्हणजे मराठवाड्यात होऊ द्या की विदर्भात होऊ द्या ते पवारांवरच टीका करतात, असं प्रकाश अकोलकर सांगतात. "ही टीकाच नाही तर बहुतांशवेळा त्याचं स्वरूप हे बदनामीसारखंच झालं आहे."

अस्तित्वाची लढाई

शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे संबंध नेहमी चांगले राहिले आहेत. जेव्हा 2014 साली विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं आणि शिवसेनेबरोबर त्यांची युती झाली नव्हती तेव्हा शरद पवारांनी भाजपला विनाशर्त पाठिंबा दिला होता.

पुढे शिवसेनेबरोबर युती झाली आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज भाजपला उरली नाही. नंतर नरेंद्र मोदी यांनी बारामतीला भेट दिली. त्याच ठिकाणी त्यांनी उद्गार काढले की शरद पवारांचं बोट धरून मी राजकारण शिकलो.

फोटो स्रोत, AFP/Getty Images

म्हणजे त्यांच्या संबंधांमध्ये कुठेच कटुता नव्हती. पण या निवडणुकीच्या वातावरणात टीका होताना का दिसतेय, असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक रशीद किडवई सांगतात की "महाराष्ट्र आणि गुजरातची राजकीय संस्कृती निराळी आहे. राजकीय विरोधक एकमेकांना शत्रू मानत नाहीत तर त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण राहिलेले आहेत."

"पण चांगले संबंध असणं वेगळी गोष्ट आहे आणि राजकारण वेगळी गोष्ट आहे. ही दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. मोदी-शाह यांचं वैशिष्ट्य आहे की ते जिंकण्यासाठी कोणतीच कसर बाकी ठेवत नाहीत. राज्यात शिवसेना आणि भाजपचा आलेख चढाच आहे त्यामुळे आणखी प्रयत्न केल्यास अधिक यश हातात येईल असंच भाजपला वाटतं त्यातून ते हल्ले चढवताना आपल्याला दिसतात," किडवई सांगतात.

जर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं तर मोदींसाठी ही एक मोठी इनिंग ठरू शकते. जर जोड-तोड वालं सरकार आलं तर मोदींचा प्रभाव तितका राहणार नाही असं भाजपला वाटतं त्यामुळे ते जास्तीत जास्त ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोण आहेत सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध उभ्या असलेल्या कांचन कुल?

माजी आमदार सुभाष कुल यांची सून आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. कुल कुटुंबीयांचा दौंड, भोर, इंदापूर तालुक्यात प्रभाव आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

भाजपच्या उमेदवार कांचन कुल

कुल कुटुंबीय 1962 पासून राजकारणात आहे. कांचन कुल यांचे सासरे सुभाष कुल हे 1990 ते 2001 दरम्यान आमदार होते. त्यांच्या अकाली निधनानंतर कांचन कुल यांच्या सासू रंजना कुल या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. तर कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे 2014 साली आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

स्टार प्रचारक असूनही बारामतीबाहेर सुप्रिया सुळे का जात नाहीत?

सुप्रिया सुळे या बारामतीतच अडकून पडल्या आहेत असंही म्हटलं जात आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक असून त्यांना त्यांच्या मतदारसंघाबाहेर कुणीही पाहिलं नाही, असं म्हटलं जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images

सुप्रिया सुळे यांनी हा आरोप फेटाळला आहे.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, पहिल्या टप्प्यात आमचा फक्त एकच उमेदवार उभा होता आणि तिथे शरद पवार प्रचाराला गेले होते. निवडणूक असो वा नसो माझे राज्यात दौरे ठरलेले असतात आणि त्याप्रमाणे मी दौरे करत असते, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)