'जेट एअरवेजचं शेवटचं उड्डाण होतं त्यादिवशी मला ऑफिसमध्ये रडू कोसळलं'

जेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

या कंपनीत 16 हजार कर्मचारी काम करत होते. तर 6 हजार लोक कंत्राटावर होते.

जेट एअरवेजच्या विमानाने बुधवारी अमृतसर ते मुंबई हे शेवटचं उड्डाण केलं. एकेकाळी जेटची दरदिवशी शंभरहून अधिक उड्डाणं व्हायची.

देशातली सर्वात मोठी खाजगी विमानसेवा असणाऱ्या जेट एअरवेजवर 7 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. बँकांनी कर्ज देण्याला नकार दिल्यानं ही सेवा काही काळाकरता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कंपनीत 16 हजार कर्मचारी काम करत होते. तर 6 हजार लोक कंत्राटावर होते.

गुरुवारी त्यांच्यापैकी शेकडो कर्मचाऱ्यांनी दिल्लीतल्या जंतरमंतर रस्त्यावर उतरून निदर्शनं केली.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होणं, स्पाईस जेट आणि इंडिगोची स्वस्तातली विमानसेवा, तेलाच्या दरातले चढ-उतार या कारणांमुळं ही कंपनी डबघाईला आल्याचं सांगितलं जातं.

दिल्लीत प्रदर्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा बीबीसीनं जाणून घेतल्या.

रेनू रजौरा

मी गेल्या 5 वर्षांपासून मी जेटमध्ये केबिन क्रू म्हणून काम करतेय.

आज आमची कंपनी संकटात आहे. मुद्दा पगाराचा नाहीए. आमची कंपनी वाचायला पाहिजे. आम्ही सरकारच्या किंवा मॅनेजमेंटच्या विरोधात नाही. आमची एअरलाईन वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय.

सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी आमची कंपनी वाचवावी.

फोटो कॅप्शन,

'जेट एअरवेजचं शेवटचं उड्डाण होतं त्यादिवशी ऑफिसमधले लोक रडत होते', असं रेनू रजौरा सांगतात.

तुम्ही एअर इंडियाची मदत करू शकता तर तुम्ही आम्हालाही मदत करू शकता. ही 25 वर्षं जुनी कंपनी आहे. देश आणि परदेशात ही कंपनी सेवा पुरवते. लोकांच्या प्रपंचाचा प्रश्न आहे. ते कुठं जाणार बेघर होणार का?

कंपनीचे सुरवातीचे दिवस खूप चांगले होते. अनेकांचं जेट एअरवेजमध्ये काम करण्याचं स्वप्न होतं. लोक मुलासोबत मुलीला पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. पण आज त्या मुलीची नोकरी जातेय. मोदीजी तुम्ही काहीतरी करा.

ज्यादिवशी जेट एअरवेजचं शेवटचं उड्डाण होतं त्यावेळी ऑफिसमधले लोक रडत होते. मलाही रडू कोसळलं.

आता मी आई-वडिलांकडून पैसे घेत आहे. जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत सोडणार नाही.

संगीता मुखर्जी

माझे पती गेल्या 22 वर्षांपासून जेटएअरवेजमध्ये काम करत आहेत.

माझी आई कॅन्सरची पेशंट आहे. माझा मुलगा नववीत शिकत आहे. त्याची शाळेची फी अजून भरलेली नाही.

आईचा उपचार थांबलेला आहे. सरकारने पावलं उचलायला पाहिजेत. असं कसं चालणार. कुणी काहीही करावं आणि लंडनमध्ये जाऊन बसावं?

फोटो कॅप्शन,

संगिता मुखर्जी, जेट कर्मचाऱ्याच्या पत्नी

जेटचा स्टाफ टेन्शन आणि डिप्रेशनमध्ये आहेत. मोदी जी काहीतरी करा. हेच अच्छे दिन आहेत का? नरेश गोयल कुठं आहेत? त्यांना बोलवा. ते सगळे मीडियाच्याद्वारे बोलत आहेत. त्यांनी समोर येऊन स्पष्ट करावं.

किंगफिशर नंतर जेट एअरवेज बंद होईल. ही काय चेष्टा आहे का? काही दिवसानंतर इंडिगो आणि स्पाईस जेटही बंद होतील.

काय करायचं? कुठं जायचं? रस्त्यावर भीक मागावी का?

सिराज अहमद

मी इंजिनिअरिंग डिपार्टमेटमध्ये काम करतोय. मी गेल्या 14 वर्षांपासून या कंपनीत काम करत आहे. माझी गेल्या 3-4 महिन्यांपासून पगार झाला नाही.

यावेळी मुलांच्या अॅडमिशनचा काळ आहे. माझ्या मुलाची फी 60 हजार आहे. ते भरण्यासाठी एवढे पैसे माझ्याकडं नाहीत.

जेट एअरसोबत असं काही होईल, हे मला कधीही वाटलं नव्हतं.

फोटो कॅप्शन,

सिराज अहमद, जेट एअरवेजमध्ये इंजिनिअरिंग डिपार्टमेटमध्ये काम करत आहेत.

2004मध्ये जेव्हा मला इथं नोकरी लागली. तेव्हा सगळ्यांना जेटमध्ये नोकरी मिळावी असं वाटत होतं.

14 वर्षांपूर्वी आम्ही घर खरेदी केलं. त्याचा बँकेचा हप्ता भरणं अवघड झालं आहे. बँकेकडून पैशासाठी फोन येत आहेत.

नोकरीसाठी आम्हाला अजून 5-6 महिने थांबावे लागतील.

कॅप्टन सुधा बेंगानी

2001मध्ये मी आणि माझ्या पतीनं जेट एअरवेजमध्ये नोकरीला सुरुवात केली. आम्ही आज या कंपनीमुळे आहोत.

माझ्या सासरचे रात्री उशीरापर्यंत नोकरी करायला परवानगी देत नव्हते तरी मी ही नोकरी केली.

फोटो कॅप्शन,

कॅप्टन सुधा बेंगानी

माझे आजोबा, आई वडिलांनी चांगला पाठिंबा दिला. जीवनात जे काही करायचं ते करायला सांगितलं.

4 वर्षांची असताना मी जेव्हा विमानात बसले तेव्हाच मी पायलट व्हायचं स्वप्न बघितलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)