गेस्ट हाऊस प्रकरण: मायावती-मुलायम सिंह यादव यांच्यातील 24 वर्षांच्या शत्रुत्वाचं कारण

मायावती आणि मुलायमसिंह Image copyright GETTY IMAGES, PTI

उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी या पक्षांनी आघाडी केली आहे. ही आघाडी केवळ लोकसभा निवडणूकच नाही तर त्यापुढेही बराच काळ चालेल, असं बसपाच्या प्रमुख मायावती आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितलं होतं.

आता मुलायम सिंह, अखिलेश यादव आणि मायावती हे तिघे एकाच व्यासपीठावरही आले.

या दोन्ही पक्षांनी आघाडीची घोषणा केली होती तेव्हा उत्तर प्रदेशामध्ये 38-38 जागा लढवण्याचे निश्चित केले होते. त्यावेळेस झालेल्या पत्रकारपरिषदेत आणि आज झालेल्या प्रचारसभेमध्येही मायावती यांनी देशहितासठी गेस्ट हाऊस प्रकरण बाजूला ठेवत असल्याचं जाहीर केलं आहे.

सपा-बसपामध्ये इतका कडवटपणा आला तरी कसा?

सपा आणि बसपामध्ये गेली दोन दशकं इतका कडवटपणा का होता याचा विचार करण्यासाठी 24 वर्षांपूर्वीच्या एका घटनेचा विचार करायला हवा.

उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये 1995 हे वर्षं आणि गेस्ट हाऊस प्रकरण ('गेस्ट हाऊस कांड' या नावाने प्रचलित) अत्यंत महत्त्वाचं आहे.

या प्रकरणामुळे भारतीय राजकारणाच्या चेहऱ्याची कुरूप बाजू सर्वांच्या समोर आली होती. मायावती आणि मुलायम यांच्यामध्ये शत्रुत्वाची दीर्घकाळ न भरून येणारी दरी निर्माण झाली.

Image copyright Getty Images

1992 साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर वर्षभरात भाजपचा राजकीय मार्ग अडविण्यासाठी त्यांनी बहुजन समाज पार्टीशी हातमिळवणी केली.

गेस्ट हाऊस प्रकरण काय आहे?

समाजवादी पक्षाने 256 आणि बहुजन समाज पक्षाने 164 जागांवर निवडणूक लढविली होती. समाजवादी पक्षाला 109 आणि बसपाला 67 जागांवर विजय मिळाला होता. परंतु ही राजकीय आघाडी फार काळ टिकली नाही.

1995 मध्ये हे नातं तुटण्याची वेळ आली. ते तुटण्यामध्ये मुख्य भूमिका गेस्ट हाऊस प्रकरणानेच बजावली होती. या घटनेमुळे बसपानं सरकारचा हात सोडला आणि समाजवादी सरकार अल्पमतामध्ये आलं.

Image copyright मेहंदी हसन

मायावतींच्या मदतीला भाजप आला आणि काही दिवसांतच त्यांनी तत्कालीन राज्यपाल मोतीलाल व्होरा यांना तसं पत्र देऊन कळवलं. बसपानं सरकार स्थापन करण्याचा दावा केला तर भाजपचा त्यांना पाठिंबा असेल, असं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.

गेस्ट हाऊस प्रकरणाच्या वेळेस बाहेर उपस्थित असणारे आणि ज्येष्ठ पत्रकार शरत प्रधान यांनी बीबीसीला सांगितलं, "तेव्हा मुलायमसिंह यादव यांचं सरकार होतं. बसपानं त्यांना पाठिंबा दिला होता, मात्र ते सरकारमध्ये नव्हते. वर्षभर ही आघाडी टिकली. त्यानंतर मायावतींचा बसपा आणि भाजप जवळ येत असल्याच्या बातम्या आल्या आणि नंतर ते स्पष्ट झालं. थोड्याच कालावधीत मायावती यांनी आपला निर्णय समाजवादी पक्षाला कळवला."

जेव्हा मायावती खोलीत लपल्या होत्या

प्रधान पुढे सांगतात, "या निर्णयानंतर मायावती यांनी गेस्ट हाऊसमध्ये आपल्या आमदारांची बैठक घेण्यास सुरुवात केली होती. बसपा आणि भाजप एकमेकांच्या जवळ आले असून बसपा आता सपाचा हात सोडणार असल्याची माहिती सपाच्या लोकांना मिळाली होती."

Image copyright COURTESY BADRINARAYAN

"ही माहिती मिळाल्यावर मोठ्या संख्येने सपाचे लोक गेस्ट हाऊसच्या बाहेर जमले. काही वेळातच त्यांनी गेस्ट हाऊसमध्ये बैठक सुरू असलेल्या आतल्या खोलीत प्रवेश करून मारहाण सुरू केली. हे सगळं आम्ही पाहिलं आहे," प्रधान सांगतात.

''तेव्हा मायावती घाईघाईत एका खोलीत गेल्या आणि लपून बसल्या. या वेळेस त्यांच्याबरोबर आणखी दोन लोक होते. त्यामध्ये सिकंदर रिजवी होते. तो काळ पेजरचा होता. 'कोणत्याही स्थितीत दरवाज उघडू नका', असा संदेश पेजरवर देण्यात आला होता असं रिझवी यांनी मला नंतर सांगितलं.

"दरवाजा बडवला जात होता. बसपाच्या अनेक लोकांना भरपूर मारहाण झाली होती. यातील काही लोक रक्तबंबाळ झाले होते आणि काही लोक पळून जाण्यात यशस्वी झाले होते. बसपाचे नेते त्या क्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून बोलवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र कुणीही फोन उचलला नाही," असं प्रधान सांगतात.

यादरम्यान "मायावती ज्या खोलीत लपल्या होत्या, सपाचे लोक तो उघडण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी आतील लोकांनी दरवाजाला सोफा आणि टेबल लावून ठेवलं होतं."

दिल्ली कनेक्शन

ज्येष्ठ पत्रकार राम दत्त त्रिपाठी लखनौच्या या घटनेचा संबंध दिल्लीशी असल्याचं सांगतात. 1992 साली जेव्हा बाबरी मशीद पाडली होती, त्याचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर 1993 नंतर सपा-बसपाने भाजपला रोखण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता आणि आपलं पहिलं आघाडीचं सरकार तयार केलं होतं. मुलायमसिंह मुख्यमंत्री झाले होते.

Image copyright Getty Images

त्यावेळेस दिल्लीमध्ये नरसिंह राव याचं सरकार होतं आणि अटलबिहारी वाजपेयी भाजपचे वरिष्ठ नेते होते. ही आघाडी टिकली तर भविष्यात अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागेल, असं दिल्लीच्या नेत्यांना वाटू लागलं होतं. त्यामुळेच भाजपतर्फे बसपाशी बोलणी सुरू झाली. सपाशी नातं तोडून नवं सरकार स्थापन केलं तर भाजपच्या पाठिंब्यावर मायावतींना मुख्यमंत्री होता येईल, असं सांगण्यात येत होतं.

मुलायम यांना याचा अंदाज आला होता, त्यामुळे त्यांनी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची एक संधी मागितली होती. मात्र राज्यपालांनी ती नाकारली.

मायवतींना कोणी वाचवलं?

याच ओढाताणीमध्ये आपल्या आमदारांची एकजूट टिकवण्यासाठी बसपानं सर्वांना गेस्ट हाऊसमध्ये एकत्र केलं आणि मायावतीही तिथंच होत्या. तेव्हा सपाचे लोक घोषणा देत तिथे पोहोचले.

सपाच्या लोकांनी मायवतींना धक्काबुक्की केली आणि मायावतींना जीवानिशी मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असं बसपाचा आरोप आहे.

Image copyright SANJAY SHARMA

मायवतींना वाचवण्यासाठी भाजपाचे लोक तिथे आले होते, असं सांगण्यात येतं. मात्र त्यात तथ्य नसल्याचं प्रधान सांगतात.

"मायावती मीडियामुळं वाचल्या. त्या वेळेस गेस्ट हाऊसच्या बाहेर मीडियामधील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सपाचे लोक त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना त्यात यश आलं नाही. मायावती यांची समजूत घालून त्या दार उघडतील, असे प्रयत्न करण्यासाठीही काही लोक सपानं पाठवले होते, मात्र त्यांनी तसं केलं नाही," ते सांगतात.

हत्या करण्याचा प्रयत्न होता- मायावतींचा आरोप

त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपचे लोक राज्यपालांकडे गेले. सरकार स्थापनासाठी बसपाला पाठिंबा देऊ, असं भाजपानं राज्यपालांना कळवलं. तेव्हा कांशीराम यांनी मायावतींना मुख्यमंत्रिपदी बसवलं. त्यानंतर मायावतींनी सत्तासोपानाची एकेक पायरी चढण्यास सुरुवात केली.

Image copyright Getty Images

त्या दिवशी नक्की काय झाल होतं, याबाबत मायावती यांनी कधी मोकळेपणाने चर्चा केली आहे का, असं विचारल्यावर प्रधान म्हणतात, "हो, अनेकवेळा. मला दिलेल्या मुलाखतीमध्ये असो वा पत्रकार परिषदेत, प्रत्येक वेळेस त्यांनी आपल्याला मारून बसपा संपवण्याचा हेतू होता, असं स्वतः सांगितलं होतं."

गेस्ट हाऊसमध्ये जे काही झालं तो आपल्या हत्येचा प्रयत्न होता, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळेच मायावती यांच्या मनात सपाबद्दल इतकी घृणा होती," प्रधान सांगतात.

Image copyright Twitter / Samajwadi Party
प्रतिमा मथळा समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश आणि मुलायम सिंह यादव बसपा नेत्या मायावती यांच्याबरोबर

पण शुक्रवारी, म्हणजेच 19 एप्रिल 2019 रोजी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांचे तेच दोन नेते एकाच मंचावर आले. "हे प्रकरण विसरून एकत्र येण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कधीकधी देशहितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात," असे मायावती यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)