हेमंत करकरे: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी 'शाप दिलेले' IPS अधिकारी

हेमंत करकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

हेमंत करकरे

1993 साली मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, दंगल, 2006 साली लोकल ट्रेनमध्ये झालेले स्फोट, 2008 साली ठिकठिकाणी झालेले हल्ले आणि 2011 साली पुन्हा झालेली स्फोटांची मालिका यासर्वांची आठवण आली तरी मुंबईकराच्या काळजाचा ठोका चुकतो.

1993 च्या स्फोटानंतर 26/11 नावाने ओळखल्या जाणाऱ्या हल्ल्याचे परिणाम मुंबईकरांच्या मनावर आजही दिसून येतात. हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या पोलिसांना आणि NSG कमांडो संदीप उन्नीकृष्णन यांना या हल्ल्यात प्राण गमवावे लागले होते.

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे या हल्ल्याची खपली पुन्हा एकदा निघाली आहे. भोपाळमधून भाजपतर्फे लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (ATS) दिवंगत प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.

निवडणुकीचा प्रचार करत असताना एका सभेमध्ये आपल्याच शापामुळे हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला आहे, असं विधान त्यांनी केलं आहे. 2006 साली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करकरे यांनी केला होता तसंच साध्वी प्रज्ञा सिंहची चौकशीही त्यांनी केली होती.

फोटो स्रोत, Twitter

भारतीय जनता पार्टीने या विधानाशी आपला संबंध नसल्याचं सांगत हे विधान साध्वी यांचे वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शुक्रवारी दिवसभर या विधानावरून गदारोळ झाल्यानंतर साध्वी यांनीही आपले शब्द परत घेत असल्याचं सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपाने भोपाळमधून तिकीट दिले आहे.

पण या सर्व प्रसंगामुळे पुन्हा चर्चेत आलेलं नाव म्हणजे हेमंत करकरे.

हेमंत करकरे यांचं नाव कसं आलं चर्चेत?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

हेमंत करकरे महाराष्ट्र ATSचे प्रमुख होते आणि 2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना 2009 साली मरणोत्तर अशोक चक्र देऊन गौरविण्यात आलं होतं.

साध्वी प्रज्ञा सिंह प्रचारादरम्यान म्हणाल्या, "माझी चौकशी करण्यासाठी हेमंत करकरे यांना मुंबईत बोलवण्यात आलं. तेव्हा मी मुंबईच्या जेलमध्ये होते. जर पुरावा नसेल तर साध्वीला सोडून द्या असं सांगण्यात आलं होतं. पण तरीही मी पुरावे घेऊन येईन आणि या साध्वीला सोडणार नाही, असं करकरे सांगत राहिले."

"हा देशद्रोह होता. हे धर्मविरोधी होतं. असं का झालं, तसं का झालं असले प्रश्न ते मला विचारायची. पण मी 'काय माहिती, देव जाणे' असं उत्तर द्यायचे. मग हे सगळं समजायला मला देवाकडं जावं लागेल का, असं ते विचारायचे. तेव्हा जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही अवश्य जा, असं सांगायचे," असं साध्वी म्हणाल्या.

पुढे साध्वी म्हणाल्या, "मला इतक्या वेदना दिल्या, इतक्या शिव्या दिल्या. मला ते सहन होत नव्हतं. मी म्हणाले - तुझा सर्वनाश होईल आणि सव्वा महिन्यात त्यांना दहशतवाद्यांनी मारलं. जेव्हा कुणाचा जन्म किंवा मृत्यू होतो, तेव्हा सव्वा महिन्याचं सूतक लागतं. मी ज्या दिवशी आले, त्या दिवशी त्याला सूतक लागलं."

फोटो स्रोत, Twitter

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विधानावर IPS असोसिएशनने टीका केली आहे. "अशोक चक्र पुरस्कृत दिवंगत हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांशी लढताना बलिदान दिलं. त्यांचा अपमान करणाऱ्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. देशातील शहिदांच्या बलिदानाचा सन्मान झाला पाहिजे, अशी मागणी आम्ही करतो." असे ट्वीट IPS असोसिएशनने केलं आहे.

हेमंत करकरे कोण होते?

हेमंत करकरे यांचा जन्म 12 डिसेंबर 1954 रोजी नागपूरला झाला होता. वर्ध्यामध्ये चित्तरंजन दास प्राथमिक शाळा, न्यू इंग्लिश स्कूल येथे शिक्षण जाल्यानंतर त्यांनी नागपूरमधील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलजीमधून इंजिनियरिंगची पदवी घेतली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

हेमंत करकरे यांना 29 नोव्हेंबर 2008 रोजी हजारो मुंबईकरांनी साश्रू नयनांनी निरोप दिला होता.

1982 साली ते IPS झाले. मुंबई पोलीस (प्रशासन)चे पोलीस सह-आयुक्तपदी काम केल्यानंतर त्यांनी सात वर्षं रॉमध्ये त्यांनी सेवा बजावली आणि 2008 साली जानेवारीमध्ये महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखपदी त्यांची निवड झाली होती.

2014 साली हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता यांचंही मेंदूतील रक्तस्त्रावामुळे निधन झाले.

हेमंत करकरे यांच्या मृत्यूबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनीही याबाबत शंका उपस्थित केली होती.

एस. एम. मुश्रीफ यांचे मत

प्रज्ञा सिंह यांचे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचं मत माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे. पूर्ण पुराव्याच्या आधारावरच करकरे तपास करत होते, असं मुश्रीफ यांनी मत मांडलं आहे.

या स्फोटात वापरलेलं वाहन साध्वी यांचं होतं आणि स्फोटाचा कट करण्यासाठी मध्यप्रदेशात ठिकठिकाणी बैठका झाल्या त्याचे चित्रिकरण उपलब्ध होऊन ते आरोपपत्रासोबत जोडल्याचंही मुश्रीफ यांनी सांगितलं.

मालेगावच्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांना काय वाटतं?

मालेगाव स्फोटात 20 वर्षांच्या अझहर बिलालाचाही मृत्यू झाला होता. अझहरचे 59 वर्षाचे वडील निसार अहमद सय्यर बिलाल सांगतात, "त्या दिवशी बिलाल भिकू चौकात गेला होता. आणि स्फोटात त्याचाही मृत्यू झाला. आज तो जिवंत असता तर माझा आधार असता."

"खरंतर आरोपींना शिक्षा व्हायला पाहिजे, पण त्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं जातंय. हे म्हणजे आमच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखं आहे."

अझहरनंतर कुटुंबाला सरकारनं मदत देण्याबद्दलही ते नाराज आहेत. ते म्हणतात, "कुटुंबाला कुठलाही फायदा मिळालेला नाही. सरकारी नोकरीचं आश्वासन मिळालं होतं. पण ना नोकरी मिळाली ना कुठला मोबदला."

निसार अहमद सय्यद बिलाल या प्रकरणावर बोलताना म्हणतात, "या स्फोटाचा तपास हेमंत करकरे यांनी केला होता. त्यांनी जमा केलेले सगळे कागदोपत्री पुरावे आता गायब झालेत, असं सरकार सांगत आहे. मग जर सरकार स्वत:ला चौकीदार म्हणत असेल तर चौकीदार असतानाही पुरावे गायब कसे झाले?"

बिलाल यांनी NIA कोर्टात अर्ज करून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक लढण्याची परवानगी देऊ नये असं म्हटलंय.

त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय, "साध्वीच्या वकिलांनी त्या खूप आजारी असल्याचा दावा करून जामीन मिळवला आहे. कुणाच्यातरी आधाराशिवाय चालू शकत नाही, असंही त्यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे त्या कोर्टाच्या सुनावणीलाही हजेरी लावत नाहीत आणि दुसरीकडे निवडणूक लढवत आहेत. याचा अर्थ त्या एकदम नीट आहेत. तंदुरूस्त आहेत. कोर्टाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे, कारण त्यांना केवळ आजारी असल्याच्या आधारावर जामीन मिळाला आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)