IPL - विराट लक्ष्याचा पाठलाग करण्यात रसेल आणि राणा अपयशी

राणा Image copyright Facebook

IPL - 12मध्ये शुक्रवारी झालेल्या रोमहर्षक लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कोलकता नाईट रायडर्सला 10 धावांनी नमवले.

कोलकता नाईट रायडर्सचा बॅट्समन नितीश राणा याने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला. पण हा षटकार त्याच्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकला नाही. केकेआर समोर 214 धावांचं लक्ष्य होतं, पण हा संघ 20 ओव्हरमध्ये 203 धावा बनवू शकला.

कोलकताच्या नितीशने 85 आणि आंद्रे रसेलने 65 धावा केल्या, पण त्यांच्या संघाला विजय मिळवून देण्यात त्यांना यश आलं नाही.

बेंगलोरने प्रथम बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 213 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने 100 आणि मोईन अलीने 66 धावा केल्या.

पण हा सामना बेंगलोरसाठी इतका सोपा नव्हता.

अंतिम ओव्हरमध्ये कोलकता जिंकणार अशा घोषणा देत प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतलं होतं.

शेवटच्या ओव्हरमध्ये कोलकत्याला विजयासाठी 24 धावा आवश्यक होत्या. विराटने मोईनच्या हाती चेंडू सोपवला. नितेश आणि रसेल ही जोडी विकेटवर होती. पहिला चेंडू वाया गेल्यानंतर पुढच्या चेंडूवर एक धाव घेता आली. आता रसेलकडे स्ट्राईक होता. त्याने पुढच्याच चेंडूवर षटकार खेचत उत्कंटता वाढवली. पण पुढच्या चेंडूवर मात्रा त्याला एकही धाव घेता आली नाही. पुढच्या चेंडूवर तो बाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर नितीश राणाने षटकार खेचला.

Image copyright AFP

रसेलने फक्त 25 चेंडूत 2 चौकार आणि 9 षटकार लगावत 65 धावा केल्या. तर नितीशने 46 चेंडूत 85 धावांची खेळी केली.

उथप्पा आणि गिल यांच्यावर प्रश्नचिन्ह

हा सामना गमावल्याचं दु:ख कोलकत्याला राहील. संघाच्या मधल्या फळीतील बॅटसमननी केलेली संथ फलंदाजी संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरली. शुभमन गिलने 11 चेंडूत 9 आणि रॉबिन उथप्पाने 20 चेंडूत 9 धावा केल्या.

अर्थात विराटच्या संघाने उत्तम खेळी केली, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

3 ओव्हरमध्ये मॅच फिरली

बेंगलोरच्या वतीने मोईन अलीने तुफानी फलंदाजी केली. कुलदीप यादव 17वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमध्ये मोईनने 3 षटकार आणि 2 चौकार लगावत 26 धावा केल्या. मोईन अलीने फक्त 28 चेंडूत 66 धावांची खेळी केली. या षटकात बेंगलोरची धावसंख्या 149वरून 168वर गेला. पुढच्या षटकात 10 आणि 19 व्या षटकात 19 धावा गेल्या. अखेरच्या षटकात विराटने शतक पूर्ण केलं. या IPLमध्ये विराटचं हे पहिलंच शतक आहे.

Image copyright Getty Images

जर अशा प्रकारे बेंगलोरने उर्वरित सर्व सामने जिंकले तर हा संघ सुपर फोरमध्ये पोहोचू शकतो. विराटने या विजयानंतर मोईन अली आणि स्टोईनसचं कौतुक केलं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)