मोदींच्या आचारसंहिता उल्लंघनाकडे निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष - माजी निवडणूक आयुक्त #5मोठ्याबातम्या

मोदी

फोटो स्रोत, Getty Images

आजच्या वृत्तपत्रांतील मोठ्या पाच बातम्या पुढील प्रमाणे :

1. मोदींकडून वारंवार होत आहे आचारसंहितेचं उल्लंघन - माजी निवडणूक आयुक्त

नरेंद्र मोदी सतत आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे माजी निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. हे वृत्त खबर एनडीटीव्हीने दिलं आहे.

ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले, यावरून कुरेशी यांनी निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचे निलबंन हे केवळ दुर्भाग्य नाही, तर पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाने आपली प्रतिमा सुधारण्याची मोठी संधी गमावली आहे, असे डॉ. एस.वाय. कुरेशी यांनी म्हटले आहे.

कुरेशी यांच्या विधानाला निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलं नाही.

2. दाभोळकरांचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही भाजपने तिकीट दिलं असतं: अजित पवार

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. जर नरेंद्र दाभोळकर आणि एम. एम. कलबुर्गी या विचारवंतांचे मारेकरी सापडले असते तर भाजपने त्यांना देखील तिकीट दिले असते अशी बोचरी टीका पवार यांनी केली, हे वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

फोटो स्रोत, Facebook

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल जे विधान केले आहे. त्या बद्दल भाजपकडून कोणी बोलण्यास तयार नसून ही निषेधार्ह बाब आहे. असंही ते म्हणाले.

बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आघाडीच्या उमेदवारांची प्रचार सभा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, शिरूर मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे, माजी मंत्री शशीकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

3. भाजपला मतदान करू नका : बाबा आढाव

भाजप सरकारने कष्टकऱ्यांचा घास पळवण्याचे काम केले आहे. रिक्षा चालकांना रिक्षाचं पासिंग करणे अशक्य झाले आहे. कष्टाची भाकरी केंद्राचा धान्य पुरवठा भाजप सरकारने बंद केला आहे, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, MANJUNATH KIRAN

हमाल पंचायत, रिक्षा पंचायत आणि कष्टकऱ्यांनी भाजपला मतदान करू नका, असे आवाहन त्यांनी केलं आहे. भाजपवर बाबा आढाव यांनी फक्त आरोपांच्याच फैरी झाडलेल्या नाहीत. तर, कष्टकऱ्यांनी भाजपला मत देऊ नये, असेही आवाहन त्यांनी केलं आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.

4. सैन्यातील जवानाच्या आत्महत्येप्रकरणी महिला पत्रकाराला हायकोर्टाचा दिलासा

लष्करातील सहायक पद्धतीवर प्रकाशझोत टाकणारे स्टिंग ऑपरेशन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या महिला पत्रकार पूनम अग्रवाल आणि निवृत्त लष्करी अधिकारी दिपचंद सिंह यांना गुरुवारी मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. हायकोर्टाने या दोघांविरोधात गोपनीयता कायद्याअंतर्गत दाखल झालेला गुन्हा रद्द केला आहे. ही बातमी द क्विंटने (The Quint) दिली आहे.

पूनम अग्रवाल या 'द क्विंट'मध्ये (The Quint) सहयोगी संपादक म्हणून काम करीत असून त्यांनी दोन वर्षांपूर्वी स्टिंग ऑपरेशन केले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये लान्सनाईक रॉय मॅथ्यू यांनी लष्करातील सहायक पद्धतीवर टीका केली होती. या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ जारी करण्यात आल्यानंतर मॅथ्यू यांनी आत्महत्या केली होती.

5. राज ठाकरे कुणाच्या लग्नात नाचत आहेत- प्रकाश आंबेडकरांची टीका

वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. सध्या राज ठाकरे सभा घेऊन भाजपवर टीका करत आहेत. मात्र, लग्न नसताना राज ठाकरे नेमकं कुणासाठी नाचतात, अशी खोचक टीका आंबेडकरांनी केली आहे. ही बातमी लोकमत न्यूज 18ने दिली आहे.

जर घरचं लग्न असेल तर समजू शकतो की आनंदात तुम्ही नाचत आहात पण लग्न कुणाचं आहे ते तरी सांगा असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)