IPL : श्रेयस अय्यर आणि स्टीव स्मिथनं मिळवून दिला दिल्ली आणि राजस्थानला विजय

श्रेयस अय्यर-स्टीव्ह स्मिथ

फोटो स्रोत, Getty Images

आयपीएलमध्ये या शनिवारी दोन सामने खेळले गेले आणि या दोन्ही सामन्यांमध्ये यजमान संघानं विजय मिळवला. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं एक मोठा निर्णय घेत कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेऐवजी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथकडे सोपविली.

हा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला. जयपूरला झालेल्या सामन्यात राजस्थाननं मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्सनं पराभव केला.

शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं फिरोजशाह कोटला मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबला पाच विकेट्सनं हरवलं.

दिल्ली समोर विजयासाठी 164 धावांचं लक्ष्य होतं. शिखर धवनच्या 56 धावा आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 58 धावांच्या जोरावर दिल्लीनं हे लक्ष्य 19.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. नाणेफेक हरल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबनं पहिल्यांदा बॅटिंग करत सात विकेट्स गमावून 163 धावा केल्या.

पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेलनं 69 धावा केल्या. गेलनं सहा चौकार आणि पाच षट्कारांच्या मदतीनं केवळ 37 बॉलमध्ये 69 धावा काढल्या.

दिल्लीच्या विजयावर प्रश्नचिन्ह

दिल्लीनं पंजाबवर विजय जरी मिळवला असला, तरी त्यासाठी त्यांना बरंच झगडावं लागलं. दिल्लीला इनिंगमधल्या शेवटच्या तीन ओव्हर्स अतिशय कठीण गेल्या. या ओव्हर्समध्ये पंजाबनं अजून एक जरी विकेट घेतली असती, तर मॅचचं चित्रच बदललं असतं.

दिल्लीचा फलंदाज कोलिन इनग्राम मैदानावर आला तेव्हा दिल्लीचा स्कोअर 15.1 ओव्हरमध्ये 128 धावा असा होता. तोपर्यंत दिल्लीनं 3 विकेट्स गमावल्या होत्या. म्हणजेच दिल्लीला जिंकण्यासाठी केवळ 36 धावांची गरज होती.

18 व्या ओव्हरमध्ये इनग्रामनं तुफान फटकेबाजी केली. त्यानं सलग तीन चौकार लगावले. या ओव्हरमध्ये इनग्रामनं केलेल्या 13 धावांनी दिल्लीच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा झाला.

मात्र पुढच्याच ओव्हरमध्ये मोहम्मद शमीनं केवळ चारच धावा दिल्या. शमीच्या ओव्हरमध्ये अक्षर पटेल अतिशय विचित्र पद्धतीनं रन आउट झाला. शमीच्या बॉलवर फटका मारून तो धावला. मात्र दुसरी धाव घेताना मध्येच अक्षर पटेल शमीला धडकला आणि रन आउट झाला.

फोटो स्रोत, Getty Images

शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला विजयासाठी केवळ सहा धावांची गरज होती. कर्णधार श्रेयस अय्यरनं चौथ्या चेंडूवर चौकार मारत दिल्लीचा विजय साजरा केला. दिल्लीला विजय जरी मिळाला असला, तरी संघासमोर काही प्रश्नही उपस्थित झाले आहेत.

दिल्लीचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही. ऋषभ पंतलाही मोठी खेळी करता आली नाही. आतापर्यंत फलंदाजीची सर्व मदार ही कर्णधार श्रेयस अय्यरवरच आहे.

पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉनं कोलकात्याविरुद्ध 99 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा निघणं बंद झालं.

स्टीव स्मिथचं कर्णधारपद

शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबईचा विजयरथ रोखला आणि जयपूरमध्ये आपल्या घरच्या मैदानावर अगदी आरामात विजय मिळवला.

यंदाच्या आयपीएलमध्ये सतत होत असलेल्या पराभवामुळं त्रस्त झालेल्या राजस्थाननं अजिंक्य रहाणेऐवजी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय शनिवारच्या सामन्यात यशस्वी झाला. स्टीव्ह स्मिथनं नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

आपल्या नव्या कर्णधाराचा निर्णय योग्य आहे, हे सिद्ध करत राजस्थानच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सला 20 ओव्हर्समध्ये 161 धावांमध्ये रोखलं.

मुंबईचा सलामीवीर आणि यंदाच्या आयपीलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या क्विंटन डी कॉकनं 47 चेंडूंमध्ये सहा षट्कार आणि दोन चौकारांच्या मदतीनं 65 धावा केल्या. सूर्यकुमार यादवनं 34 आणि हार्दिक पंड्यानं 34 धावा काढल्या.

या तिघांचा अपवाद वगळता मुंबईचा कोणताही फलंदाज राजस्थानच्या बॉलर्ससमोर टिकाव धरू शकला नाही.

कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नाबाद 59 धावा आणि रियान परागच्या 43 धावांच्या मदतीनं राजस्थाननं विजयाचं लक्ष्य 19.1 षटकांतच पूर्ण केलं. राजस्थानच्या विजयात सलामीवीर संजू सॅमसनच्या 35 धावांचाही महत्त्वाचा वाटा होता.

बॉल टेम्परिंग प्रकरणी स्टीव्ह स्मिथ भलेही वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिला असेल, पण त्याच्यातले नेतृत्वगुण जराही कमी झाले नाहीत हेच राजस्थानच्या विजयानं सिद्ध केलं.

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचं ऑस्ट्रेलियन संघातही पुनरागमन झालं आहे आणि वर्ल्ड कपमध्ये संघाला या दोघांकडूनही खूप अपेक्षा आहेत.

स्मिथनं गोलंदाजीमध्ये वारंवार बदल केले. मुंबईच्या सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी कॉकनं दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. मात्र तोपर्यंत 13.5 ओव्हर्स होऊन गेल्या होत्या.

गोलंदाजांचं यश

स्मिथनं कर्णधार म्हणून जी रणनीती आखली होती, ती चांगलीच यशस्वी ठरली. श्रेयस गोपाल आणि जोफ्रा आर्चर हे राजस्थानचे गोलंदाज स्मिथसाठी हुकूमाचे एक्के सिद्ध झाले.

श्रेयस गोपालनं चार ओव्हर्समध्ये केवळ 21 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चरनं चार ओव्हर्समध्ये केवळ 22 धावा देत 1 विकेट घेतली.

फोटो स्रोत, Getty Images

विशेष म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये अतिशय खराब कामगिरी केलेल्या राजस्थाननं मुंबईला मात्र दोन वेळा पराभूत केलंय.

याआधी राजस्थाननं मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडिअमवर चार विकेट्सनी हरवलं होतं.

शनिवारी मुंबईविरोधात विजय मिळवला असला तरी आकडेवारीत राजस्थान अजूनही पिछाडीवर आहे. राजस्थाननं नऊपैकी केवळ तीन सामने जिंकले असून सहा सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. सुपर-4 च्या शर्यतीपासून राजस्थानचा संघ अजून बराच लांब आहे.

अशा परिस्थितीत स्टीव स्मिथनं कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारत अजिंक्य रहाणेला काहीसं दबावमुक्त केलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)