राज ठाकरे यांच्या मुंबई सभेला निवडणूक आयोगाची परवानगी

राज ठाकरे, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप Image copyright Indranil Mukherji
प्रतिमा मथळा राज ठाकरे भाषणादरम्यान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रचारसभांमधून 'लाव रे तो व्हीडिओ' असं म्हणत नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलेल्या प्रत्येक योजनेची वस्तुस्थिती काय आहे, हे सांगत आहेत. त्यामुळे राज आपल्या पुढच्या सभेत नेमकं कोणत्या विषयावर बोलणार याबद्दल आपसूकच उत्सुकता निर्माण होताना दिसतीये.

राज ठाकरेंच्या मुंबईमधल्या सभेला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली, असं वृत्त रविवारी सकाळी आलं होतं. मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचं कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या 24 एप्रिलला होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली, असं या वृत्तात म्हटलं होतं.

मात्र त्यांच्या सभेला परवानगी देण्यात आल्याचं मुंबईच्या निवडणूक उप-अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. "राज ठाकरे यांना मुंबईमध्ये प्रचारसभा घेण्याची परवानगी नाकारण्यात आली नव्हती. वन विंडो सिस्टमअंतर्गत त्यांना रविवार 21 तारखेला परवानगी देण्यात आली आहे," असं ट्वीट करून आयोगाने स्पष्ट केलं आहे.

Image copyright Twitter

काळा चौकीतील शहीद भगतसिंग मैदानात 24 एप्रिलला मनसेनं सभा आयोजित केली होती. या सभेला परवानगी मिळावी म्हणून 18 एप्रिलला पक्षानं एफ/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे अर्ज केला होता.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीत उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी 'एक खिडकी योजनें'तर्गत अर्ज करणे आवश्यक असते. या नियमानुसार मनसेचा अर्ज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी पाठवण्यात आला होता. मनसे निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत समन्वय अधिकाऱ्यांनी सभेला परवानगी नाकारली. 'महाराष्ट्र टाइम्स'नं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी मात्र सभेला परवानगी मिळू शकते, असा विश्वास बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान मनसे लोकसभा निवडणूक लढवत नाहीये, तरी राज ठाकरे सध्या राज्यभर भाजपविरोधात प्रचार करत आहेत. राज यांची त्यामागची गणित काय आहेत, याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत.

'राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची मानसिकता तयार व्हावी'

राज यांच्या प्रचारामागची भूमिका स्पष्ट करताना मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सध्या आमचा उद्देश हा केवळ लोकांमध्ये राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची मानसिकता तयार करणे हा आहे. लोकशाहीसाठी हे अतिशय आवश्यक आहे. जे लोक राजकारणाचा आपल्या आयुष्याशी काही संबध नाही, असं मानतात. त्यांना या प्रचारामुळे आपल्या रोजच्या आयुष्यावरही राजकारणाचा कसा परिणाम होतो हे लक्षात येईल. सध्या राज ठाकरे ज्या सभा घेत आहेत त्याला मनसेनं लोकांचं केलेलं 'राजकीय प्रबोधन' असं म्हणावं लागेल. या प्रचाराचा मताच्या आकड्यावर किती परिणाम होईल, हे सांगणं सध्या तरी कठीण आहे."

Image copyright Getty Images

आपण केवळ लोकसभा निवडणूक आणि मोदी-शाह यांच्या जाहिरातबाजीतला फोलपणा उघड पाडण्यासाठी प्रचार करत आहोत, असं मनसेकडून सांगितलं जात असलं तरी राजकीय विश्लेषक राज ठाकरेंच्या प्रचाराकडे अजून व्यापक अर्थानं पाहत आहेत.

राज निवडणुकीतला 'एक्स फॅक्टर'

"या निवडणुकीचा सर्वांत जास्त फायदा राज ठाकरे घेताना दिसत आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये एक 'एक्स फॅक्टर' असतो. यंदा महाराष्ट्रापुरता विचार केला तर हा 'एक्स फॅक्टर' राज ठाकरे आहेत. सातत्यानं थेट नरेंद्र मोदींना लक्ष्य करून राज कौशल्यानं स्वतःच प्रतिमा संवर्धन करत आहेत," असं मत 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं.

कुबेर यांनी म्हटलं, "राज ठाकरे यांचं लक्ष्य हे आगामी विधानसभा निवडणुका आहे. आपल्या पक्षाचा पाया राज्यभर व्यापक करण्यासाठी राज ठाकरे या सभांचा वापर करून घेत आहेत. तो सहजपणे होतानाही दिसतोय. त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी नाही झाली तरी राज ठाकरे स्वतःची जागा निर्माण करू शकतील."

राज यांच्या प्रचाराचा फटका नेमका कोणाला?

राज यांच्या आक्रमकतेचा फटका भाजपपेक्षाही शिवसेनेला जास्त बसेल, असा अंदाज गिरीश कुबेर यांनी व्यक्त केला. "शिवसेना सध्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. शिवसेना नेतृत्वानं गेल्या काही काळात घेतलेल्या निर्णयांमुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या नाराजी आहे. अशावेळी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश नाही मिळालं तर काही नाराज शिवसैनिक मनसेकडे वळू शकतात," असं गिरीश कुबेर यांनी म्हटलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राज ठाकरे

राज ठाकरेंच्या सभांमुळं भाजपची किती मतं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे वळतील हे सांगणं कठीण आहे, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी म्हटलं. "सध्या आघाडीकडे शरद पवार वगळता कोणताही स्टार प्रचारक नाहीये. राज ठाकरे ही कमतरता भरून काढत आहेत. मात्र मुळात मनसेचा हक्काचा मतदार कमी आहे. मनसेची उपस्थिती नसेल तेव्हा या मतदारांचा स्वाभाविक कल हा शिवसेनेकडे असेल. पण जो कुंपणावरचा किंवा द्विधा मनःस्थितीतला मतदार आहे, त्याची मतं आघाडीकडे वळविण्यात मनसेला निश्चित यश मिळू शकेल," असं अभय देशपांडे यांनी म्हटलं.

"काँग्रेस केवळ पुलवामा, राफेल या मुद्द्यांवर बोलत असताना राज ठाकरे लोकांशी संबंधित योजनांबद्दल बोलत आहेत. ते केवळ बोलतच नाहीयेत, तर सगळी आकडेवारी आणि पुरावे देत आहेत. भाजपचा प्रत्येक खोटा दावा ते खोडून काढत आहेत. यामुळं भाजपचे काही मतदार त्यांच्यापासून नक्कीच दुरावतील," असा अंदाज पत्रकार वर्षा तोरगळकर यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला.

विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार?

राज यांच्या प्रचाराचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फायदा होईल, असं चित्र निर्माण झालं असलं तरी स्वतः राज थेटपणे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मतं मागत नाहीयेत. मोदी-शाहांचा पराभव करण्याऱ्यांना मतदान करा, असं आवाहन राज करत आहेत.

Image copyright Getty Images

अप्रत्यक्षपणे आघाडीला मतं मागताना राज विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाण्याचा मार्ग खुला ठेवत आहेत? या प्रश्नाला अनिल शिदोरे यांनी थेट उत्तर देणं टाळलं. आघाडी होईल किंवा आघाडी होणारही नाही. या भविष्यातील गोष्टी आहेत. हे निर्णय त्या-त्या वेळी घेतले जातील. सध्या आम्ही ज्या सभा घेत आहोत, त्या केवळ लोकसभा निवडणुकीपुरत्या मर्यादित आहेत, असं गुढी पाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनीच स्पष्ट केल्याचं अनिल शिदोरे यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)