नरेंद्र मोदींवरील वेबसीरिज निवडणूक आयोगाने केली स्थगित #5मोठ्याबातम्या

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

आजच्या वृत्तपत्र आणि वेबसाईटवरील मोठ्या पाच बातम्या पुढील प्रमाणे :

1. पीएम मोदींवरील वेब सीरिजवर स्थगिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यानंतर निवडणूक आयोगाने आता मोदींच्या आयुष्यावर आधारित वेबसीरिजच्या प्रदर्शनालाही स्थगिती दिली आहे.

एरोस नाऊ या ऑनलाइन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या 'मोदी- जर्नी ऑफ ए कॉमन मॅन'ला निवडणूक पूर्ण होईपर्यंत प्रदर्शित होण्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे. हे वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

2. अभिनंदन यांची वीरचक्रासाठी शिफारस

भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची वीरचक्रासाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांची बदली श्रीनगरवरून करण्यात आली आहे. हे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

फोटो स्रोत, Social media

बालाकोटवर भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान आणि भारतीय लढाऊ विमानांमध्ये चकमक झाली होती. त्या चकमकीदरम्यान अभिनंदन वर्तमान हे पाकिस्तानच्या ताब्यात होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. वीरचक्र हा भारतात दिला जाणारा तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे.

बालाकोटवर कारवाई करून जै-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त करणाऱ्या मिशनमध्ये सहभागी झालेल्या वैमानिकांना वायुसेना शौर्य पदक देण्यात यावं अशी शिफारस करण्यात आली आहे.

3. काँग्रेसकडून दलितांना घटनादुरुस्तीचे नाहक भय - गडकरी

काँग्रेसने अनेक वेळा घटनादुरुस्ती केली. मात्र, आता त्याच पक्षाकडून भाजपच्या नावाने मुस्लीम-दलितांना घटनादुरुस्तीची भीती दाखवली जात आहे. देशात गरिबांच्या जिवावर सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने त्यांचे कधीही भले केले नाही. दर पाच वर्षांनी गरिबी हटावचा नारा दिला जातो काँग्रेस कार्यकर्त्यांची तेवढी गरिबी हटली, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केली. हे वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

पैठण येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

भाजप घटना बदलेल, असे नेहमी म्हटले जाते. पण काँग्रेसने ८० वेळा घटनादुरुस्ती केली आणि आज घटनेच्या नावाने दलितांमध्ये त्यांच्याकडून भीती निर्माण केली जात आहे. गैरसमज निर्माण केले जातात.

4. हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलला 20 लाखांचा दंड

महिलांबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डकडून (बीसीसीआय) हार्दिक पांड्या आणि के.एल राहुल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बीसीसीआयने या दोघांनाही २०-२० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे वृत्त द हिंदूने दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images/NurPhoto

हा दंड भरण्यासाठी हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांना ४ आठवडे म्हणजेच एक महिन्याची मुदत दिली आहे.

हार्दिक पांड्या आणि के.एल राहुल यांच्यावर लावण्यात आलेल्या २० लाख दंडापैकी १-१ लाख रुपये सीमेवर कार्यरत असताना शहीद झालेल्या सुरक्षा दलातील १० कॉन्स्टेबल यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

5. 'मोदींच्या नावावर नव्हे, त्यांच्या कामावर मते मागत आहोत' - शाह

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागतो हे खरे नाही. आम्ही त्यांनी केलेले काम, त्यांनी उभारलेले प्रकल्प यातून निर्माण झालेल्या विश्वासाला साद घालतो आहोत. त्यामुळे देशातील जनता आम्हाला प्रतिसाद देईल, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त आले. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे नुसते नाव होते, आता मोदींचे नाव व काम असे दोन्ही घेऊन आम्ही आलो आहोत. २०१४ मध्ये मोदींबाबत आशा होती, आता लोकांच्या मोदींबाबत आशा व अपेक्षा दोन्ही आहेत, हा तेव्हाच्या व आताच्या परिस्थितीतला फरक आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)