प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केल्यावरून मारहाण झालेले वृद्ध म्हणतात: ‘मी चूक असेन तर कायदेशीर शिक्षा करा’

भाई रजनीकांत
फोटो कॅप्शन,

भाई रजनीकांत यांना दर्यापूरमधील अॅड. संतोष कोल्हे यांनी मारहाण केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करणारा मेसेज व्हॉट्सअॅपवर प्रसारित केला म्हणून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकास शनिवारी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

भाई रजनीकांत (वय 72) असं त्यांचं नाव असून ते शेतकरी आणि दारूबंदीच्या चळवळीत कार्यरत आहेत. अकोला, अमरावती परिसरामध्ये ते दारूविरोधात प्रबोधन करतात.

भाई रजनीकांत यांचं स्वतःचं घर नसल्यामुळे ते मित्रांच्या, सहकाऱ्यांच्या घरी रात्र काढून दिवसा प्रबोधनाचं काम करतात.

शनिवारी झालेल्या या घटनेचा जो व्हीडिओ बाहेर आला आहे, त्यात दर्यापूर पालिकेतील नगरसेवक अॅड. संतोष कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्याने भाई रजनीकांत यांना मारहाण करताना दिसत आहे. आपल्यावरील हा हल्ला पूर्वनियोजित होता, अशी भाई रजनीकांत म्हणाले आहेत.

जानेवारी महिन्यामध्ये अंबेजोगाई येथील महेंद्र निकाळजे यांनाही प्रकाश आंबेडकरांवर काही टिप्पणी केल्यावरून अशाच प्रकारची मारहाण करण्यात आली होती.

'मी प्रबोधन करतच राहाणार'

शनिवारी मारहाणीमुळे कंबर, छाती दुखत असूनही पैसे नसल्यामुळे भाई रजनीकांत डॉक्टरकडे जाऊ शकलेले नाहीत. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "गेली 45 वर्षे मी शेतकऱ्यांसाठी, रोजगार हमी योजनेसाठी आणि दारूबंदीसाठी काम करतोय."

"मी अकोल्यातील मतदार असल्यामुळे अकोल्यातून लोकप्रतिनिधित्व करू पाहाणाऱ्या उमेदवारांबद्दल बोलण्याचा अधिकार मला आहे. प्रकाश आंबेडकर हे दोन ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत, दोन्हीपैकी एका जागी पराभव झाल्यास तिथल्या मतदारांवर पुन्हा निवडणूक लादली जाईल.

"मला मत मांडण्याचा अधिकार आहे. मी एखादी चूक केल्यास लोकशाहीच्या नियामांप्रमाणे कायदेशीर कारवाई करता येऊ शकते," असं ते म्हणाले

'मारहाण पूर्वनियोजितच'

हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा दावा रजनीकांत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केला. ते म्हणाले, "दारूबंदीच्या कामासाठी चर्चा करायची असं मला सांगितलं होतं. त्यामुळे मी मूर्तिजापूरहून तिकडे गेलो.

"सकाळी स्टँडवर मी दिलेल्या वेळेपेक्षा ते दीड तास उशिरा आल्यानंतर त्यांनी चर्चा सुरू केली आणि अचानक मारहाण केली. 'तुम्हाला धडा शिकवू', 'हातपाय तोडू' अशा धमक्याही दिल्या. तसंच याचं चित्रिकरणही पद्धतशीरपणे केलं. त्यामुळे हे सगळं पूर्वनियोजित होतं हे नक्की दिसतं.

"मारहाणीनंतर मला कुठेही जाऊ देण्यात आलं नाही. मला तिथं पोलीस ठाणंही माहिती नव्हतं, त्यामुळे तक्रार न करता मूर्तिजापूरला निघून आलो," त्यांनी सांगितलं.

फोटो कॅप्शन,

दारुबंदीच्या कार्यक्रमासाठी चर्चा करू असे भाई रजनीकांत यांना सांगण्यात आले होते.

"समाजमाध्यमांवर असे मेसेज करणाऱ्यांना फक्त ट्रोल करू नका तर ठोकून काढा" अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्याचं प्रकाश आंबेडकरांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. "टीका करणारा प्रामाणिक असला पाहिजे. तो सुपारी घेऊन टीका करणारा असू नये. सुपारी घेऊन टीका करणार असेल तर त्याला ठोकून काढा हे मी जाहीर सांगितलंय," अशा शब्दांमध्ये त्यांनी गेल्या महिन्यात ही भूमिका मांडली होती.

"माध्यमांनी टीका केली तरी चालेल. मी काही गोष्टींमध्ये नक्कीच हुकुमशहा आहे, हे मी आजही सांगतो," असंही त्यांनी सांगितलं होतं.

काल भाई रजनीकांत यांना झालेल्या मारहाणीनंतर ABP माझा वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी, "मी कार्यकर्त्यांना मारहाण करा, असं सांगितलेलं नाही. मारहाण करणारा दिसतो, पण पोस्ट लिहिणारा दिसत नाही.

"बदनामी करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला नाही. बदनामी करणाऱ्याला ठोकून काढा, असं मी सांगितलं होतं. माझी बदनामी करण्याचा अधिकार त्यांना नाही. पोस्ट लिहिणाऱ्याचा आणि मारहाण करणाऱ्यांचा मी निषेध करतो. वंचितांची सत्ता यायला लागल्यावर सवर्णांच्या पोटात दुखायला लागतं," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

'विचारांचं उत्तर विचारांनीच द्यायला हवं'

अंबेजोगाई येथील महेंद्र निकाळजे यांना मारहाण होण्याच्या आणि दर्यापूरमध्ये भाई रजनीकांत यांना मारहाण होण्याबद्दल रिपाइंचे प्रसिद्धीप्रमुख हेमंत रणपिसे यांनी बीबीसीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली.

"महेंद्र निकाळजे हे रिपब्लिकन पक्षाचे सध्या सदस्य नाहीत तसेच भाई रजनीकांतही पक्षाशी संबंधित नाहीत. परंतु कोणालाही मारहाण होणे योग्य नाही. अशा मारहाणीचा आमचा पक्ष निषेधच करतो. विचारांचं उत्तर विचारांनीच द्यायला हवं", असे रणपिसे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "अशा प्रकारची मारहाण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक असूच शकत नाहीत. ही मारहाण म्हणजे आंबेडकरी चळवळीला लागलेला कलंक आहे. अशा घटनांमुळे चळवळ बदनाम होते."

या व्हीडिओमध्ये मारहाण करताना दिसणारे अॅड. संतोष कोल्हे हे भाजपचे नगरसेवक आहेत. बीबीशी मराठीच्या नीतेश राऊत यांच्याशी बोलताना ते हा काही पूर्वनियोजित कट नव्हता, असं म्हणाले

"बाळासाहेब यांच्याबद्दल आक्षेपार्थ बोलल्यामुळे माझी साहजिकच प्रतिक्रिया उमटली. मी बाबासाहेबांचा पाईक आहे. त्यामुळे बाळासाहेबांविषयी पोस्ट केलेल्या त्या मजकुराबद्दल मी दुखावलो गेलो. आणि स्वाभविकच त्यावेळी झालेल्या बाचाबाचीत आम्ही त्याला मारहाण केली. अजूनही मी भाजपचा नगरसेवक आहे, पण बाळासाहेबांना मानणारा आहे".

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)