राहुलने सांगितलं तर वाराणसीतून निवडणूक लढवेन - प्रियंका गांधी #पाचमोठ्याबातम्या

प्रियंका गांधी

फोटो स्रोत, Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :

1) राहुलने सांगितलं तर वाराणसीतून निवडणूक लढवे - प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं तर आपण वाराणसीतून नक्की निवडणूक लढवू असं प्रियंका गांधी यांनी वायनाडमध्ये म्हटलं आहे. सकाळने ही बातमी दिली आहे.

राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी त्या वायनाडमध्ये गेल्या होत्या.

काँग्रेसने अद्याप वाराणसीतून त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही. वाराणसीतून प्रियंका यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत.

पुलवामा आत्मघाती हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या वायनाड येथील जवानाच्या घरी प्रियंका यांनी भेट दिली.

2) 'अरे, काय उखडतो माझी'; शरद पवारांची टीका

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बारामतीत सभा घेतल्यानंतर शरद पवार यांनीही शहा त्यांच्यावर रविवारी जोरदार टीका केली. 'अरे, काय उखडतो माझी.. कुणाला माहिती?,'या शब्दांत त्यांनी बारामतीत आयोजित सांगता सभेत शहांवर टीका केली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान बारातमीतल्या सभेत पवार बोलत होते.

फोटो स्रोत, Getty Images

पवार म्हणाले, "देशात अनेक विचारांचे पक्ष आहेत. योग्य निकाल लागला, तर देशात स्थिरता येईल. अस्थिर सरकार आले, तर अराजकता निर्माण होईल. केवळ पवार आणि गांधी कुटुंबावर टीका करणे इतकेच काम भाजपमधील नेत्यांनी केलं आहे." असंही याबातमी म्हटलं आहे.

3) केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचा सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पाठिंबा

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार आल्यानंतर त्यांच्या समर्थनासाठी अरुण जेटली पुढं सरसावले आहेत. या क्षणाला न्यायपालिकेच्या सोबत उभं राहायला पाहिजे, असं त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. आजतकनं ही बातमी दिली आहे.

सरन्यायाधीश गोगोई यांच्याकडे काम केलेल्या एका ज्युनिअर महिला असिस्टंटने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप लावला आहे.

याआधी शनिवारी गोगोई यांनी एक तीन त्रिसदस्यीय खंडपीठाची आपत्कालीन बैठक बोलावून स्वत:वर लागलेले लैंगिक छळवणुकीचे आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

संस्थांना संपवण्यासाठी खोट्या गोष्टींनी पुढं रेटणाऱ्यांवर कडक कारवाई केली नाही तर अशा प्रवृत्ती वाढतील असं ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.

गोगोई यांनी दिलेल्या निर्णयासोबत असहमत असलो तर त्यांच्या व्यक्तीगत नैतिक मुल्ल्यांविषयी मला विश्वास आहे, असं जेटली लिहितात.

4) विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस होत असतानाच हवामान खात्याने पुन्हा एकदा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 23 ते 25 एप्रिल दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येणार येऊ शकते. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

मुंबईचा विचार करता मुंबईचे कमाल तापमान 33 अंशावर स्थिर असले, तरी प्रत्यक्षात मात्र उन्हाचा तडाखा आणि वाढता उकाडा मुंबईकरांचा आणखी घाम काढणार आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते.

राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास राहिल असं सांगण्यात आलं आहे.

5) भारताकडील अणुबॉम्ब दिवाळीसाठी राखून ठेवलेला नाही - नरेंद्र मोदी

पाकिस्तान नेहमी भारताला अणुबॉम्बची धमकी देतो. परंतु भारत आता त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आमच्याकडे असणारा अणुबॉम्ब आम्ही काही दिवाळीसाठी ठेवलेला नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिल्याची बातमी ABP माझानं दिली आहे.

राजस्थानमधील बाडमेरमध्ये भाजपच्या एका प्रचारसभेते मोदी बोलत होते. "भारताने पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरणे आता सोडून दिले आहे. नाहीतर पूर्वी दररोज आमच्याकडे न्युक्लिअर बटन आहे, या गोष्टीचा पाकिस्तानकडून पुनरुच्चार होत होता. माध्यमं त्यावेळी हेडलाईन लिहायची की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. तर मग आमच्याकडे असलेला अणुबॉम्ब आम्ही दिवाळीसाठी ठेवला आहे का?" असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)