नरेंद्र मोदींनी 'त्या' सभेत शिवराळ भाषा वापरली नाही - फॅक्ट चेक
- फॅक्ट चेक टीम
- बीबीसी न्यूज

फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका प्रचार सभेतील एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. मोदी शिवराळ भाषेत बोलत असल्याचं या व्हीडिओत दाखवलं जात आहे.
स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवणाऱ्या गौरव पंधी याने हा व्हीडिओ शेअर केला आहे. रविवारी केलेल्या ट्वीटमध्ये तो म्हणतो, "पंतप्रधान मोदी ही काय प्रकारची भाषा आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने अशी भाषा आणि तीही जाहीरपणे वापरावी, हे योग्य आहे का? हे धक्कादायक असून विश्वास बसणार नाही, अशा प्रकारचं आहे. किमान तुमच्या पदाची तरी मान ठेवा."
हा व्हीडिओ 2 लाख 70 हजार वेळा पहिला गेला आहे. हा व्हीडिओ फेसबुकवर अनेक वेळा शेअर झाला आहे.
पण ही क्लिप खोटी असल्याचं आम्हाला दिसून आलं आहे.
वस्तुस्थिती
मोदी यांनी कोणतीही शिवराळ भाषा वापरलेली नाही, असं आम्हाला दिसून आलं आहे.
पाटणा इथं मोदींच्या भाषणातील 15 सेकंदांचा भाग यासाठी वापरला आहे. या क्लिपवर क्विंट या वेबसाईटचा लोगो आहे. या वेबसाईटने असा कोणताही व्हीडिओ बनवलेला नाही, असा खुलासा केला आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या मोठ्या व्हीडिओतील काही भाग ही क्लिप बनवण्यासाठी खोडसाळपणाने वापरला आहे.
मोदी यांची काही गुजराती वाक्य वारंवार दाखवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असं दिसतं.
मूळ भाषणात मोदी म्हणतात, "भविष्यात पाण्यावरून लढाई होणार हे माहिती आहे, तर आपण आत्ताच काळजी का घेत नाही."
यातील 'लढाई थवानी छे' हे गुजराती वाक्य या व्हीडिओत वारंवार दाखवण्यात आलं आहे. या गुजराती वाक्याचा अर्थ लढाई सुरू होणार आहे, असा होतो.
हा मूळ व्हीडिओ 47 मिनिटांचा असून हा व्हीडिओ भाजपच्या ट्वीटर हँडलवर आहे.
या रॅलीत पंतप्रधान मोदी गुजरातमधील जलसंकटावर बोलत होते.
या रॅलीत त्यांनी आयुष्यमान भारत, कुंभमेळ्यातील स्वच्छता, विकलांगासाठी सरकारच्या योजना यावरही भाष्य केलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)