लोकसभा निवडणूक 2019: ‘सैनिकांच्या नावावर मतं मागणं बंद करा' - माजी जवानांची नेत्यांवर नाराजी
- प्राजक्ता पोळ
- बीबीसी मराठी प्रतिनिधी

फोटो स्रोत, Getty Images
'किसान मरता है तो राजनैतिक मुद्दा होता है. फिर जवान मरता है तो क्यों नहीं?' जवळपास सगळ्याच राजकीय सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांचा उल्लेख केला. एका सभेमध्ये स्टेजवर जवानांचे फोटो लावूनही भाषण करण्यात आलं.
'नवमतदारांनो, बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणारे वीर जवान, पुलवामातील शहीद, शेतकऱ्यांच्या हितासाठी, गरिबांसाठी तुम्ही आयुष्यातलं पहिलं मतदान करा. आपण आपली पहिली कमाई जशी देवाजवळ ठेवतो, त्यानंतर आईजवळ देतो तसंच आपलं पहिलं ऐतिहासिक मत बालाकोटमधल्या एअरस्ट्राईक जवानांना समर्पित करणार ना?' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथील सभेत सैनिकांच्या नावाने मतदानाचं आवाहन केलं होतं.
यावर विरोधकांकडून टीका होत आहे. पण याबद्दल जवानांना, त्यांच्या कुटुंबीयांना काय वाटतं, हे आम्ही जाणून घेतलं.
'नवर्यांच्या मरणाचं भांडवल करणं थांबवा'
हे शब्द आहेत सातारा जिल्ह्यातल्या कवठे गावात राहणार्या कविता प्रविण डेरे यांचे. त्यांचे पती प्रविण यांना आसाममध्ये एका संघर्षादरम्यान आपले प्राण गमवावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यांवर 28 वर्षीय कविता डेरे यांनी ही भावना व्यक्त केली आहे.
2009 साली कविता आणि प्रवीण डेरे यांचं लग्न झालं. 2011 साली आसाममध्ये भूसुरुंग स्फोटात प्रवीण गेले. दोन वर्षांच्या संसाराच्या आठवणी घेऊन कविता डेरे लहान मुलीसह आयुष्य जगत आहेत.
फोटो स्रोत, Prajakta Pol
प्रवीण डेरे
कविता डेरे सांगतात, "मी आजपर्यंत कधीच मतदान केलं नाही. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार आहे. पण शहीद जवानांचा मुद्दा घेऊन मतं मागितली जात असतील तर पहिलं मत कुठल्या राजकीय पक्षाला द्यायचं की नोटाला, याचा विचार करत आहे," असं त्या म्हणाल्या.
'...तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही'
"निवडणुकांमध्ये सैन्याला ओढलं जात असेल तर लोकशाही असलेल्या भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही," असं फलटण तालुक्यातील तडवळे गावात राहणार्या बजरंग निंबाळकरांना वाटतं.
बजरंग निंबाळकर हे 2007 साली सैन्याच्या मराठा 19 तुकडीतून निवृत्त झाले. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "देशाच्या सीमेवर दररोज जवांनाचा संघर्ष सुरू असतो. जगण्याची बरीच बंधनं असतात. अशा परिस्थितीतही तो देशासाठी लढत असतो. सर्जिकल स्ट्राईक असो किंवा सीमेवरची घुसखोरी, सरकारचं काम हे मोठ्या निर्णयांमध्ये आदेश देणं असतं.
"प्रत्यक्षात जीवाची बाजी लावत तो सैनिक लढत असतो. मग हे आम्ही केलं, असं निवडणुकांमध्ये सांगणार्या राजकीय नेत्यांकडून शहीद जवानांचा हा अपमान आहे. पण पुढे पंतप्रधानांना सांगायला कोण जाणार? आणि आमचं कोण ऐकणार?" ते सांगतात.
जवानांचे फोटो लावून मत मागणं चुकीचं आहे, असं जरी निंबाळकर सांगत असले तरी "देशाची सुरक्षा गेल्या 6-7 वर्षांमध्ये मजबूत झाली आहे," हे सांगायला विसरत नाहीत.
सैनिकांचा संघर्ष कधीच संपत नाही
3 डिसेंबर 1971... पाकिस्तानच्या वायुसेनेने भारतावर हल्ला केला आणि भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धाला सुरुवात झाली. 13 दिवस चाललेल्या या युद्धात अनेक जवान शहीद झाले तर काही जखमी झाले होते. नाशिकचे निवृत्त सेक्शन कमांडर रामराम लोंढेही त्यापैकीच एक होते.
फोटो स्रोत, Prajakta Pol
राजाराम लोंढे
रामराम लोंढे हे युद्धात लढत असताना त्यांच्या उजव्या हाताला गोळी लागली. त्यांचा उजवा हात अधू झाला.
आता लोंढे 65 वर्षांचे आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांबाबत बोलताना ते सैनिकांच्या संघर्षाविषयी सांगतात.
"सरकार हे कायम सैनिकांचा फक्त त्यांच्या फायद्यासाठी वापर करत आलं आहे. सैनिकांना उघडपणे बोलता येत नाही. त्याचा फायदा राजकारणी नेहमीच घेत आले आहेत. जवान देशासाठी शहीद होतो, कधी जखमी होतो, पण 4 दिवसांनंतर त्याच्याकडे, त्याच्या कुटुंबीयांकडे बघायलाही कुणी जात नाही," अशी खंत ते व्यक्त करतात.
1971च्या युद्धातील कामगिरीसाठी सरकारने त्यांना 1350 चौ. मी जमीन दिली. पण "नंतर काही वर्षांनी ते अतिक्रमण आहे म्हणून त्या जमिनीवर बांधलेलं माझं घर तोडलं. आता मी दुसरीकडे राहतो," ते सांगतात.
"आमच्यासारख्या हयात असलेल्या सैनिकांचा कुणी आदरही करत नाहीत आणि शहीद जवानांच्या नावावर मतं मागून त्यांचा अपमान करतात. सैनिकांना राजकारण्यांनी असंच वागवलं आहे, हे थांबवलं पाहिजे. आमच्या सैनिकांच्या नावावर मतं मागणं बंद केलं पाहीजे," असं ते सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)