लोकसभा निवडणूक 2019: सुप्रिया सुळे, रावसाहेब दानवे, सुजय विखेंच्या भवितव्याचा फैसला आज

सुप्रिया, सुजय आण दानवे-पाटील

फोटो स्रोत, Getty Images

लोकसभा निवडणुकांसाठीचा राज्यातला तिसरा टप्पा आज आहे. राज्यातल्या 14 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, सुनील तटकरे यांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये मतदान आहे.

जळगावमध्ये भाजपचे उन्मेष पाटील, राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि वंचित बहुजन आघाडीचे अंजली बाविस्कर यांच्यात लढत आहे.

रावेरमध्ये भाजपचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या उल्हास पाटील यांचे आव्हान आहे. वंचित आघाडीतर्फे नितीन कांडेलकर निवडणूक लढवत आहेत.

जालन्यात दानवेंचं वर्चस्व राहणार?

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जालन्याचे उमेदवार आहेत. विलास औताडे हे काँग्रेसचे तर वंचित आघाडीकडून शरदचंद्र वानखेडे उमेदवार आहेत.

निवडणुकीपूर्वी इथलं वातावरण चांगलंच तापलं होतं. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि दानवे यांच्यात बेबनाव होता. भाजप शिवसेना युतीचा मराठवाडा विभागीय मेळावा औरंगाबादमध्ये झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दानवे आणि खोतकर यांच्यात दिलजमाई झाली.

दानवे आणि खोतकर यांच्यात नेमका वाद का?

खोतकर हे सध्या जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचे बंधू अनिरुद्ध खोतकर हे जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यात भाजपला सर्वाधिक २२, तर शिवसेनेला १५ जागा मिळाल्या होत्या. शिवसेना आणि भाजपची केंद्रात तसेच राज्यात युती आहे तेव्हा जिल्ह्यातही युती व्हावी असा आग्रह दानवेंनी धरला. त्यांच्या या मागणीकडे खोतकरांनी लक्ष दिलं नाही.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातलं वितुष्ट मिटलं आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना एकत्र आणून अर्जुन खोतकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ आपल्या भावाच्या गळ्यात घातली. शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन आपल्याला शह दिला अशी सल दानवेंच्या मनात निर्माण झाली. दानवेंचे विरोधक राष्ट्रवादीचे सतीश टोपे हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बनले. तेव्हापासून खोतकर दानवे हा संघर्ष अधिक तीव्र झाला.

रावसाहेब दानवे यांच्या हातात जालना जिल्ह्याची सत्ता अनेक वर्षांपासून राहिली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर मराठवाड्यातला सर्वांत शक्तिशाली भाजप नेता अशी त्यांची प्रतिमा बनली आणि ते जेव्हा प्रदेशाध्यक्ष बनले त्यानंतर त्यांची शक्ती आणखी वाढली.

शिवसेना आणि भाजपची केंद्रात आणि राज्यात युती आहे. रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याच मतदारसंघातून शिवसेनेच्या नेत्याने बंड केलं असतं तर त्यामुळे चुकीचा संदेश गेला असता. त्यामुळे खोतकर यांनी माघार घेतली.

औरंगाबादचा गड कोणाकडे?

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे चारवेळा निवडून आले आहेत. काँग्रेसतर्फे सुभाष झांबड उभे आहेत. त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने अब्दुल सत्तार यांनी बंड केलं आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील रिंगणात आहेत.

औरंगाबादमध्ये नगरसेवक म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या खैरे यांनी पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद सांभाळलं. त्यानंतर आमदार ते मंत्री अशा भूमिका हाताळल्या.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

चंद्रकांत खैरे

त्यांनी 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये विजय मिळवला होता. 1999 मध्ये त्यांनी बॅरिस्टर अंतुले यांना, 2004 मध्ये रामकृष्ण बाबा पाटील यांना. 2009 मध्ये उत्तमसिंह पवार आणि पाच वर्षांपूर्वी नितीन पाटील यांचा पराभव केला होता. हे सर्व काँग्रेसचे उमेदवार होते.

खैरे यांचा बालेकिल्ल्याला झांबड भगदाड पाडणार का? हा प्रश्न आहे. त्याचवेळी जलील किती मतं फोडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

रायगड कोणाच्या ताब्यात?

केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात चुरशीचा मुकाबला आहे. वंचित आघाडीच्या सुमन कोळी रिंगणात असल्या तरी खरी लढत गीते विरुद्ध तटकरे अशीच आहे. पाच वर्षांपूर्वी गीते यांनी निसटता विजय मिळवला होता. राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र आल्याने तटकरे यांची आघाडी बळकट झाली आहे.

अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड असे रायगडमधले तर रत्नागिरीतील दापोली, गुहागर असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून हा मोठा मतदारसंघ तयार झाला आहे. मोदी लाटेतही गीते यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. त्याआधी शेकाप आणि काँग्रेसचे खासदार आलटून पालटून निवड येत असत. तटकरे आणि काँग्रेसमध्ये वितुष्ट आहे. गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड झाली आहे. दुसरीकडे रामदास कदम आणि अनंत गीते यांच्यातील वाद मिटला आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. हा समाज गीतेंच्या पाठिशी नेहमी उभा राहिला आहे. यावेळी काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

पुण्यात मैत्रीपूर्ण लढत

भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांची मैत्री चर्चेचा विषय आहे. बापट सलग पाचवेळा आमदार निवडून आले आहेत. 1996 साली भाजपने पुण्यातून त्यांना उमेदवारी दिली होती मात्र काँग्रेसच्या सुरेश कलमाडी यांनी त्यांना हरवलं.

दांडगा लोकसंपर्क हे गिरीश बापट यांची जमेची बाजू आहे. त्याचबरोबर पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी संयमित भूमिका पार पाडत शहरी आणि ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न हाताळला आहे.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

काँग्रेसचे मोहन जोशी आणि भाजपचे गिरीश बापट

मोहन जोशी हे विधानपरिषदेचे आमदार, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीचा अनुभव असलेले उमेदवार असून युवक काँग्रेसपासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केलेली आहे. मोहन जोशींचा जनसंपर्क चांगला आहे. दलित ,मुस्लिम ,ख्रिश्चन असंघटित कामगार व्यापारी काँग्रेसची साथ देईल.

बारामतीवर पवारांचा झेंडा राहणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्या सलग दहा वर्ष खासदार आहेत. त्यांच्यासमोर कांचन कुल यांच्या रुपात भाजपने उमेदवार दिला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सायकलवाटपाच्या उपक्रमातून, तसेच ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबीर, महिलांचे विविध कार्यक्रम यातून त्या सतत लोकसभा मतदारसंघात राहिल्या. संसदेत अतिशय अभ्यासू भाषणातून त्यांनी उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार दोनवेळा पटकावला आहे. २०१४ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पुरंदर, खडकवासला मतदारसंघात फटका बसला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सुप्रिया सुळे

कांचन कुल या कुल कुटुंबीयांच्या सून असून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील आहेत. त्यांचं शिक्षण बी ए हिंदी , शारदानगर महाविद्यालयातून झालेलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या त्या नातेवाईक आहेत.

कुल कुटुंबीय १९६२ पासून राजकारणात आहे. कांचन कुल यांचे सासरे सुभाष कुल हे १९९० ते २००१ दरम्यान आमदार होते त्यांच्या अकाली निधनानंतर कांचन कुल यांच्या सासू रंजना कुल या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. तर कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे २०१४ साली आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

नगरची सूत्रं विखे पाटलांकडे?

अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांच्यात लढत आहे. सुजय विखे पाटील यांचे वडील आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर सुजय यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे पवार आणि विखे-पाटील संघर्षाची किनार आहे.

बाळासाहेब विखे-पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद १९९१च्या लोकसभा निवडणुकीत विकोपाला गेला.

अहमदनगर मतदारसंघात यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते. तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते गडाखांविरुद्ध अपक्ष लढले. पण यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून निवडून आले.

फोटो कॅप्शन,

सजय विखे पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षाचे नेते आहेत. मात्र ते भाजपच्या तिकीटावर लढत आहेत.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

त्यानंतर बाळासाहेब विखे-पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी त्यांचं चारित्र्यहनन केलं, असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला.

शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्याविरोधात बाळासाहेब विखे पाटील यांनी कोर्टात पुरावे सादर केले. हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला. या खटल्यादरम्यान शरद पवार यांच्यावरही कोर्टाने ठपका ठेवला तर गडाखांना सहा वर्षं निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं.

हा संघर्ष पुढे शरद पवारांचे पुतणे अजित पवार आणि बाळासाहेब विखेंचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातही सुरूच राहिला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी कधीच सोडली नाही.

2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघ राखीव झाला. शरद पवार यांच्या आग्रहाने रामदास आठवले यांना शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं निश्चित झालं. त्याबदल्यात राष्ट्रवादीकडून नगर दक्षिणची जागा बाळासाहेब विखे पाटील यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय करण्यात आला होता. पण ऐनवेळी पवारांनी भूमिका बदलली. नगर दक्षिणमधून राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यात आला. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांची खासदारकी संपुष्टात आली. याला प्रत्युत्तर म्हणून विखे पाटील यांनी रामदास आठवले यांच्याविरुद्ध प्रचार केला आणि रामदास आठवले यांना पराभूत करण्यात विखे पाटील हे यशस्वी ठरले, असं ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी सांगितलं.

हा संघर्ष पुढे अधिकच तीव्र होत गेला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार विरोध झाला. पण अटीतटीच्या लढाईत राधाकृष्ण विखे पाटील १२ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले.

अजित पवार अर्थमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील कृषीमंत्री असताना यांच्यातले वाद कायम समोर येत राहिले.

पवार कुटुंब आणि विखेंच्या प्रवरागनगरचा तब्बल पन्नास वर्षांपेक्षा जास्त जुना संबंध आहे. शरद पवारांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार हे विठ्ठलराव विखे पाटलांनी स्थापन केलेल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्यात काही काळ अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यावेळी शरद पवारही प्रवरानगरमध्ये होते आणि तिथल्या महात्मा गांधी विद्यालयात त्यांचं शिक्षण झाले आहे.

राज्याच्या राजकारणात मात्र नेहमीच शरद पवार विरूद्ध विखे असं चित्र राहिलं आहे. यशवंतराव चव्हाणांनंतर काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या नेतृत्वात शरद पवार आणि शंकरराव चव्हाण असे दोन गट तयार झाले.

शंकरराव चव्हाण गट हा यशवंतराव चव्हाण यांचा विरोधी गट मानला जायचा. त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांचा पाठिंबा कायम शंकरराव चव्हाण गटाला राहिला.

माढा शरद पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी निवडणूक लढवण्याचं जाहीर करत नंतर माघार घेतल्याने माढा मतदारसंघ चर्चेत आहे. याठिकाणी भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादीतर्फे संजय शिंदे रिंगणात आहेत.

शरद पवारांचा मतदारसंघ असणाऱ्या माढ्यातील लढाई राष्ट्रवादी आणि भाजप दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

शरद पवार

माढ्यात करमाळा, माळशिरस, माढा, सांगोला हे सोलापुरातील चार तर साताऱ्यातील फलटण आणि माण हे विधानसभा मतदारसंघ येतात.

या मतदारसंघात दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे. मात्र चाराछावण्या अद्याप उभारलेल्या नाहीत. कांदा, गहू, ज्वारी आणि इतर शेतमालाला भाव मिळत नसून त्याचा थेट परिणाम निवडणुकांवर होऊ शकतो.

सांगलीत पडळकर भाजप-स्वाभिमानीला टक्कर देणार का?

सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील आणि वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर अशी तिहेरी लढत आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघावर गेल्या 60 वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता होती. यात 35 वर्षं माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचं सांगली लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व राहिलं आहे.

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला होता. आणि भाजपनं संजय पाटील यांच्या माध्यमातून हा गड काबीज केला.

खरंतर हा पराभव प्रतीक पाटील यांच्या एवढा जिव्हारी लागला की त्यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात फारसा संपर्क ठेवला नाही.

गोपीचंद पडळकर हे दुष्काळी भागातल्या आटपाडीचे आहेत. या आटपाडीतलं पडळकरवाडी हे त्यांचं गाव, त्याचं वैशिष्टय म्हणजे इथल्या एकूण 100 कुटुंबांमध्ये 40 जण डॉक्टर आहेत.

खानापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोनदा निवडणूकही लढवली आहे. 2009 मध्ये 'रासप'चे रिपब्लिकन डावे लोकशाही आघाडीतले उमेदवार मधून आणि 2014 मध्ये भाजपतर्फे पराभूत झाले, पण त्याच वेळेस वाढत गेलेल्या धनगर आरक्षण आंदोलनात त्यांचं नेतृत्व पुढे येत गेलं.

2012पासून ते आंदोलनात जास्त सक्रीय झाले. त्यामुळेच आता धनगर समाजाची अधिक मतं असलेल्या या पट्ट्यात त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.

पडळकरांचं राजकारणाव्यतिरिक्त नवं काम म्हणजे आता या निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात ते चित्रपटाचे लेखक, निर्माते आणि अभिनेतेही झाले आहेत. 4 एप्रिललाच त्यांचा पहिला मराठी चित्रपट 'धुमस' राज्यभर रिलीज झाला आहे. एकदम दक्षिण भारतीय स्टाईल ॲक्शन चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका केली आहे.

तिकडे साताऱ्यात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले लढत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे नरेंद्र पाटील तर वंचित आघाडीचे सहदेव एवळे आहेत.

कोकणात राणे विरुद्ध राऊत

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या तळकोकणात नितेश राणे आणि विनायक राऊत यांच्यात लक्षवेधी लढत आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांच्यसाठी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. 2005मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून राणे आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरूच आहे.

2009च्या निवडणुकीत डॉ. नीलेश राणे यांनी शिवसेनेचे उमेदवार सुरेश प्रभू यांना नमवण्याची किमया केली होती. राणे कुटुंबाची जादू 2014च्या निवडणुकीत कायम राहिली नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

नारायण राणे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

नाणार प्रकल्प रद्द करण्याची अधिसूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केली. शिवसेनेने नाणार प्रकल्पाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. काँग्रेसचा प्रभाव ओसरलेल्या काळात बांदिवडेकरांसाठीही अवघड आव्हान आहे. कोकण रेल्वे दुपदरीकरण, मुंबई-गोवा महामार्ग विस्तार, पश्चिम महाराष्ट्र कोकणला जोडणे, कोकणातून नियमित विमानसेवा सुरू करणं या मुद्यांवर ही निवडणूक लढवली जात आहे.

कोल्हापूरात शिवसेनेचे संजय मंडलिक आणि राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक समोरासमोर आहेत. या मतदारसंघात चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, दक्षिण कोल्हापूर आणि उत्तर कोल्हापूर असे विधानसभेचे मतदारसंघ आहेत.

हातकणंगलेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेने त्यांच्यासमोर धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने अस्लम बादशहाजी सय्यद यांना तिकीट दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)