मराठवाडा पाणीटंचाई: 38 लाख दुष्काळग्रस्त लोक टँकरच्या पाण्यावर भागवत आहेत तहान

  • निरंजन छानवाल
  • बीबीसी मराठी

मराठवाड्यातली 38 लाख लोकांची तहान भागवण्यासाठी सरकारी टँकरचा आधार घेतला जातोय... तेही आठवड्यातून एकदाच दोन ते तीन ड्रम पाणी मिळतं. पण या पाण्यामुळे गावकरी आजारी पडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. बीबीसी प्रतिनिधी निरंजन छानवाल यांचा हा ग्राउंड रिपोर्ट.

"सहा दिवसांनी दोन किंवा तीन ड्रम पाणी मिळतं. आरोग्याचं काय विचारता? मध्ये आमची तारांबळ चालू होती तर हे पाणी आम्ही पीत होतो. आमच्या पोराला आठ-नऊ हजार रुपये घातले आम्ही दवाखान्यात. डॉक्टर म्हणाले की जारचं पाणी पित जा, तेव्हापासून आम्ही तेच पितो," तांदूळवाडीच्या नंदाबाई सालगरे त्यांची व्यथा सांगत होत्या.

हे फक्त नंदाबाईंच्याच कुटुंबाबाबत होतंय, असं नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास एक हजार सरकारी टँकर सध्या पाणीपुरवठा करत आहेत. आठवड्यातून मिळणाऱ्या दोन-तीन ड्रम पाण्यात संपूर्ण कुटुंबाची गरज कशी भागवायची, याची चिंता एकीकडे आहेच. दुसरीकडे या पाण्यामुळे नको त्या आजारांना आमंत्रण मिळतंय.

फोटो कॅप्शन,

मराठवाड्यात आठवड्यातून एकदाच टँकरचं पाणी मिळतं.

गंगापूर तालुक्यात तुम्ही टंचाईग्रस्त गावांना भेट दिली तर अशाच पद्धतीच्या तक्रारी तुम्हाला ऐकायला मिळतील. गोदावरी नदी पात्रातील स्रोतातून तालुक्यामध्ये सरकारी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

गंगापूर-लासूर स्टेशन रस्त्यावर धावणारे टँकर आणि रस्त्यांवर मांडून ठेवलेले ड्रम दुष्काळाची दाहकता दर्शवण्यास पुरेसे आहेत.

फोटो कॅप्शन,

नंदाबाई सालगरे टँकरचं पाणी का नको याविषयी बोलता

रस्त्यावरच्या तांदूळवाडी गावात पोहोचलो तेव्हा सगळीकडे घरासमोर ड्रम रचून ठेवलेले होते. गावातल्या पाणीटंचाईवर महिला भरभरून बोलत होत्या. आठवड्यातून एकदाच टँकरने पाणी मिळतं. तेही दोन किंवा तीन ड्रम. साधारणतः चारशे ते पाचशे लीटर. हे पाणी पिण्यासाठी वापरणं आता गावकऱ्यांनी बंद केलं आहे.

असं फक्त याच गावात होत नाही. जवळपास प्रत्येक गावात तुम्हाला हे ऐकायला मिळेल.

मराठवाड्यात लोकांनीच पाणीटंचाईवर पर्याय शोधला आहे. सरळ वीस रुपयांचा एक पाण्याचा जार विकत घ्यायचा. ते पाणी पिण्यासाठी वापरायचं. कुटुंब मोठं असेल तर रोजचा खर्च दुप्पट.

फोटो कॅप्शन,

आशाबाई सारख्यांना टँकरचं पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो

पण सर्वांनाच हा पर्याय परवडणारा नाही. आशा राशिनकर सांगतात, "घराकडे चला. तुम्हाला टँकरचं पाणी कसं मिळतं, ते दाखवते." त्या क्षारयुक्त पाणी प्यायला देतात.

"गावात तीन वर्षांपासून पाणी टंचाई आहे. ज्याच्याकडं पैसे आहेत ते जारचं पाणी पितात. आमची हिंमत नाही होत. मग आम्ही टँकरचंच पाणी पितो. सिमेंटसारखा थर या पाण्यावर जमतो, पण आम्ही सहन करतो," आशाबाई सांगत होत्या.

त्यांच्यासाठी समाधानाची बाब एकच आहे. "आम्ही घरात दोनच जण असल्यानं दोन ड्रम पाणी आम्हाला पुरतं," त्या सांगतात. घरात संडास नाही, हेही एक कारण त्यामागे आहे.

अनिता म्हस्के यांचा प्रश्न असतो, "रोजचे वीस रुपये म्हणजे मोठा खर्च. साठ-सत्तर रुपये कुठून आणायचे? "

आता गावात टँकर आलं की पूर्वीसारखं टँकरवर गर्दी तुटून पडत नाही. कोणत्या भागात कोणत्यादिवशी टँकरने पाणी मिळेल, याचं नियोजन केलं जातं. घरासमोर ठेवलेले ड्रम भरून दिले जातात किंवा थेट गावाच्या विहीरीमध्ये पाणी ओतलं जातं. तिथून तुम्ही तुमचं भरा, असा सोईचा उपाय.

फोटो कॅप्शन,

पिण्याच्या पाण्यासाठी आता जारचं पाणी वापरण्याचा पर्याय नागरिकांनीच शोधला आहे

याच रस्त्यावर पुढे शेकटा गाव आहे. गावात नुकताच टँकर आलेला. मुख्य रस्त्यावरच अंगणवाडीसमोरच्या मोकळ्या जागेत काही मुलं खेळत होती. टँकर आल्याने अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी रस्त्यावर पिंप आणून ठेवला.

"मुलं हे पाणी पितात काय?" त्यांना प्रश्न केला. समोरून उत्तर आलं "नाही. नाही. "टँकरचं पाणी खराब असतं. ते वापरायला लागतं. आम्ही मुलांसाठी घरून जारचं पाणी आणतो."

शेकट्याहून थोडं पुढं गेलं की उजव्या हाताला आडवाटेवर गोळेगाव आहे. गावात प्रवेश करतानाच दूरवरून कोरडाठाक पडलेला तलाव नजरेस पडतो. याच तलावाच्या पात्रात हातपंपावर काही महिला कपडे धुताना दिसतात. थोडं पुढे एका विहिरीवर हेच चित्र.

गावाला मिळणारं टँकरचं पाणी या विहिरीत आणून टाकलं जातं. याच ठिकाणी झुंबरबाई धोंदे भेटल्या. "इथं पाण्याचा फार त्रास आहे. दवाखान्यात नेलं तरी हातपाय गळून जातात," त्या तक्रार करतात.

"पाणी एकदम चिकट असतं. या पाण्याने हगवण लागते. गोळेगावात पुष्कळ जणांना हा त्रास आहे. काहीतरी करा. आम्ही मरायला लागलो."

फोटो कॅप्शन,

विहीरींमध्ये टँकरने पाणी आणून टाकायचं आणि तिथून नागरिकांनी ते न्यायचं

गंगापूर तालुक्यातली 2 लाख 32 हजार लोकसंख्या सरकारी टँकरचं पाणी वापरते. इथं सध्या 166 गावं आणि वाड्यांना 156 टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

गंगापूरमध्ये वैद्यकीय प्रॅक्टीस करणारे डॉ. नितीन वालतुरे यांच्याकडे पोटाच्या विकाराने त्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याचं ते सांगतात.

"पाण्याचे स्रोत हे नदीकाठी किंवा नाल्याकाठी आहेत. त्यातच याठिकाणी दूषित पाणी वाहून जात असल्यानं नंतर तेच पाणी नागरिकांना पुरवलं जातं. त्यामुळे तालुक्यात सध्या सध्या टायफाईड, काविळ, जुलाबाचे रुग्ण वाढले आहेत," अशी माहिती ते देतात.

"जारच्या पाण्याबद्दलही काही शंका आहेत. जे जारचं पाणी वापरले जातं, ते शुद्ध असेलच, याची शाश्वती नाही," असा दावा ते करतात.

पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये फिरत असताना आम्ही लोकांना या टंचाईवर प्रचारासाठी येणारे नेते काही बोलतात का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सरळ नाही असंच उत्तर दिलं.

38 लाख लोकसंख्येची भिस्त टँकरवर

मराठवाड्यात सध्या 2,400 सरकारी टँकर पाणीपुरवठा करत आहेत. जवळपास 38 लाख लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवंलबून आहे.

फोटो कॅप्शन,

मराठवाड्यातली 36 लाख लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे

औरंगाबाद जिल्ह्यातली 14 लाख 55 हजार लोकसंख्या यावर अवलंबून आहे. त्याखालोखाल बीड जिल्ह्यातली 10 लाख 50 हजार लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ही सगळी सरकारी आकडेवारी आहे.

दर आठवड्याला सव्वा दोन लाख लोकसंख्या टंचाईग्रस्तांच्या यादीत जोडली जाते. अजून मे महिना जायचा आहे. जून महिन्यातही वेळेवर पाऊस झाला तर ठीक, अन्यथा...

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)