लोकसभा निवडणूक 2019 : ‘मतदानाआधीच आम्ही नेत्यांकडून कामं करून घेतो’

  • नीलेश धोत्रे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी

'जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीसाठी आज मतदान सुरू झालं आहे'. 11 एप्रिल म्हणजे पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झालं, तेव्हा बीबीसी वर्ल्डसह अनेक आंतरराष्ट्रीय चॅनल्सवर याच मथळ्याखाली बातम्या दिल्या जात होत्या.

सर्वच चॅनल्सवर त्यांचे प्रतिनिधी लाईव्ह रिपोर्टिंग करत होते, वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. 'बीबीसी वर्ल्ड न्यूज'च्या वेबसाईटवरही टॉपची बातमी भारतात होत असलेल्या 17व्या लोकसभेच्या मतदानाचीच होती.

भारतीय निवडणुकांना जगात किती महत्त्व आहे आणि आपली लोकशाही किती मोठी आहे, हे पाहताना बरं वाटत होतं. एक भारतीय म्हणून त्याचा अभिमान सुद्धा वाटला.

पण त्याच्या पुढच्या एका आठवड्यातच माझ्या या भ्रमाचा भोपळा फुटला आणि आपण नेमकी कुठल्या प्रकारची लोकशाही आहोत, असा प्रश्न मला पडला. त्याची कारणंही तशीच आहेत.

निवडणुकांच्या वार्तांकनासाठी मी सुरत ते गोवा असा प्रवास कधी एसटी तर कधी ट्रेनने केला.

या प्रवासात मला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटली. त्यांचे वेगवेगळे विचार, चर्चेचे मुद्दे आणि काही मतं लक्षात राहणारी होती. काही तरुणांचे विचार तर खरंच आपल्याला विचारात पाडणारे होते.

'निवडणुकांमुळे गावात तेढ'

नाशिक ते रत्नागिरीच्या प्रवासात एक कॉलेज तरुण भेटला. कॉलजला सुट्ट्या असल्यामुळे कुठल्या तरी कांप्युटर कोर्ससाठी शहापूरहून भिवंडीला चालला होता. त्याच्या आग्रहाखातर त्याची ओळख मी इथं सांगत नाहीये.

त्याच्याशी बोलताबोलता अर्थातच लोकसभा निवडणुकांचा विषय निघाला तेव्हा त्याने एकंदरच निवडणुकांविषयी नाराजीचा सूर लावला.

"आमचं गाव वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागलं गेलंय. गावात 150 घरं आहेत. प्रत्येक पक्षाकडे साधारण 20-25 घरं आहेत. निवडणुकांच्या काळात एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता रात्री दारू पिऊन येतो आणि शिवीगाळ करतो. त्यातून कधीकधी भांडणं उद्भवतात. गावात प्रत्येकाला नेता व्हायचंय. निवडणुका म्हटलं की गावात भांडणं ही आलीच," तो सांगत होता.

पण ही काही प्रत्येक गावाची स्थिती नाही. काही गावं अशी सुद्धा आहेत जिथे खूपच चांगलं ऐक्य दिसून येतं. जे कधी कधी मोठ्या नेत्यांना (आर्थिकदृष्ट्या) भारी पडतं.

'संपूर्ण गावाचं मतदान एकाच ठिकाणी'

पुढचा प्रवास होता चिपळूणपासून रत्नागिरीपर्यंत. संध्याकाळची बहुदा ती शेवटची बस होती, म्हणून तुडुंब गर्दी होती.

प्रवास करताना संमेश्वर तालुक्यातील एक मुलगा माझ्या शेजारच्या सीटवर बसला. 19 वर्षांचा हा तरुण मुंबईत शिक्षण घेत आहे. हनुमान जयंतीनिमित्त होणाऱ्या स्पर्धांसाठी तो मुंबईहून गावी चालला होता.

फोटो कॅप्शन,

प्रतिनिधिक फोटो

निवडणुकांविषयी विचारलं तेव्हा "आमचं गाव एकत्र बसून कुणाला यंदा मतदान करायचं याचा निर्णय घेतं," असं सांगू लागला.

असं कसं? मला प्रश्न पडला. तेव्हा तो सांगू लागला, "आमच्या गावात एक शिक्षक आहेत, त्याचं सगळं गाव ऐकतं. ते सांगतात त्यांनाच सर्वजण मतदान करतात. सर्व नेते मंडळी त्या शिक्षकांनाच येऊन भेटतात. मग गावात कुठलं रस्त्याचं किंवा गावाच्या गरजेचं वगैरे काम बाकी असेल तर ते आम्ही त्यांच्याकडून करवून घेतो आधी आणि मगच आम्ही त्यांना मतदान करतो."

पण नेत्यांनी कामं तर निवडून आल्यानंतर करायची असतात. मग आधीच कशी ते कामं करतात, पैसे कुठून येतात, असा सवाल मी त्याला केला.

"नेत्यांकडे फार पैसे असतात हो," असं उत्तर त्यानं दिलं.

'असंही एकगठ्ठा मतदान'

रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगडमध्येही मी गेलो. तिथं एका आदिवासी पट्ट्यात फिरत असताना एका महिलेनं सांगितलं, "मतदानाच्या दिवशी एखाद्या पक्षाची गाडी येते. सर्वांना त्यात भरलं जातं आणि कुठलं बटण दाबायचं ते सांगितलं जातं."

याच मंडणगडमधून परतीचा प्रवास करत असताना दुपारी 12च्या भर उन्हात मला एक आजीबाई छत्रीखाली बसलेल्या दिसल्या. 70च्या आसपास वय असलेल्या त्या आजींनं छोटंसं दुकान लावलं होतं.

तिची थोडी विचारपूस केली, काय विकत आहात पाहिलं. तेव्हा त्यांनी काजळ, गंध, टिकल्या, चाप वगैरेचं दुकान लावलं होतं.

मग त्यांनी मतदानाचं काही ठरवलंय का, असं विचारल्यावर कळलं की या आजीबाईला ना विधानसभा माहिती ना लोकसभा, जिल्हा परिषद वगैरे काय असतं, हेही काही माहिती नव्हतं. "घरचे जिथं सांगतात, तिथंच आजपर्यंत मतदान केलं," असं त्या आजींनी सांगितलं.

'लोकांमध्ये उत्सुक्ता नाही?'

अर्थात अनेकांशी बोलताना एक गोष्ट जाणवली की लोक राजकीय मुद्द्यांवर चर्चा करायला लोक यंदा फारसे उत्सुक नाहीत. पूर्वी निवडणुकांच्या काळात लोक अप्रत्यक्षरीत्या का होईना, त्यांचा कल कुठेय, हे सांगायचे.

यंदा मात्र त्यांची मतं मांडताना खूप विचार करत आहेत. सुरतपासून ते अगदी गोव्यापर्यंत, साधारण 900 किलोमीटरच्या प्रवासात क्वचितच कुणीतरी आपला कल स्पष्ट सांगितला असेल.

गुजरातच्या तापी जिल्ह्यात तर एका आदिवासी पाड्यावर मी ज्यांना भेटलो, त्यांनी तर त्यांची मतं मांडण्याआधी माझ्याकडेच संशयाच्या नजरेनं पाहिलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)