मुंबई लोकल अपघातात गमावलेला हात चयांकला परत मिळाला

  • कमलेश
  • बीबीसी प्रतिनिधी
चयांक कुमार

फोटो स्रोत, chayank kumar

फोटो कॅप्शन,

चयांक यांचा हात पुन्हा काम करू लागला.

"तो 10 एप्रिल 2018 चा दिवस होता. मी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी निघालो. मी रोज ट्रेनने कॉलेजला जायचो. त्या दिवशीसुद्धा मी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात ट्रेन सुटली आणि माझा पाय घसरला. मी ट्रेन आणि ट्रॅकच्या मध्ये अडकलो. ट्रेन माझ्या डाव्या हातावरून गेली आणि माझा हात कोपरापासून वेगळा झाला. मात्र, माझी बॅग ट्रेनमध्ये अडकल्याने मी ट्रेनसोबत फरफटत गेलो."

मुंबईत राहणारे चयांक कुमार यांना एवढ्या मोठ्या अपघातात आपला हात गमवावा लागला असता. मात्र, वेळेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याने त्यांना त्यांचा हात परत मिळाला. चयांक यांचा तुटलेला हात फक्त जोडला नाही तर सहा महिन्यांनंतर त्यात हालचालही जाणवू लागली.

या अपघाताबाबत चयांक सांगतात, "मी ट्रेनपासून वेगळा झालो तेव्हा माझ्या लक्षात आले की माझा हात तुटून थोड्या अंतरावर पडला होता. माझ्या हातातून खूप रक्त येत होतं आणि तीव्र वेदना होत होत्या. माझी शुद्ध हरपणार होती. मात्र, सगळी ताकद एकवटून मी उठलो, हात उचलला आणि प्लॅटफॉर्मकडे धावलो. मी एकाला मला वर ओढायची विनंती केली. मी कसाबसा प्लॅटफॉर्मवर बसलो आणि आईला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्या हाताला इतकं रक्त लागलं होतं की फोनही अनलॉक झाला नाही. तिथेच उभ्या असलेल्या एकाच्या मदतीने मी आईला कॉल केला."

तुटलेला अवयव पुन्हा कसा जोडतात, याची काहीच कल्पना चयांकला नव्हती. यात रेल्वे कर्मचारी आणि सरकारी हॉस्पिटलने त्याला मदत केली.

फोटो स्रोत, Kamlesh

फोटो कॅप्शन,

चयांक कुमार आईबरोबर

चयांक सांगतात,"मी आईला कॉल करत होतो तोवर स्टेशन मास्तर आणि जीआरपी पोलीस आले. मला स्टेचरवरून अॅम्ब्युलन्समध्ये नेण्यात आले आणि जवळच्याच सरकारी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. तिथून माझी आई मला कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथे माझ्या हातावर जवळपास आठ तास सर्जरी झाली. त्यानंतर आणखी तीन सर्जरी करण्यात आल्या."

चयांक यांचा हात सर्जरीनंतर लगेच बरा झाला नाही. त्या हातात संवेदना आणि हालचाल जाणवण्यासाठी सहा महिने लागले.

चयांक सांगतात, "सर्जरीनंतर हातात काहीच संवेदना नव्हती. काहीच जाणवत नव्हतं. नंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बोटांची हालचाल होऊ लागली. आता तर हाताला थंड-गरम संवेदना कळते. कुणी स्पर्श केला तर तेही जाणवतं. पूर्ण हालचाल होत नाही. मात्र, सुधारणा आहे. कधी कधी वाटायचं हात बरा होईल की नाही. मात्र, माझ्या आईने नेहमी माझी हिंमत वाढवली. मला धीर दिला."

इंजीनिअरिंग करणाऱ्या चयांक यांचा हात तर वाचला. मात्र, पुरेशी माहिती नसल्याने अशा अपघातांमध्ये बरेच जणांना आपला अवयव पुन्हा जोडता येत नाही. तो कायमचा गमवावा लागतो. शरीरापासून पूर्णपणे तुटलेला अवयव पुन्हा जोडता येतो. मात्र, त्यासाठी काही खबरदारी घ्यावी लागते.

फोटो स्रोत, Universal Images group

फोटो कॅप्शन,

चयांक कुमार यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये चयांक यांच्या हातावर सर्जरी करणारे प्लास्टिक सर्जन डॉ. काजी अहमद सांगतात की वेळेत आणि योग्य प्रकारे हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याने चयांकचा हात बचावला. अपघात झाल्यानंतर चार तासाच्या आत सर्जरी झाली होती.

अशा घटनांमध्ये बाळगावी लागणार खबरदारी आणि या विशेष सर्जरीविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

तुटलेला अवयव कसा ठेवावा?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

तुटलेला अवयव खराब होण्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये आणून सर्जरी करणं, सर्वात जास्त गरजेचं आहे. अवयव शरिराशी जोडलेला असतो तोवर रक्तप्रवाहाच्या माध्यमातून पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. मात्र, अवयव तुटल्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने पेशी मरू लागतात.

पेशी पूर्णपणे निष्क्रीय होण्याआधी अवयवाला शरिराशी जोडणे गरजेचं आहे, जेणेकरून रक्तप्रवाह पुन्हा सुरू व्हावा. त्यामुळे जो अवयव तुटला आहे तो थोडा थंड रहावा आणि त्याचं मेटॅबॉलिझम सुरू रहावं म्हणजे त्यात प्राण असावा, याकडे लक्ष देणं, गरजेचं आहे.

यासाठी तुटलेल्या अवयवाला सलाईन किंवा स्वच्छ पाण्याने धुवावं. यानंतर स्वच्छ कापडात हलकेच गुंडाळावे. जास्त घट्ट बांधू नये. ओला रुमाल किंवा टॉवेलचा वापर करू शकतो. यानंतर त्याला एका पॉलिथिनमध्ये टाकावं. हे पॉलिथीन पाणी आणि बर्फ असलेल्या दुसऱ्या एका पॉलिथीनमध्ये टाकावं. असं केल्यामुळे तुटलेला अवयव थेट बर्फाच्या संपर्कात न येताही थंड राहील.

तुटलेल्या अवयवाला थेट बर्फाच्या संपर्कात ठेवू नये. बर्फ गोठल्याने अवयव खराब होतो. अवयवाला कोल्ड इंज्युरी होऊ शकते. अवयव थंड ठेवल्याने त्याचं मेटाबोलिझम सुरू राहतं आणि त्यामुळे निष्क्रीय होण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे सर्जरी यशस्वी होण्याची शक्यता वाढते.

तर शरिराला जोडून असलेल्या अवयवातून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी तो ओल्या स्वच्छ कापडात गुंडाळावा. त्यावर हलक्या दाबाने ड्रेसिंग करावी. रक्तस्त्राव थांबला नाही तर जीवावर बेतण्याची शक्यता असते. गुप्तांग कापल्यावरही हीच प्रक्रिया होत असते.

वाचवण्यासाठी किती वेळ असतो?

तुटलेल्या अवयवाची किती वेळात सर्जरी व्हायला हवी, हे कुठला अवयव तुटला आहे, यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ बोट तुटलं असेल तर त्याला योग्य प्रकारे प्रिजर्व केल्यास सर्जरीसाठी दहा ते बारा तासही मिळतात. अनेकदा 24 तासातही तुटलेलं बोट पुन्हा जोडलं जाऊ शकतं.

मात्र, अंग जेवढं वरच्या भागातलं असेल त्यावर सर्जरी करण्यासाठी तेवढा कमी वेळ असतो. उदाहरणार्थ कोपर किंवा पूर्ण हातच तुटला असेल तर सर्जरीसाठी जास्तीत जास्त चार तास मिळतात. वेळेत हात जोडणं गरजेचं असतं. कारण ज्या अवयवात जास्त स्नायू असतील त्यांना वाचवण्यासाठी तेवढाच कमी वेळ असेल.

सर्जरी कशी होते?

इतर सर्जरीमध्ये होते तशी स्टिचिंग या सर्जरीमध्ये होत नाही. ही मायक्रोव्हस्क्युलर सर्जरी असते. ही नस जोडण्याची प्रक्रिया आहे. यात अत्यंत बारिक नस आणि नळ्या जोडल्या जातात. ही सर्जरी ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या मदतीने केली जाते आणि रक्तप्रवाह पुन्हा सुरू व्हावा, यासाठी या सर्जरीमध्ये केसाहूनही पातळ धाग्याने स्टिचिंग करतात.

सामान्य जखमांवर ज्या धाग्यांनी टाके लावतात, त्या धाग्यांनी या सर्जरीत टाके लावत नाहीत. हे टाके काढतही नाहीत. हे धागे शरिरात राहूनच जोडलेल्या स्नायूंना आधार देतात. मायक्रोव्हस्क्युलर सर्जनच ही सर्जरी करू शकतात.

सर्जरीनंतर कोणती काळजी घ्यावी?

तुटलेला अवयव पुन्हा पूर्णपणे बरा होण्यासाठी किती वेळ लागेल हे जखम किती मोठी आहे, यावर अवलंबून असतं. जखम जेवढी मोठी तेवढा जास्त वेळ लागतो. पुढचा मार्गही थोडा खडतर असतो. मात्र, हळूहळू रिकव्हरी होते. नंतरदेखील छोट्या-मोठ्या सर्जरीची गरज भासू शकते.

फोटो कॅप्शन,

सर्जरीआधी आणि नंतर काळजी घ्यावी लागते.

शरिराला जोडल्यानंतर तो अवयव पूर्णपणे निष्क्रीय वाटतो. त्यात पुन्हा संवेदना जाणवण्यासाठी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. सर्जरी योग्य प्रकारे झाली असेल तर बहुतांशवेळा अवयवात संवेदना येते. अधेमधे ही संवेदना कमी-जास्त होत असते. या उपचार पद्धतीत ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्टचीेदेखील मदत लागते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)