साध्वी प्रज्ञा ठाकूरविरोधात एफआयआर, बाबरी प्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल कारवाई #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

प्रज्ञा ठाकूर

फोटो स्रोत, Getty Images

1. साध्वी प्रज्ञा ठाकूरविरोधात FIR, बाबरी प्रकरणी केलेलं वक्तव्य भोवलं

बाबरी मशीद प्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं ही बातमी दिली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या प्रज्ञा ठाकूर यांना भाजपनं भोपाळमधून काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. 'आपण मशिदीच्या घुमटावर चढलो होतो, बाबरी उद्धवस्त करण्यासाठी हातभार लावल्याचा अभिमान वाटतो', अशी वक्तव्यं साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी केली होती.

'प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या वक्तव्यांबद्दल निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र त्यानं समाधान न झाल्यानं भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे,' असं भोपाळचे निवडणूक अधिकारी सुदाम खाडे यांनी सांगितलं.

2. सरन्यायाधीश गोगोईंवरील आरोपाचा कामकाजालाही फटका, संवैधानिक पीठासमोरील सर्व सुनावण्या रद्द

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप आणि त्याबद्दलच्या सुनावणीवरून झालेल्या वादाचा परिणाम न्यायालयाच्या कामकाजावरही पडला आहे. रंजन गोगोई यांनी या आठवड्यात संवैधानिक पीठासमोर होणाऱ्या सर्व सुनावण्या रद्द केल्या आहेत. 'नवभारत टाइम्स'नं ही बातमी दिली आहे. या आठवड्यात जमीन अधिग्रहण तसंच माहितीच्या अधिकारासंबंधातील काही याचिकांवर संवैधानिक पीठासमोर सुनावणी होणार होती.

फोटो स्रोत, Getty Images

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पाठिंबा दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयातील दोन वकिलांनी बार कौन्सिल ऑफ इंडियावर टीका केली आहे. रंजन गोगोई यांच्यावर न्यायालयातील एका महिला कर्मचाऱ्यानं लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ज्या पद्धतीनं 20 एप्रिलला या प्रकरणाची सुनावणी झाली, त्यावरही या दोन्ही वकिलांनी आक्षेप घेतला आहे. गौतम भाटिया आणि आशिष गोयल या दोन वकिलांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांना पत्र लिहून त्यांचे आक्षेप कळवले आहेत. 'स्क्रोल'नं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

न्यायालयीन प्रक्रियेनुसार अशा प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी अंतर्गत समितीची स्थापना केली जाणं आवश्यक असतं. मात्र सरन्यायाधीशांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करत विशेष पीठासमोर ही सुनावणी घेतली. स्वतः रंजन गोगोई या पीठाचे सदस्य होते, या बाबीकडेही भाटिया आणि गोयल यांनी बार कौन्सिलच्या अध्यक्षांचं लक्ष वेधलं.

3. गौतम गंभीरला भाजपकडून उमेदवारी, काँग्रेसकडून विजेंदर सिंह रिंगणात

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना भाजपनं दिल्लीमधून उमेदवारी जाहीर केली आहे. सोमवारी रात्री भाजपनं दिल्लीतील पाच जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली. 'लोकसत्ता'नं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून आहे तर मीनाक्षी लेखी नवी दिल्लीतून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांना चांदनी चौक तर मनोज तिवारी उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसनंही दिल्लीसाठी उमेदवार जाहीर केले असून ऑलिंपिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंहला दक्षिण दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. जाट आणि गुर्जर समुदायाची मतं मिळविण्याच्या हेतूनं काँग्रेसनं विजेंदर सिंहला मैदानात उतरवले आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'नं ही बातमी दिलीये. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित या उत्तर-पूर्व दिल्लीतून लढणार असून त्यांच्यासमोर भाजपच्या मनोज तिवारींचं आव्हान असेल.

4. नोटबंदीचा फटका बसल्यानं राज ठाकरे नाराजः देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, TWITTER

नोटाबंदीचा फटका बसल्यानं राज ठाकरे आमच्यावर नाराज झाले असावेत, असं वक्तव्यं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज ठाकरेंच्या सभा आणि प्रचाराचा भाजपला कोणताही फटका बसणार नाही, असा विश्वासही 'लोकसत्ता'ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे साटेलोटे असून विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे आघाडीसोबत गेलेले दिसतील, असे भाकीतही फडणवीस यांनी या मुलाखतीत केले. विरोधकांची कशी कोंडी झाली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

'नांदेडमध्ये भाजपच्या उमेदवारामुळे अशोक चव्हाणांना मतदारसंघातच अडकून पडावे लागले. बारामतीमध्ये कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान उभे केले असून मावळमधून लढणाऱ्या पुत्र पार्थ पवार यांचा प्रचार सोडून इतरत्र जाण्याची संधी अजित पवार यांना मिळत नाही. हे चित्र बोलके असून निकालात त्याचे प्रतिबिंब दिसेल,' असं फडणवीस यांनी म्हटलं.

5. धर्माच्या आधारे मतं मागितल्यानं नवज्योज सिंह सिद्धूंवर 72 तास प्रचारबंदी

आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगानं काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धूंवर कारवाई केली आहे. त्यांना 72 तासांसाठी कोणत्याही प्रकारे प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. 'इंडिया टुडे'नं हे वृत्त दिलं आहे.

बिहारमधील कठिहार येथील बारसोल आणि बरारीमधल्या प्रचारसभेतील सिद्धू यांच्या वक्तव्यांबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या सभांमध्ये बोलताना सिद्धू यांनी मुस्लिम मतदारांना असदुद्दिन ओवेसी यांचा पक्ष AIMIM ला मतं न देण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळं मतं विभागली जातील असं सांगून त्यांनी मुस्लिमांना काँग्रेसला मत देण्याची मागणी केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)