लोकसभा 2019 : देव आनंद ते उर्मिला मातोंडकर.. गोष्ट फिल्मी राजकारण्यांची

राजेश खन्ना

40 वर्षांपूर्वी... 14 सप्टेंबर 1979चा दिवस होता.

त्यावेळी मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये एक पत्रकार परिषद झाली होती. इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीनंतरचा तो काळ होता. त्यावेळी जनता पक्षाचा प्रयोगही फसला होता.

दोन्ही पक्षांवर नाराज असलेल्या काही लोकांनी एकत्र येत 'नॅशनल पार्टी' हा नवा पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली. या पक्षाचे अध्यक्ष होते देव आनंद.

पक्षाच्या 16 पानी जाहीरनाम्यात लिहिले होते, "इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाहीने त्रस्त जनतेने जनता पक्षाला निवडले. मात्री पदरी निराशाच पडली. आता हा पक्षही फुटला आहे. आता स्थिर सरकार देऊ शकणाऱ्या पक्षाची गरज आहे. असा पक्ष जो तिसरा पर्याय देऊ शकेल. नॅशनल पार्टी असं व्यासपीठ आहे जिथे समान विचारधारेची माणसं एकत्र येऊ शकतात."

या पक्षात व्ही. शांताराम, विजय आनंद, आयएस जौहर, जीपी सिप्पी यांच्यासह अनेक सिनेकलाकार होते. पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि प्रचार सुरू केला. गर्दी जमू लागली. मात्र, सिने व्यवसायाशी संबंधित लोकांना नंतर याचा तोटा सहन करावा लागेल, अशी कुजबूज सुरू झाली.

Image copyright MOhan Churiwala
प्रतिमा मथळा देव आनंदने पक्षाची स्थापना केली होती.

त्यानंतर एक-एक करत बरेज जण पक्षातून बाहेर पडले आणि अशाप्रकारे देव आनंद यांचं राजकीय स्वप्न आणि पक्ष दोन्ही संपुष्टात आले. मात्र, सिनेकलाकार आणि राजकारण यांचा हा पहिला आणि शेवटचा मिलाप नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वीपासून कलाकारांचा भारतीय राजकारणाशी संबंध होता.

इंदिरा गांधींची हत्या आणि राजकारणात सिनेकलाकार

80च्या दशकातच एक अशी राजकीय घडना घडली ज्याने सिने जगतावरही परिणाम केला. ती घटना होती ऑक्टोबर 1984मध्ये झालेली इंदिरा गांधी यांची हत्या. डिसेंबर 1984ला निवडणूक होणार होती. राजीव गांधी यांनी त्यांचे मित्र आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अमिताभ बच्चन आणि सुनील दत्त यांना निवडणूक लढण्याची विनंती केली.

सुनील दत्त 1984 च्या निवडणुकीत विजयी झाले आणि खासदार झाल्यावर पक्षातील नेत्यांशी मतभेद होऊनदेखील 2005साली मरेपर्यंत काँग्रेस पक्षातच होते.

सुनील दत्त यांनी 1984 मध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी डिसेंबरमध्ये त्यांच्या घरात एकीकडे त्यांची मुलगी नम्रता दत्त आणि कुमार गौरव यांच्या लग्नाची तयारी सुरू होती तर दुसरीकडे निवडणुकीची.

Image copyright facebook@PriyaDutt

सुनील दत्त त्या काही मोजक्या सिनेकलाकारांपैकी एक होते ज्यांना मंत्रीपदही मिळाले आणि राजकीय नेता म्हणून त्यांना मोठा मानही होता. 2004 साली पाचव्यांदा निवडणूक जिंकणाऱ्या सुनील दत्त यांना क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपद मिळाले.

निवडणूक प्रचारात अमिताभ बच्चन यांना 'नचनिया' म्हटले तेव्हा...

1984 मध्ये अमिताभ बच्चन इलाहाबादमधून हेमवती नंदन बहुगुणा यांच्याविरोधात निवडणुकीला उभे राहिले. ही त्यावेळची सर्वात मोठी बातमी होती.

ज्येष्ठ पत्रकार राशीद किदवई त्यांच्या 'नेता अभिनेता' या पुस्तकात लिहितात, "बहुगुणा दिग्गज नेते होते. ते निवडणूक प्रचारात अमिताभ बच्चन यांचा उल्लेख 'नवशिक्या' आणि 'नचनिया' असा करत. जया बच्चन यांनीच अमिताभ बच्चन यांच्या प्रचार मोहिमेत प्राण फुंकले आणि अमिताभ बच्चन निवडणूक जिंकले."

Image copyright Getty Images

मात्र, राजकारणाने अशी काही कूस बदलली की बोफोर्स घोटाळ्यात नाव आल्यानंतर खासदार अमिताभ यांचा राजकारणातून मोहभंग झाला आणि त्यांनी राजकारणाला रामराम ठोकला. त्यासोबतच गांधी घराण्याशी त्यांचे संबंधही दुरावत गेले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पुन्हा कधी सक्रीय राजकारणात भाग घेतला नाही.

राजेश खन्ना आणि अडवाणी यांच्यात चुरशीची लढत

राजकारणात नशीब आजमावणारे अमिताभ बच्चन एकटे सुपरस्टार नव्हते. 1991 साली निवडणुकीच्यावेळी अमिताभ बच्चन सिनेमा आणि राजकारण या दोघांपासून दूर गेले होते. ही लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची होती.

त्यावेळी राजीव गांधी यांनी राजेश खन्ना यांना लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात दिल्लीतून लढण्याची विनंती केली. कधीकाळी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन एकप्रकारे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते आणि बच्चन यांच्यानंतर राजेश खन्ना काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते, हा केवळ योगायोग होता.

Image copyright AFP

1991च्या निवडणुकीत राजेश खन्ना केवळ 1589 मतांनी हरले होते आणि अडवाणी जिंकले.

1991चा तो फोटो फार प्रसिद्ध झाला होता. या फोटोत राजीव गांधी आणि सोनिया गांधी दिल्लीतल्या निर्माण भवन मतदारसंघात राजेश खन्ना यांना मत देत आहेत आणि मागे राजेश खन्ना उभे आहेत.

राशीद किदवई आपल्या पुस्तकात लिहितात की राजीव गांधी यांच्या सार्वजनिक जीवनातला हा शेवटचा फोटो होता. या फोटोच्या काही तासातच एका आत्मघातकी हल्ल्यात राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता आणि 21 मे रोजी राजेश खन्नांसोबतचा त्यांचा हा फोटो वर्तमानपत्रांमध्ये छापून आला.

भाजपपासून काँग्रेसपर्यंत शत्रुघ्न सिन्हांचा प्रवास

1992 साली पोटनिवडणूक झाली आणि राजेश खन्ना यांनी पुन्हा निवडणूक लढवली. त्यांनी त्यांचे मित्र आणि भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचा पराभव केला. शत्रुघ्न सिन्हा त्या मोजक्या सिनेकलाकारांपैकी होते ज्यांनी सत्ताधारी नव्हे तर विरोधी पक्षातून राजकारणात प्रवेश केला.

Image copyright Getty Images

आणीबाणीच्या काळात त्यांचावर जेपींचा प्रभाव पडला. मात्र, नव्वदीच्या दशकात त्यांना भाजपचा हात धरला. लोकसभा निवडणुकीत राजेश खन्नांनी त्यांचा पराभव केला. मात्र, अडवाणी-वाजपेयी यांचे ते निकटवर्तीय होते.

शत्रुघ्न सिन्हा पहिले सिनेकलाकार होते जे मंत्री (2003-04) झाले आणि अनेक वर्ष खासदार होते. मात्र, मोदींच्या काळात ते आपल्याच पक्षात बाजूला फेकले गेले. कधीकाळी काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीचा विरोध करणारे शत्रुघ्न सिन्हा 2019मध्ये काँग्रेसवासी झाले, हा काळाचा महिमाच म्हणावा.

विनोद खन्ना : सिनेमा, सन्यास आणि संसद

70-80च्या दशकात एकत्र काम करणारे अनेक सिनेअभिनेते राजकारणात आले, हादेखील एक विचित्र योगायोग आहे. अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यानंतर विनोद खन्ना यांचाही राजकारणात चांगलाच जम बसला.

80च्या दशकात तर सिनेमातून सन्यास घेऊन ते ओशो आश्रमात गेले. मात्र, पंजाबी कुटुंबातून येणाऱ्या विनोद खन्ना यांनी बाहेरचे असूनही पंजाबमधील गुरुदासपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली.

Image copyright Photoshot

2009ची निवडणूक सोडली तर मरेपर्यंत ते गुरुदासपूरमधून खासदार होते आणि परराष्ट्र राज्यमंत्रीही झाले. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक पुल उभारण्यात आले आणि त्यांना 'सरदार ऑफ ब्रिज' असंही म्हटलं गेलं.

'ड्रीम गर्ल'चा राजकारणात प्रवेश

जेव्हा विनोद खन्ना 1999मध्ये भाजपकडून निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांनी हेमा मालिनी यांना त्यांच्यासाठी प्रचार करण्याची विनंती केली. हेमा मालिनी यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता.

सुरुवातीच्या किंतु-परंतुनंतर त्यांनी विनोद खन्ना यांच्यासाठी प्रचार केला आणि इथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

Image copyright Getty Images

हेमा मालिनी यांनी लवकरच भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्यसभेवर गेल्या.

2014च्या निवडणुकीत त्यांनी मथुरामधून जाट नेता जयंत सिंह यांचा तीन लाख मतांनी पराभव केला. मात्र, त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. कधी वृंदावनमधल्या वृद्धांविरोधात दिलेलं वक्तव्य तर कधी त्यांच्या कारच्या धडकेत ठार झालेल्या मुलीवर दिलेलं वक्तव्य, यावरून बरीच टीका झाली.

गर्दीची भीती वाटणाऱ्या जया बनल्या नेत्या

महिला राजकारण्यांविषयी सांगायचे तर सिने जगतातून आलेल्या जया प्रदा यांनीदेखील स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. हिंदी आणि तेलुगू सिनेमांमध्ये जया प्रदा फारच लोकप्रिय होत्या.

पाच सिनेमांमध्ये जया प्रदा यांच्या नायकाची भूमिका बजावणाऱ्या एनटीआर यांच्या आग्रहानंतर 1994 मध्ये त्यांनी तेलुगू देसम पक्षात प्रवेश केला.

राजकारणाचा अनुभव नसल्याने सुरुवातीला त्यांच्यावर बरीच टीकाही व्हायची. मात्र, हळूहळू त्या पक्षाच्या स्टार प्रचारक बनल्या. 1996 मध्ये जया प्रदा राज्यसभेत गेल्या.

त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मोठा बदल झाला तो समाजवादी पक्षात गेल्यानंतर.

Image copyright Getty Images

"मला विश्वास आहे की रामपूरचे लोक आपल्या मुलीला रिकाम्या हाताने पाठवणार नाही..." गर्दीत बोलायला घाबरणाऱ्या जया प्रदा यांच्यात रामपूरमध्ये येताच आत्मविश्वास दिसू लागला.

दक्षिण भारतातून आलेल्या जया प्रदा यांनी 2004 आणि 2009 साली उत्तर प्रदेशातल्या रामपूरमधून निवडणूक जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

समाजवादी पक्षात आजम खान यांच्याशी त्यांचे सूर कधीच जुळले नाही. त्यामुळे अखेर त्या सपामधून बाहेर पडल्या. 2019मध्ये जयाप्रदा यांनी भाजपकडून रामपूरमधून निवडणूक लढवत आहेत.

काँग्रेसची कौरवांशी तुलना करणारे राज बब्बर

समाजवादी पक्षाचा उल्लेख आल्यावर राज बब्बर यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. राष्ट्रीय नाट्य संस्था (NSD) च्या काळापासूनच बेधडक अशी त्यांची ओळख.

80च्या दशकात राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचं प्रेम आकार घेऊ लागलं होतं. स्मिता पाटील यांचे वडील शिवाजीराव पाटील काँग्रेसचे नेते होते. 'नेता अभिनेता' या पुस्तकात लेखक राशीद किदवई लिहितात, "1984 मध्ये सुनील दत्त काँग्रेसमधून निवडणूक लढवत होते त्यावेळी शिवाजीराव यांच्यासोबत त्यांची मुलगी स्मिता आणि तरुण तडफदार राज बब्बर हेदेखील गल्लोगल्ली फिरून प्रचार करायचे."

Image copyright Getty Images

मात्र, 1987 मध्ये व्ही. पी. सिंह यांनी राजीव गांधींची साथ सोडून जनमोर्चाची स्थापना केली त्यावेळी राज बब्बर यांनी सिंह यांचा हात धरला. त्यावेळी राज बब्बर यांनी काँग्रेसची तुलना कौरवांशी केली होती. मात्र, लवकरच राज बब्बर समाजवादी पक्षात गेले.

सपामध्येही ते फार दिवस टिकले नाही. अखेर त्यांनी त्याच काँग्रेस पक्षात प्रवेश केला जिचा प्रचार त्यांनी 80च्या दशकात केला होता.

नाटकातून सरदार पटेलांना हेलावून टाकणारे पृथ्वीराज कपूर

संसद आणि सिनेकलाकारांविषयी सांगायचे तर हे अंतर सर्वात आधी कापलं ते पृथ्वीराज कपूर यांनी. 1952 साली त्यांना राज्यसभेसाठी नामांकित करण्यात आलं होतं.

पाकिस्तानात जन्मलेले पृथ्वीराज कपूर यांनीही राजकारणात उडी घेतली होती. स्वातंत्र्यापूर्वीच्या तणावाच्या काळात त्यांनी हिंदू-मुस्लीम एकतेवर एक दमदार नाटक सादर केलं - दिवार. हे नाटक काँग्रेसच्या कार्यकारी समितीसमोर सादर करण्यात आलं.

'कपूरनामा या आपल्या पुस्तकात मधु जैन लिहितात, "हे नाटक बघितल्यानंतर सरदार पटेल फारच विचलित झाले होते. काँग्रेस अनेक वर्षात जे करू शकली नाही ते या नाटकाने करून दाखवलं, असंही ते म्हणाले. पटेल अर्धा तास बोलत होते."

पृथ्वीराज कपूर यांचे जवाहरलाल नेहरू यांच्याशीदेखील सलोख्याचे संबंध होते. कपूरनामामध्ये एक किस्साही त्यांनी सांगितलाय, "नेहरूंनी एकदा पृथ्वीराज कपूर यांना म्हटलं होतं की तुम्ही माझ्यासोबत चालता तेव्हा माझी हिंमत वाढते."

त्याकाळी सिनेमांमधून संसदेत गेल्याने त्यांच्यावर टीकाही झाली होती. मात्र पृथ्वीराज कपूर संसदेत दमदार भाषण करायचे आणि दिल्लीतील प्रिंसेस पार्कमध्ये राहायचे त्यावेळी लोकांना भेटायचे.

नेहरुंच्या विनंतीवरून दिलीप कुमार यांनी केला प्रचार

पृथ्वीराज कपूर यांच्याचमुळे सिनेकलाकारांना रेल्वे तिकिटात 75 टक्के सवलत मिळाली. कपूर घराण्याचे निकटवर्तीय दिलीप कुमार कुठल्या पक्षात गेले नाहीत. मात्र, त्यांच्यावरही नेहरुंचा मोठा प्रभाव होता.

1962 साली नेहरू यांच्या विनंतीवरून त्यांनी उत्तर मुंबईतून वी. के. कृष्णा मेनन यांच्यासाठी आणि जे. बी. कृपलानी यांच्याविरोधात प्रचार केला.

हिंदी सिनेजगतातून पहिली महिला खासदार होण्याचा मान 1980 साली नर्गिस यांना मिळाला. त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत अनेक सिनेमात काम केलं होतं.

Image copyright Saira Bano

त्याकाळात नर्गिस यांनी सिनेमा सोडून स्वतःला समाजकारणात झोकून दिलं होतं. इंदिरा गांधी यांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं. मात्र, 1981 साली त्यांचा मृत्यू झाला.

राजकारणात फसलेले अभिनेते

राजकारणात अपयश बघणारेही अनेक अभिनेते आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर धर्मेंद्र बिकानेरहून खासदार झाले. मात्र, त्यानंतर त्यांच्या कामावर नाराज असलेल्या त्यांच्या मतदारांनी 'आमचा खासदार गायब आहे', अशी पोस्टरबाजी केली.

फिल्मस्टार गोविंदा यांनी राम नाईकांचा पराभव केला होता. मात्र तरीही त्यांची राजकीय कारकीर्दही फ्लॉप ठरली.

Image copyright Govinda

हिंदी व्यतिरिक्त इतर भाषिक सिनेसृष्टीतूनही अनेकांनी राजकारणात प्रवेश केला आहे. जयललिता, एनटीआर, करुणानिधी, एमजीआर... दक्षिणेत तर हा इतिहास फार मोठा आहे.

दक्षिणेच्या राजकारणात फिल्मी सितारेच अधिक चमकले, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

जनतेने डोक्यावर घेतले आणि आपटलेसुद्धा

प्रत्येक निवडणुकीत नवे कलाकार राजकारणाकडे ओढले जातात. जणू दोघांमध्ये गुरुत्वाकर्षण असावं.

Image copyright Instagram

2014 साली परेश रावल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर 2019मध्ये उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात आहेत. तर दाक्षिणात्य सिनेजगतातलं एक प्रसिद्ध नाव असलेले प्रकाश राज अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

राजकारणात नवीन असूनही लोकांनी अनेकदा अनेक कलाकारांना डोक्यावर घेतलं आहे. मात्र, अनेकदा याच जनतेने ग्लॅमर आणि लोकप्रियतेला ठेंगाही दाखवला आहे.

राजेश खन्ना यांच्याच शब्दात सांगायचं तर - ये पब्लिक है जो सब जानती है...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)