लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालून समांतर सरकारचा दावा करणारी गूढ आदिवासी जमात

प्रातिनिधिक चित्र Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक चित्र

"कुणाला मतदान करायचं, निवडणूक कुणाची आहे, सरकारची आहे का? हे तर बाहेरून आलेल्या लोकांच मतदान आहे. ही एका संस्थेची निवडणूक आहे. त्यांची मुदत संपली आहे म्हणून ते निवडणूक घेत आहेत. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ही एक संस्था आहे. पण तीही अनधिकृत आहे. ही भारत सरकारची निवडणूक नाही. भारत सरकारची निवडणूक कधी होतच नाही, कारण आम्हीच भारत सरकार आहोत, म्हणून आम्ही मतदान करत नाही."

हा दावा आहे फतेसिंग नावाच्या महाराष्ट्र-गुजरात सीमेवरच्या गृहस्थाचा. ते 'A/C भारत सरकार' नावाच्या स्वयंघोषित सरकारचे पदाधिकारी आहेत.

'A/C भारत सरकार' हा आदिवासींचा असा समुदाय आहे, जो स्वतःला भारताचा खरा शासनकर्ता म्हणवतो. तसंच केंद्रात आणि राज्यात असलेल्या सरकारला फक्त संस्था म्हणून मानतो.

दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार आणि नाशिकमध्ये या समुदायातले लोक राहतात. ते मुख्यतः निसर्ग पूजक आहेत.

'A/C भारत सरकार' नावाच्या या समूहाची जी 12 लोकांची मुख्य समिती आहे, जिला ते 'कंसिलेशन कमिटी' म्हणतात, तिचे फतेसिंग एक सदस्य आहेत.

पण ही मंडळी असं का मानतात? का त्यांना केंद्रातलं सरकार आणि त्यांचं अस्तित्व मान्य नाही? ते मतदान का करत नाहीत? याबाबत आणखी जाणून घेण्याची माझी इच्छा होती.

या समुदायात काहीतरी गूढ आहे, असंसुद्धा फतेसिंग यांच्याशी बोलताना सतत लक्षात येत होतं. कारण त्यांना विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते असं काहीतरी अगम्य भाषेत देत होते की ते एकाच फटक्यात समजणं कठीण.

हे गूढ नेमकं काय आहे? का कुणी त्याबद्दल फारसं बोलत नाही? पत्रकार का त्याबाबत फारसं रिपोर्टिंग करत नाहीत? की हे एक फक्त थोतांड आहे? असे काही प्रश्न मला पडले होते.

नेमकं हे गूढ काय आहे, हे जाणून घेण्याचं मी ठरवलं.

'A/C भारत सरकार'चे प्रमुख रविंद्र कुंवर सिंह नावाची व्यक्ती असल्याचं कळलं होतं. ते गुजरातमध्ये सुरतजवळ राहतात अशीही माहिती मिळाली होती.

Image copyright BBC/NileshDhotre

त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल, याची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अनेकांना एकतर त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती किंवा ते त्याबद्दल बोलण्यास तयार नव्हते.

गुजरातमधले आदिवासी नेते लालू वसावा यांना संपर्क केल्यावर A/C भारत सरकार समुदायाला मानणारे लोक मतदान करत नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण असं सांगितल्यावर लगेचंच त्यांचं पुढचं वाक्य होतं की, आता 50 टक्के लोकांनी मतदान करायला सुरुवात केली आहे. पण एकंदरच ते हातचं राखून बोलत असल्याचं लक्षात आलं.

मला रविंद्र कुंवर सिंह यांना भेटायचं आहे, असं सांगितल्यावर 'हो भेटता येईल' असं ते म्हणाले. पण आता ते फार बिझी असतील, असं ते पुढे बोलले. काही केल्या रविंद्र कुंवर सिंह यांची भेट घ्यायची आणि त्यांच्याकडूनच हे सर्व जाणून घ्यायचं असं मी ठरवलं होतं.

शेवटी तो दिवस उजाडला. मी आधी सुरत आणि तिथून व्यारा नावाच्या तालुक्यापर्यंत प्रवास करून कटासवाण नावाचं त्यांचं गाव गाठलं.

एक शांत, गूढ वाडा

सकाळी साडे आठच्या सुमारास मी कटासवाणच्या रविंद्र कुंवर सिंह यांच्या वाड्याच्या गेटवर पोहोचलो.

लोखंडी गेटवर A/C भारत सरकारचं चिन्ह होतं आणि HEAVEN'S LIGHT OUR GUIDE (स्वर्गातला प्रकाश आमचा मार्गदर्शक) असं लिहिलं होतं.

गेटच्या डाव्या हाताला संपूर्ण काचेच्या मंदिरात पाच फुटांची एक रंगीत मूर्ती होती. A/C भारत सरकारचे संस्थापक केसरी सिंह यांची ती मूर्ती असल्याचं कळलं.

आम्ही गाडी तिथंच पार्क केली आणि आत शिरलो. संपूर्ण जमिनीवर नर्मदेतल्या गोट्यांसारखे गोटे पसरवले होते, बूट घातले असूनही ते पायांना टोचत होते. थोडं पुढे गेल्यावर एक जुन्या पद्धतीचं शेणानं सारवलेलं घर होतं आणि त्याच्या समोर अधुनिक पद्धतीचं घर होतं.

Image copyright BBC/NileshDhotre

या दोन घरांच्या मधल्या भागात एक हिरव्या रंगाची क्वालिस गाडी पार्क केलेली होती. त्यामुळे समोरचं एकदम पटकन दिसत नव्हतं. आणखी थोडं पुढे गेल्यावर काही लोक झाडू मारत असल्याचं दिसलं.

तुम्ही गावातल्या एखाद्या अतिश्रीमंत शेतकऱ्याचा वाडा पाहिला असेल तर तुम्हाला या घराची कल्पना करता येईल. म्हणजे जुन्या वडीलोपार्जित घराच्या शेजारीच बांधलेलं अधुनिक घर आणि लोकांचा सतत राबता, असं ते चित्र असतं.

इथे मात्र थोडं चित्र वेगळं होतं. लोकांची फारशी वर्दळ नव्हती आणि आवाजही नव्हता. नाही म्हणायला थोडा पक्ष्यांचा चिवचिवाट असेल... तेवढाच काय तो आवाज.

आम्ही थोडं पुढे आल्याचं पाहून पाढरा शर्ट आणि साधी पँट घातलेले 70 वर्षांचे एक इसम पुढे आले. त्यांनी दोन्ही मुठी बंद करून आंगठे नखांच्या दिशेनं छातीला टेकवले आणि आम्हाला नमस्कार केला. पण तोंडातून एक शब्दही काढला नाही.

आमचं तिथं स्वागत आहे, असं दर्शवणारी ती खूण होती.

आमच्याबरोबर असलेल्या एकानं गुजरातीमध्ये त्यांना सांगितलं की आम्हाला दादांना म्हणजेच रविंद्र कुंवर सिंह यांना भेटायचं आहे.

त्यांनी मान डोलावली आणि आतमध्ये निरोप कळवला. आम्ही तिथल्या ओट्यावर चपला काढून बसलो.

तेवढ्यात एक क्षीण शरीरयष्टी असलेला साधारण 35 वर्षांचा तरुण तिथे आला. टीशर्ट आणि पँट घातलेल्या या तरुणाच्या छोट्या मिश्या होत्या. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव हे निर्विकार आणि काहीसे त्रासलेले होते.

हा तरुण म्हणजे रविंद्र कुंवर सिंह यांचा मुलगा यशपाल असल्याचं आम्हाला कळलं. ते MSc LLB असल्याचंही कळलं.

... आणि 'ते' आमच्यासमोर आले

पाच-एक मिनिटांमध्ये हेच यशपाल त्याच्या वडिलांना म्हणजेच रविंद्र कुंवर सिंह यांना हाताला धरून बाहेर घेऊन आले.

साधारण 70 वर्षांचे, मध्यम उंचीचे, गोरेपान, पिकलेले केस, चेहऱ्यावर तेज पण शरीरानं काहीसे आजारी वाटत असलेले रविंद्र कुंवर सिंह आमच्या समोर खुर्चीत येऊन बसले.

आतापर्यंत फारच क्वचित मीडियासमोर आलेले, ज्यांचा फोटो किंवा व्हीडिओसुद्धा कुठे फारसा उपलब्ध नसलेले रविंद्र कुंवर सिंग हे माझ्या मनात असलेल्या प्रतिमेपेक्षा अत्यात वेगळे आणि शांत दिसत होते. एखाद्या आधात्मिक गुरूसारखे ते मला भासले.

Image copyright BBC/PraveenThakare

खुर्चीत बसताच त्यांनी आम्हाला हाताच्या मुठी बंद करून आंगठे नखांच्या दिशेनं छातीला टेकवून नमस्कार केला.

अत्यंत शांत आणि मृदू आवाजात त्यांनी आमच्याशी संवाद सुरू केला.

आगतस्वागत आणि येण्याचं प्रयोजन सांगितल्यानंतर त्यांनी आमच्याशी बोलायला सुरुवात केली. पण शेजारीच उभ्या असलेल्या त्यांच्या मुलाकडून मात्र त्यांना मध्येमध्ये रोखलं जाऊ लागलं. त्यांना आमच्याशी बोलयाची इच्छा असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. पण त्यांचा मुलगा मात्र सतत आम्हाला बाहेर जायचं आहे आणि त्याची तयारी करायची आहे, असंच पालुपद लावून बसला होता.

"A/C भारत सरकारचे दस्तावेज फार मोठे आहेत, ते दहा-पंधरा मिनिटं किंवा एका तासात समजावून सांगता येणार नाहीत. त्यासाठी तीन दिवस लागतात," असं रविंद्र कुंवर सिंह सांगू लागले.

आमच्या संमेलनांमध्ये आम्ही तीन दिवस तेच समजावून सांगतो, असं त्यांनी सांगत गुजरातमधल्या राजपिपलामध्ये उद्यापासून एक संमेलन असल्याचं सांगितलं.

मी संमेलनाला येऊ का, असं त्यांना विचारताच त्यांनी होकार दिला. पण मला फक्त एक दिवसच येणं शक्य होईल, असं मी त्यांना सांगितलं.

त्यावर "हे विश्वशांती संमेलन आहे आणि तिथं सर्वांना येण्याची परवानगी आहे," असं उत्तर त्यांनी दिलं.

Image copyright BBC/PraveenThakare
प्रतिमा मथळा A/C भारत सरकार समुदायाचं वणी (नाशिक) येथे झालेले संमेलन.

आमची ही चर्चा सुरू असतानाच आदिवासी समुदायातली काही माणसं त्यांना भेटण्यासाठी आली. चपला काढून तीसुद्धा ओटीवर बसली होती. सत्ता गेलेले संस्थानिक अजूनही ग्रामीण भागात जसा दरबार भरवतात, तसं चित्र आता तिथं उभं राहीलं होतं.

रविंद्र कुंवर सिंह यांनी आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा शांत बसणं पसंत केलं, तेव्हा त्यांना आलेल्या आदिवासी मंडळींशी बोलायचं असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यावेळी तुमचा वाडा पाहू शकतो का, असं मी त्यांना विचारलं.

त्यावर त्यांनी लगेचच होकार दिला, त्यांच्या मुलाला आम्हाला त्यांचा 'रसोडाही (म्हणजे स्वयंपाकघर) दाखव' असं त्यांनी सांगितलं. पण इथं काही पाहण्यासारखं नाही, असं म्हणून त्यांनी ते टाळण्याचा प्रयत्न केला. पण मी मात्र तोपर्यंत उठून चालण्यास सुरुवात केल्यानं त्यांचा नाइलाज झाला.

आम्ही पुढच्या दिशेने गेलो तर दोन गाड्या कव्हरमध्ये झाकलेल्या दिसल्या. एक महिंद्रा मॅराझो आणि दुसरी कॉन्टेसा. एका गाडीवर लालदिवा असल्याचं कळत होतं.

सकाळी 9 वाजता जेवण

मी भटारखान्यात डोकावून पाहिलं. उघड्या पडवीसारख्या त्या मोठ्या खोलीत मोठमोठ्या भाड्यांमध्ये अन्न शिजत होतं. साधारण 100 माणसं जेवतील एवढं ते अन्न असावं.

Image copyright BBC/PraveenThakare
प्रतिमा मथळा 'A/C भारत सरकार'च्या कन्सिलेशन समितीचे सदस्य

त्यांनी आम्हाला जेवण्याचा आग्रह केला. तेव्हा सकाळचे 9 वाजले होते. त्यांचा अपमान होऊ नये म्हणून मी थोडं खाण्याचं मान्य केलं. जेवण वाढणारी मंडळीसुद्धा कमालीची शातं होती. त्यांच्या तोंडून एक शब्द सुद्धा फुटत नव्हता.

वाढायाला येणारा प्रत्येज जण आम्हा A/C सरकारच्या पद्धतीनं नमस्कार करत होता. पण तरीही एकंदरच कुणीतरी बाहेरची व्यक्ती आली आहे आणि आता आपल्याला फारच सजग राहायचं आहे अशी सर्वांची देहबोली आणि वागणं होतं.

जेवणाचा फोटो काढण्यासाठी मी फोन काढताच यशपालनं मला रोखलं. जेवण करतानाच माझ्या लक्षात आलं की ज्या वऱ्हांड्यात मी बसलो होतो, त्याच्यासमोर एक तीन मजली इमारत होती.

जेवण होताच मी ती तीन मजली इमारत पाहण्याकडे पावलं वळवली, पण यशपाल यांनी मागून येत तिथं काही नाही, ते आमच्या समुदायातल्या लोकांना राहण्यासाठी बांधलेली इमारत असल्याचं सांगितलं.

Image copyright BBC/PraveenThakare

आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न आणि ही मंडळी एकदाची कधी परत जातील अशी एकंदर यशपालची देहबोली झाली होती.

पुन्हा आम्ही चालत रविंद्र कुंवर सिंह जिथं बसले होते तिथं आलो होते. आता त्यांची मुलाखत मला घेता येईल या प्रतीक्षेत मी होतो.

काय आहेत A/C भारत सरकार?

 • एसी म्हणजे ख्रिस्त पूर्व, असं ते सांगतात
 • गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानात या समुदायाचे लोक आहेत.
 • गुजरातमध्ये हा समुदाय सतिपती म्हणजेच मातापित्यांना मानणारा समुदाय म्हणून ओखळा जातो.
 • स्वतःच्या नावापुढे A/C शब्द लावतात. गाड्यांवर एसी भारत सरकार आणि त्याची बोधचिन्ह आणि बोधवाक्य लिहिलेली असतात.
 • हे लोक कुठलीही जात किंवा धर्म मानत नाहीत. A/C भारत सरकार समुदायात सर्व जातीधर्माचे आदिवासी असतात.
 • 'स्वकर्ता, पितु की जय' म्हणजेच स्वशासन आणि फादरहूड हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे.
 • निसर्ग आणि त्यानंतर मातापिता त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असतात.
 • ते कर्ज घेत नाहीत किंवा देत नाहीत, जमीन विकत नाहीत तसंच शासकीय योजनांचा लाभसुद्धा घेत नाहीत.
 • या देशाचे आपण शासक असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यासाठी ते यूएन आणि ब्रिटीश सरकारनं जारी केलेल्या काही कागदपत्रांचा आणि आदिवासींना दिलेल्या स्वशासनाच्या अधिकाराचा दाखला देतात.
 • भारत देश हा आदिवासींचा आहे आणि इथं राहणारे सर्व बिगर-आदिवासी हे बाहेरून आले आहेत, जे आमचे कर्जदार आहेत असा त्यांचा दावा आहे.
 • हे लोक मतदान करत नाहीत, बँक खातं उघडत नाहीत, आधार किंवा रेशन कार्ड काढत नाहीत. कुठला करही देत नाहीत. आम्ही देशाचे मालक आहोत, आम्हाला त्याची गरज नाही असा या लोकांचा दावा आहे.
 • कुठल्याही कामासाठी या समुदायातले लोक त्यांना A/C भारत सरकारनं दिलेलं ओळखपत्र वापरतात.
 • भारतभरात त्यांचे 30 हजाराच्या आसपास सदस्य असल्याचा त्यांचा दावा आहे.

अखेर तो क्षण आला आणि...

थोडा वेळ प्रतीक्षा केल्यानंतर मी रविंद्र कुंवर सिंह यांना मुलाखतीसाठी विचारलं. पण मुलाखत देण्यासाठी मला कंसिलेशन समितीची समंती घ्यावी लागेल, असं त्यांनी सांगितलं. थोडक्यात, त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं टाळलं.

मग मी राजपिपालाला येतो आणि तिथं आपण मुलाखत करू, असा पर्याय मी त्यांना दिला. पण त्यांनी त्यालाही नकार दिला.

मी फोटो काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी एकही फोटो काढू दिला नाही.

आदिवासींची पिळवणूक?

"समुदायाचे प्रमुख नेते या नात्याने रविंद्र कुंवर सिंह यांना रॉयल ट्रीटमेंट मिळते. रविंद्र कुंवर सिंह आणि त्यांच्या कंसिलेशन समितीचे सदस्य मुख्य प्रवाहातल्या विकासाच्या साधनांचा उपभोग घेतात. मात्र गरीब आदिवासींवर भावनिक अतिक्रमण आणून त्यांना विकासापासून ते वंचित ठेवतात," असं नाशिकमधल्या पत्रकार दीप्ती राऊत यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

Image copyright BBC/PraveenThakare
प्रतिमा मथळा एसी भारत सरकारकडून सदस्यांना अशा प्रकारचे ओळखपत्र दिले जाते.

गुजरातच्या मोरदाहडमध्ये 2018ला झालेल्या A/C भारत सरकारच्या विश्व शांती संमेलनाला दीप्ती राऊत हजर होत्या.

त्या पुढे सांगतात, "आदिवासींमधील आज्ञान, अस्मिता, संस्कृती या तिन्हींचा गैरफायदा घेऊन या संघटनेचं काम चालतं असा संशय येतो. कारण आदिवासी समाज आणि संस्कृती ही सामुदायिक जीवन पद्धतीवर बेतलेली आहे, त्यांच्यात संस्कृतीत नेत्याला किंवा पुढाऱ्याला महत्त्व आहे. नेत्याचं काम लोकांना मुख्य प्रवाहात जोडण्याच असतं. पण इथं मात्र नेताच त्यांना मुख्य प्रवाहापासून तोडत आहे. स्वतः गाड्या आणि संपत्तीसह मुख्य प्रवाहातल्या सर्व गोष्टी करत आहे. पण लोकांना मात्र त्यापासून तोडत आहेत. त्यामुळेच हे सर्व शंकास्पद वाटतं."

आधार कार्ड किंवा सरकारकडून दिली जाणारी वेगवेगळी कागदपत्रं ते मानत नसल्याचं सांगतात. पण समुदायातल्या अनेकांकडे मोबाईल फोन असल्याचं दिसून येतं. मोबाईलच्या KYCसाठी सरकारनं दिलेले कागदपत्रांची गरज भासते. मग तुमच्याकडे मोबाईल कसे काय, यावर मात्र समुदायातल्या लोकांना समाधानकारक उत्तरं देता येत नाहीत.

समुदायाचे प्रमुख रविंद्र कुंवर सिंह यांच्या वाड्यात तीन-चार गाड्या असल्याचं दिसलं. तसंच समुदयातल्या अनेकांकडे गाड्या आहेत. गाड्या खरेदी करताना कर भरावा लागतो. कर भरण्यास तुमचा विरोध आहे, मग मग त्या गाड्या कशा खरेदी केल्या यावरसुद्धा फतेसिंग यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही.

महाराष्ट्रातील प्रसार

आधीपर्यंत फक्त नंदुरबारमधल्या काही भागांपर्यंत मर्यादित असलेल्या समुदायाचा प्रसार आता महाराष्ट्रातल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यात सुद्धा झाला आहे.

वणीच्या गडावर नुकताच A/C भारत सरकारचा परिचय करून देणारा फलक लावण्यात आला आहे. मे 2018 मध्ये वणी आणि त्र्यंबकेश्वरला त्याचं एक संमेलन झालं होतं. त्यावेळी साधारण 5000 लोक आले होते.

Image copyright BBC/PraveenThakare

वणीच्या गडावर मे 2018ला झालेल्या कार्यक्रमाचं आमंत्रण त्यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या नावावं दिलं होतं, अशी माहिती स्थानिक पोलीस ठाण्यानं दिली आहे.

मात्र पोलीस निरीक्षकांना किंवा कोणत्याही वरिष्ठांना न भेटता त्यांनी ते पत्र फक्त ठाणे अंमलदारानं इनवर्ड करून घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. धार्मिक स्वारूपाचा कार्यक्रम असल्याचं त्यांनी सांगितल्यानं आम्ही फारशी चौकशी केली नाही, असं ठाणे अंमलदाराचं म्हणणं आहे.

पण हे पत्र नीट वाचलं तर त्यातल्या एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काहीच अर्थ लागत नाही. ते हिंदी भाषेत लिहिलं आहे. पण त्याचा अर्थ लावणं कठीण आहे.

Image copyright BBC/PraveenThakare
प्रतिमा मथळा वणी येथिल संमेलना आधी पोलिसांना देण्यात आलेले पत्र.

"ऑगस्ट 2018 ला मला गडचिरोलितल्या भामरागडला त्यांचा एक फलक दिसला, तसंच पालघरमध्येसुद्धा त्यांचा आता प्रसार झाल्याचं कळतंय," अशी माहिती दीप्ती राऊत यांनी दिली.

महाराष्ट्र पोलिसांनी मात्र याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यास नकार दिला आहे.

एक अधिकाऱ्यानं नाव सांगण्याचा अटीवर सांगितल, "सक्षम अधिकाऱ्यामार्फत आम्ही या संपूर्ण गोष्टींची चौकशी केली आहे, त्याचा गोपनीय अहवाल वर पाठवला आहे."

तर वणी विभागाचे तत्कालीन पोलीस विभागीय अधिकारी देवीदास पाटील यांनी याबाबत अधिका माहिती घेऊन सांगतो असं बीबीसी मराठीसाठी काम करणाऱ्या प्रवीण ठाकरे यांना सांगितलं.

त्यांनी सांगितलं, "मागील वर्षी मे महिन्यात सप्तशृंगी गडावर वनविभागाच्या जागेवर काही लोकांनी फलक लावल्याची तक्रार तत्कालीन वन अधिकाऱ्यांनी दिली होती, त्याबाबत इतर माहिती घेऊन कळवतो."

सरकार कारवाई का करत नाही?

दैनिक दिव्य मराठीचे नाशिक अवृत्तीचे संपादक जयप्रकाश पवार यांनी 15 वर्षांपूर्वी A/Cसरकार नेमकं काय प्रकरण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.

ते सांगतात, "तेव्हा पी. सी. बेंजामीन नंदुरबारचे कलेक्टर होते, त्यावेळी मतदान का करत नाही, असं विचारल्यावर त्यांच्यातली काही मंडळी बेंजामीन यांच्या आंगावर धावून गेली होती. तिथून हा समुदाय खरा प्रकारझोतात आला."

त्यावेळी हा नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी महाराष्ट्र-गुजरात सीमेवरचं उंबरठाण पवार यांनी गाठलं होतं. त्यांच्या सुमदायाचे नेते शंकरसिंह महाराज यांना त्यांनी त्याबाबत विचारणा केली होती. तेव्हा त्यांना त्यांच्या प्रश्नांची नीट उत्तरं देता आली नव्हती, असं पवार सांगतात.

या महाराजांना भेटण्यापूर्वी त्यांची मोटरसायकल, कॅमेरा आणि महत्त्वाच्या इतर सर्व वस्तू काढू घेण्यात आल्या होत्या, अशी आठवण पवार सांगतात.

ते पुढे सांगतात, "ही मंडळी फार सतर्क असतात, त्यांच्याबाबत काय छापून येतं कोण काय बोलतं यावर त्यांचं फार लक्ष असतं. पोलिसांना त्याची माहिती असते, पण त्यांचा फार काही उपद्रव नसतो म्हणून बहुधा ते त्याकडे दुर्लक्ष करत असावेत."

"पण तरी सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही," असा सवाल पवार उपस्थित करतात.

(प्रवीण ठाकरे यांनी दिलेली माहिती या बातमीत समाविष्ट करण्यात आली आहे.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)