नरेंद्र मोदींनी 'मी पठाणाचा मुलगा आहे' असं खरंच म्हटलं होतं?

फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधान नरेंद्र मोदी
सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते स्वत:ला पठाण का बच्चा अर्थात पठाणाचा मुलगा म्हणत असल्याचं म्हटलं आहे. 10 सेकंदांचा हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओत ते म्हणताना दिसतात की, मी पठाणाचा मुलगा आहे. खरं बोलतो, खरं वागतो.
फेसबुक आणि ट्वीटरवर हा व्हीडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, मी पठाणाचा मुलगा आहे. काश्मीरातील रॅलीत मोदी स्वत:ला हिंदू वाघ सिद्ध करण्यासाठी आतूर आहेत.
सोशल मीडियावर हजारोंनी हा व्हीडिओ शेअर केला आहे.
मात्र आम्ही केलेल्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे.
व्हीडिओमागचं सत्य
चुकीचा संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक जुनं भाषण उकरण्यात आलं आहे.
मोदींचं हे मूळ भाषण 23 फेब्रुवारी 2019रोजी केलेलं आहे. हा व्हीडिओ काश्मीरातील नव्हे तर राजस्थानमधील टोंक या शहरात झालेल्या भाजपच्या विजय संकल्प रॅलीचा आहे.
भाजपच्या अधिकृत युट्यूब पेजवर 23 फेब्रुवारीलाच हा व्हीडिओ अपलोड करण्यात आला होता. मोदींनी पठाण का बच्चा हे उद्गार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी काढल्याचं या व्हीडिओत स्पष्टपणे दिसतं आहे.
मोदींचं पूर्ण वक्तव्य होतं- "पाकिस्तानमध्ये नवं सरकार स्थापन झालं आहे. पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांशी संवाद साधणं साहजिक होतं. शिष्टाचाराचा भाग म्हणून मी त्यांना दूरध्वनी केला आणि त्यांचं अभिनंदन केलं. भारत आणि पाकिस्तानच्या लढाया खूप झाल्या. पाकिस्तानचा यात काहीही फायदा झाला नाही."
"मी त्यांना सांगितलं की तुम्ही खेळाच्या क्षेत्रातून राजकारणात आले आहात. भारत आणि पाकिस्तान यांनी एकत्र येऊन गरिबीविरुद्ध लढा द्यायला हवा. साक्षरता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. अंधश्रद्धेचं प्रमाण कमी व्हावं यासाठी लढा द्यायला हवा. ही गोष्ट मी त्यांना त्यादिवशी सांगितली. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना त्यांनी दिलेला शब्द खरं करून दाखवण्याची आवश्यकता आहे. ते आपल्या शब्दाला जागतात का हे मला पाहायचं आहे."
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान मोदी बोलत होते. या हल्ल्यात 40 जवानांचा मृत्यू झाला होता. भारत सरकारने पाकिस्तानला याप्रकरणाचा तपास गांभीर्याने करण्याचं आवाहन केलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)