IPL 2019 : शेन वॉटसनच्या खेळीमुळं चेन्नईचा विजय, ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचणारा पहिला संघ

शेन वॉटसन Image copyright Getty Images

आयपीएल-12 मध्ये मंगळवारी केवळ एकच सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादला सहा विकेट्सनी हरवलं. 96 धावा करणाऱ्या शेन वॉटसननं चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

विजयासाठी चेन्नईसमोर 176 धावांचं लक्ष्य होतं. 19.5 ओव्हर्समध्ये चार विकेट्स गमावून चेन्नईनं विजय साकार केला.

नाणेफेक जिंकून चेन्नईनं सनरायजर्स हैदराबादला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. निर्धारित 20 ओव्हर्समध्ये हैदराबादनं 175 धावा केल्या. मनीष पांडेयच्या नाबाद 83 आणि डेव्हिड वॉर्नरच्या 57 धावांच्या जोरावर तीन विकेट्स गमावून हैदराबादनं 175 धावा केल्या.

सामना संपल्यानंतर हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमारनं आपल्या वेगवान गोलंदाजांचा बचाव केला. पण त्याचबरोबर शेन वॉटसनचीही मोकळ्या मनानं स्तुती केली. शेन वॉटसननं ज्या पद्धतीनं धडाकेबाज बॅटिंग केली, ते पाहता त्याला रोखणं कठीण असल्याचं भुवनेश्वर कुमारनं म्हटलं.

या विजयाबरोबरच चेन्नईनं आयपीएलमध्ये आपला आठवा विजय नोंदवला. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या 'प्ले ऑफ'मध्ये म्हणजेच अंतिम चारमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली आहे.

चेन्नईनं आतापर्यंत 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत आणि केवळ 3 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलाय. गेल्या दोन सामन्यांमधल्या पराभवामुळं चेन्नईच्या संघावर जो दबाव आला होता, तो झुगारून देण्यातही त्यांना यश मिळालं आहे.

या सामन्यानंतर शेन वॉटसनच्या खेळीची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा धोनीच्या एका वक्तव्याचीही रंगली. मॅच संपल्यानंतर हर्षा भोगले यांनी धोनीला विचारलं, की चेन्नईचा संघ सातत्यानं आयपीएलच्या अंतिम सामन्यात कसा पोहोचतो? यामागचं रहस्य काय आहे? ॉ

या प्रश्नाचं उत्तर देताना धोनीनं म्हटलं, "या यशाचं कारण जर मी सांगितलं, तर चेन्नई मला लिलावात विकतच घेणार नाही. हे एक ट्रेड सीक्रेट आहे. लोकांचा आणि फ्रँचायजीचा पाठिंबाही खूप महत्त्वाचा आहे."

वॉटसनला गवसला सूर

चेन्नईला विजय मिळवून देणाऱ्या शेन वॉटसनच्या फलंदाजीची कमालही खूप दिवसांनंतर अनुभवायला मिळाली.

शेन वॉटसनला 'मॅन ऑफ द मॅच' घोषित करण्यात आलं. बिग बॅश लीगमध्ये खेळण्याचा फायदा आपल्याला आयपीएलमध्ये मिळाल्याचं शेन वॉटसननं स्पष्ट केलं.

Image copyright Getty Images

शेन वॉटसननं हैदराबाद विरुद्ध केवळ 53 चेंडूंमध्ये 96 धावा केल्या. त्यानं नऊ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीनं 96 धावा केल्या.

शेन वॉटसनची सुरूवात काहीशी संथ झाली. मात्र त्यानंतर त्यानं अशी काही फटकेबाजी केली, की त्याला आवरणं हैदराबादच्या फलंदाजांसाठी अतिशय कठीण होऊन बसलं. शेन वॉटसनच्या प्रत्येक कट, पूल, हुक, ड्राइव्ह आणि स्वीप पाहत रहावा असा होता.

त्यानं फटकावलेला प्रत्येक चेंडू फिल्डर्सच्या मधून अगदी अलगदपणे थेट स्टँडमध्ये किंवा बाउंड्री लाइनच्या बाहेरच जात होता.

वॉटसननं हैदराबादच्या खलील अहमद आणि राशिद खानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. त्यांच्या प्रत्येक चेंडूवर त्यांनं अशी काही फटकेबाजी केली, की दोघांनाही शेवटपर्यंत लयच सापडली नाही.

शेन वॉटसनला सुरेश रैनानंही चांगली साथ दिली. रैनानं 24 चेंडूंमध्ये एक षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीनं 38 धावा केल्या. सुरेश रैनानं संदीप शर्माच्या एका ओव्हरमध्ये चार चौकार आणि एक षटकार ठोकला. चेन्नईच्या इनिंगची ही सहावी ओव्हर होती.

Image copyright Getty Images

पहिल्या पाच षटकांत चेन्नईचा स्कोअर 27 होता आणि त्यांनी एक विकेटही गमावली होती. सहाव्या षटकामध्ये चेन्नईचा स्कोअर होता 49.

सहावं षटक मॅचचा टर्निंग पॉइंट म्हणता येईल. कारण या ओव्हरनंतर चेन्नईनं सर्व दबाव झुगारून दिला.

खरं तर चेन्नईची सुरूवात फार चांगली झाली नव्हती. सलामीचा फलंदाज फॉफ डू प्लेसी केवळ एक धाव काढून बाद झाला होता. राशिद खानच्या गोलंदाजीवर विकेट कीपर जॉन बेअरस्टोनं त्याला बाद केलं.

तिसऱ्याच धावेवर पहिली विकेट गमावल्यानंतर शेन वॉटसननं सुरैश रैनासोबत तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर अंबाती रायडूनं 21 आणि केदार जाधवनं 11 धावा काढून चेन्नईचं विजयासाठीचं लक्ष्य पूर्ण केलं.

हैदराबादच्या संदीप शर्मानं 3.4 षटकांत 54 धावा दिल्या. राशिद खाननंही 4 ओव्हर्समध्ये 44 धावा केल्या. राशिद खानला केवळ एकच विकेट घेता आली.

मनीष पांडेयची अयशस्वी झुंज

नाणेफेक हरल्यानंतर हैदराबादची टीम जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरली, तेव्हा हरभजन सिंहनं त्यांना सर्वांत पहिला झटका दिला. उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या जॉनी बेअरस्टोला हरभजननं शून्यावरच बाद केलं.

पाच धावांवरच पहिली विकेट गमावल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडेयनं दुसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली.

डेव्हिड वॉर्नरनं 45 चेंडूंवर तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 57 धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमधलं वॉर्नरचं हे सहावं अर्धशतक आहे. हरभजन सिंहनंच डेव्हिड वॉर्नरला बाद केलं.

Image copyright Getty Images

वॉर्नर बाद झाल्यानंतर मनीष पांडेयनं एकहाती किल्ला लढवला. त्यानं 49 चेंडूंमध्ये सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं 83 धावा केल्या.

वॉर्नर आणि मनीष पांडेयच्या धावांमुळे हैदराबादला 176 धावा करता आल्या, मात्र चेन्नईचा विजयरथ रोखण्यासाठी तेवढ्या धावा निश्चितच पुरेशा नव्हत्या.

चेन्नईच्या विजयाचं रहस्य काय?

शेन वॉटसनच्या फॉर्ममुळं कर्णधार धोनीला चांगलाच दिलासा मिळाला. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये वॉटसनच्या बॅटमधून धावा बरसत नव्हत्या. शेन वॉटसन संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, असं मॅच संपल्यावर हरभजन सिंह यानंही म्हटलं.

गेल्या आयपीएलमध्ये शेन वॉटसनच्या शतकाच्या जोरावरच चेन्नईनं आयपीएलचा अंतिम सामना जिंकला होता.

शेन वॉटसनमध्ये जिंकून देण्याची क्षमता आहे. त्यामुळे काही सामन्यांमध्ये त्यानं धावा नाही जरी केल्या तरी त्याला संधी आणि पाठिंबा दिला जातो, असं कर्णधार धोनीनं मॅच संपल्यानंतर म्हटलं.

Image copyright Getty Images

त्यानंतर धोनीनं एक खूप मजेशीर गोष्ट सांगितली.

चेन्नईच्या यशात नेमके खेळाडू विकत घेण्याचं 'ट्रेड सीक्रेट' जितकं महत्त्वाचं आहे, तितकाच स्पोर्ट स्टाफचा वाटाही मोलाचा असल्याचं धोनीनं म्हटलं. सामन्यात चांगलं खेळू न शकणाऱ्या खेळाडूंचा मूड चांगला ठेवण्यासाठी या स्टाफची खूप मदत होते. अजूनही काही गोष्टी आहेत, ज्याचा संघाच्या मनोबलावर परिणाम होतो. पण ती गुपितं मी रिटायर होण्याच्या आधी सांगणार नाही, असं धोनीनं म्हटलं.

गेल्या सामन्यात स्वतः धोनीनं उत्तम खेळी केली होती. ते पाहिल्यानंतर धोनी 10 वर्षे मागे जाऊन खेळत असल्यासारखं वाटल्याची कबुली टीकाकारांनीही दिली होती. 17 जूनला शेन वॉटसनही 38 व्या वर्षांत पदार्पण करेल. वय बाजूला ठेवून खेळ करण्याची प्रेरणा त्याला कदाचित धोनीकडूनच मिळाली असावी.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)