रोहित शेखर हत्याकांड : पोलिस म्हणतात, पत्नीने दिली गुन्ह्याची कबुली

फोटो स्रोत, ANI
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं काँग्रेसचे दिवंगत नेते नारायण दत्त तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा केला आहे.
रोहित यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या पत्नी अपूर्वा शुक्ला तिवारी यांना अटक केली आहे.
"चौकशीदरम्यान अपूर्वा यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे," असं पोलिसांनी म्हटलं आहे.
40 वर्षीय रोहित यांचा 15-16 एप्रिल दरम्यान दिल्लीतल्या राहत्या घरी डिफेन्स कॉलनी परिसरात संशयास्पद मृत्यू झाला होता.
शेखर यांच्या घराच्या परिसरातल्या 9 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून लक्षात येतं की, ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, त्यादिवशी बाहेरच्या कुणीही व्यक्तीनं त्यांच्या घरात प्रवेश केला नव्हता.
शेखर झोपेत असल्याचा फायदा उठवत त्यांची हत्या करण्यात आली, असा पोलिसांना संशय आहे.
त्यांचा मृत्यू श्वास रोखल्यामुळे झाला आहे, असं पोस्ट मॉर्टमच्या रिपोर्टमध्ये समोर येत आहे.
फोटो स्रोत, PTI
पोलिसांच्या मते, "मेडिकल रिपोर्टवरून समोर येतं की, रोहित शेखर यांना झोपेच्या गोळ्या घेण्याची सवय होती आणि घटनेच्या दिवशी त्यांनी दारू घेतली होती. यामुळे ते हल्लेखोराला विरोध करू शकले नाहीत, असं वाटतं. "
दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याच्या मते, रोहित शेखर यांची आई उज्ज्वला शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या साक्षीमध्ये एनडी तिवारी यांच्या खासगी सचिवांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली होती.
असं असलं तरी चौकशीदरम्यान उज्ज्वला शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या साक्षीत असा आरोप केलाआहे की, शेखर आणि त्यांच्या पत्नीच्या नात्यात तणाव होता.
पोलिसांना सुरुवातीपासूनच अपूर्वा यांच्यावर संशय होता.
पोलिसांनी काय सांगितलं?
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे अतिरिक्त आयुक्त राजीन रंजन यांनी सांगितलं की, रोहीत शेखर आणि अपूर्वामध्ये तणावाचे संबंध होते. ज्या दिवशी त्यांची हत्या झाली, त्या रात्री त्यांच्यात भांडण झालं असावं.
सीसीटीव्ही फुटेजनुसार रात्री 10.30 वाजता रोहित घरी आले. 11 वाजता जेवले आणि त्यानंतर फर्स्ट फ्लोअरवरच्या त्यांच्या खोलीत गेले.
त्यानंतर त्यांच्या आई जेवणासाठी आल्या, त्यावेळी त्यांनी रोहित आणि अपूर्वाला बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. पण नशेत असल्यामुळे ते त्यांच्या खोलीत निघून गेले.
अपूर्वा या जेवण केल्यानंतर 12.45 वाजता त्यांच्या खोलीत गेल्या आणि सकाळीच बाहेर आल्या.
पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार रोहित यांचा मृत्यू त्यांनी जेवण केल्याच्या 2 तासांनंतर झाला आहे.
घरात त्यावेळी रोहित यांच्या शिवाय तीन लोक हजर होते, त्यांची पत्नी अपूर्वा आणि 2 नोकर अखिलेश आणि गोलू.
दोन्ही नोकर त्यांच्या रोजगारासाठी रोहित यांच्यावर अवलंबून होते, त्यामुळे पोलिसांना त्यांच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी त्यांची चौकशी त्यात अपूर्वा यांनी त्यांचा गुन्हा कबुल केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)