लोकसभा निवडणूक : पुण्यात मतदानाच्या घासरलेल्या टक्केवारीचा नेमका अर्थ काय?

  • हलिमाबी कुरेशी
  • बीबीसी मराठीसाठी पुण्याहून
पुणे

फोटो स्रोत, BBC/NitinNagardhane

२०१४ मध्ये पुण्यात ५४.२४ टक्के मतदान झाल होत. यंदा मात्र ४९.८४ टक्के इतके मतदान झालं. सकाळी मतदारांमध्ये असलेला उत्साह दुपारनंतर मात्र ओसरत गेला.

२०१४ च्या निवडणुकीत राजकीय कार्यकर्ते अक्षरशः सोसायट्यांमध्ये जाऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. यंदा मात्र हे चित्र नव्हतं.

लोकमतचे पुणे आवृत्तीचे सहसंपादक सुकृत करंदीकर यांनी मतदानाची टक्केवारी पाहता ही उमेदवारांच्या संदर्भात असलेली अनास्था दिसून येत असल्याचं म्हटलं आहे. तर ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांचं मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे मतदारांचा निवडणूक प्रकियेशी कनेक्ट तुटल्याचं म्हणणं आहे.

"पुणे लोकसभा मतदारसंघाच्या यादीत दुबार मतदारांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर पुण्यातून परदेशात आणि देशांतर्गत स्थलांतरित झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची मतदार यादी सदोष आहे.

त्याचबरोबर भाजपाने आपली दर एक हजार मतदारांच्या मागे असलेली यंत्रणा भक्कम असल्याचा दावा केवळ कागदावर उरली आहे. तर मोदींच्या विरोधात सुप्त लाट असल्याचा आघाडीने केलेला दावा देखील साफ फोल ठरल्याच समोर येतं," असं सुकृत करंदीकर यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, BBC/NitinNagardhane

तुल्यबळ उमेदवारांची कमतरता हे देखील महत्त्वाच कारण असल्याचं करंदीकर सांगतात.

पुण्याच्या येरवडामधल्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयातले राज्यशास्त्राचे प्राध्यापक नितीन बिर्मल यांनी कमी झालेली टक्केवारी ही राजकीय पक्षांच्या संघटनातील कमतरता दर्शवत असल्याचं म्हटलं आहे.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

"येरवडा सारख्या लोकवस्ती बहुल भागात मतदान मोठ्या प्रमाणात झालं तर कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू परिसरात मात्र आतिशय कमी मतदान दिसून येत. वडगाव शेरी, कॅन्टॉन्मेंट या परिसरात काँग्रेस-राष्ट्रवादीचा मतदार अधिक आहे तरी देखील या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी आहे. कोथरुड मतदारसंघ मोठा आहे, मात्र याठिकाणी देखील कमी मतदान झालेलं आहे," बिर्मल सांगतात.

पुण्यातील प्रमुख राजकीय पक्ष मतदारांमध्ये जनजागृती करण्यात कमी पडल्याचं ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे म्हणाले.

भारतीय लोकशाहीतील लाईव्ह घटक ज्यात पदयात्रा, जाहीर सभातून नेत्यांची अभ्यासपूर्ण भाषणं, कोपरा सभा या सगळ्यांची कमतरता जाणवल्याचं अरुण खोरे म्हणाले.

त्याचबरोबर विद्येचं माहेरघर बिरुदावली मिरवणाऱ्या पुण्यातल्या शैक्षणिक संस्था आणि संघटना यांच्यात मतदार जनजागृती विषयी उदासीनता दिसून आल्याचं खोरे यांना वाटतं.

"खरतर आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान प्रत्येक मतदाराच्या हाती आलं आहे. त्यामुळे सभा फोनवर बसल्या बसल्या ऐकता येतायत, पूर्वी मतदार खास नेत्यांची भाषण ऐकायला मिळतील यासाठी लांबून येत. ऐतिहासिक शनिवार वाड्यावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अशा नेत्यांना ऐकण्यासाठी खास मतदार लांबचा प्रवास करत येत," अशी आठवण अरुण खोरे सांगतात.

फोटो स्रोत, BBC/NitinNagardhane

त्याचबरोबर यंदा स्मार्ट प्रचाराकडे सगळ्याच पक्षांचा ओढा होता. मात्र मतदानासाठी मतदारांना बाहेर काढण्यात पक्ष अपयशी ठरल्याचं खोरे म्हणतात.

राज्यशास्त्र विषयाचे अभ्यासक चंपत बोड्डेवार सांगतात, "निवडणूक प्रक्रियेपासून दूर असलेला मध्यमवर्गीय ,उच्च मध्यमवर्गीय समाज २०१४ साली पहिल्यांदा मतदानासाठी बाहेर पडला होता. भारतीय समाजातील हा घटक नेहमीच निवडणूक ,राजकारण यांच्यापासून दूर असतो. अपवाद २०१४ चा होता. त्यामुळे किमान मतदानाची टक्केवारी वाढली होती.

यंदा या घटकाने पुन्हा पाठ फिरवली. याचा अर्थ हा घटक विद्यमान सरकारच्या कामगिरी संदर्भात समाधानी नाही. त्यामुळे पुण्यातील अनेक उच्च मध्यमवर्गीय राहतं असलेल्या परिसरात मतदानाची टक्केवारी घसरली."

प्रत्यक्षात मात्र जास्त मतदान - निवडणूक आयोग

पुण्यात शांततेत मतदान पार पडलं असल्याचं उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह म्हणाल्या.

टक्केवारीमध्ये जरी मतदान घसरल्याच दिसत असलं तरी २०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याचं निवडणुक अधिकारी मोनिका सिंह म्हणाल्या. जवळजवळ २ लाख ४१ हजार ३४५ मतदार वाढले असल्याचं त्यांनी सांगितलं.

मागील लोकसभा निवडणुकीत ९ लाख ९३ हजार २७८ मतदारांनी मतदान केलं होतं, यंदा १० लाख ३४ हजार १५४ मतदारांनी मतदान केल्याचं त्या म्हणाल्या.

मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी पथनाट्य, वर्तमानपत्र, रेडिओ, बस स्थानक, रेल्वे स्थानक, दवाखाने अशा ठिकाणी जाहिराती करण्यात आल्याचं मोनिका सिंह म्हणाल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)