नरेंद्र मोदी आणि प्रमोद महाजन यांचे नेमके कसे संबंध होते?

  • श्रीकांत बंगाळे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्रमोद महाजन आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

"रिटायरमेंटनंतर काय कराल, अशी चर्चा आमच्या अंतर्गत टीममध्ये एकदा सुरू होती. सर्वांनी काही ना काही उत्तरं दिली. त्यावेळी प्रमोद महाजन सगळ्यांना खोदून खोदून विचारत होते. महाजनांचं जीवन विविधतेनं भरलेलं होतं. वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांनी स्वत:ला जोडलेलं असायचं. त्यांनी मलाही विचारलं. माझ्यासाठी हे खूप कठीण आहे. कारण मला काहीच येत नाही, असं मी म्हटलं. जी जबाबदारी मिळेल, मी तिलाच आयुष्य मानत आलो आहे," असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याचा काही अर्थ आहे का, त्यांचे आणि महाजनांचे संबंध कसे होते, हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

'रथयात्रा दोघांनी प्रत्यक्षात आणली'

ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते, "लालकृष्ण अडवाणींनी भाजपमधील तरुण कार्यकर्त्यांना त्याकाळी मोठ्या प्रमाणावर समोर आणलं. त्यात सुषमा स्वराज, अरुण जेटली, प्रमोद महाजन, नरेंद्र मोदी यांची नावं होती. त्यामुळे त्याकाळी हा सगळा कंपू बरोबर राहिला. प्रमोद महाजन मुंबईतले असल्यामुळे त्यांना औद्योगिक संस्कृतीची ओळख होती, ज्याचं मोदींना कदाचित आकर्षण वाटत असेल."

फोटो स्रोत, SEBASTIAN D'SOUZA/getty images

"असं म्हणतात की, अडवाणींची जी रथयात्रा होती, ती प्रमोद महाजन आणि नरेंद्र मोदी या दोघांनी मिळून प्रत्यक्षात आणली होती. म्हणजे conceptual design महाजनांचं होतं, तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जो organizational setup उभा करायचा असतो, तो नरेंद्र मोदींना केला होता. त्यामुळे दोघांचे परस्पर संबंध खूप पूरक होते," त्या पुढे सांगतात.

"आता प्रमोद महाजन नाहीयेत. त्यामुळे मोदींना त्यांचं भय वाटायचं काही कारण नाहीये. प्रमोद महाजन यांचा उल्लेख करणं मोदींना सहज सोपं आहे. त्यात एक श्रद्धांजलीपर आदर व्यक्त करणं पण होऊन जातं," असंही त्या सांगतात.

दोघांमध्ये स्पर्धा?

मोदी आणि महाजन यांच्यात स्पर्धा असण्याचं कारण नव्हतं, असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना वाटतं.

त्यांच्या मते, "मुंबईत भाजपचं अधिवेशन झालं होतं त्यावेळी अडवाणी आणि महाजन हे राम-लक्ष्मणाची जोडी आहेत, असं वाजपेयींनी म्हटलं होतं. म्हणजे प्रमोद महाजनांना वाजपेयी यांनी लक्ष्मण असं संबोधल होतं. भाजपचे भविष्यातील मोठे नेते, असं त्यांना त्यातून सांगायचं होतं.

"यानंतर महाजन दूरसंचार मंत्री झाले. त्यावेळी नरेंद्र मोदी हे नेतृत्वाच्या फळीत कुठेच नव्हते. ते साधे प्रवक्ते आणि पदाधिकारी होते. वेगवेगळ्या चॅनेलवरच्या चर्चांमध्ये ते जात असत. जोपर्यंत त्यांना गुजरातमध्ये पाठवलं नाही, तोपर्यंत मोदी नेतृत्वाच्या शर्यतीत कुठेही नव्हते. त्यामुळे मोदी आणि महाजन यांच्यात स्पर्धा असण्याचं काही कारण नव्हतं."

फोटो स्रोत, Hindustan Times/getty images

फोटो कॅप्शन,

प्रमोद महाजन यांचं 2006मध्ये निधन झालं. त्यांच्या अंत्यविधीला नरेंद्र मोदी उपस्थित होते.

सुनील चावके यांना मात्र मोदी आणि महाजन प्रतिस्पर्धी होते, असं वाटतं.

ते सांगतात, "प्रमोद महाजन आणि नरेंद्र मोदी सहकारी होते आणि प्रतिस्पर्धीही होते. कारण महाजनांचंही लक्ष्य 2009 आणि 2014 होतं. हे लक्ष्य ठेवूनच ते आपलं positioning करत होते. 2014मध्ये मी पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल अशी ते मोर्चेबांधणी करत होते.

"नरेंद्र मोदीदेखील त्याच सुमारास मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांची लोकप्रियता खूप होती. 2001नंतर ते चांगल्या पद्धतीने प्रस्थापित झाले होते. त्यामुळे पुढे चालून आपण एकमेकांचे पंतप्रधानपदासाठीचे स्पर्धक असू, याची दोघांनाही बऱ्यापैकी कल्पना होती."

प्रमोद महाजन आज असते तर...

"प्रमोद महाजनांची हत्या नसती झाली, तर कदाचित ते पण मोदींप्रमाणे क्रमांक एकचा नेता व्हायला समोर आले असते का? हा प्रश्न आहे, कारण त्यांच्यात ती क्षमता होती.

"पण त्याचवेळेला आपण हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की, मोदी हे एकहाती गुजरात जिंकत होते. प्रमोद महाजनांना शिवसेनेची मदत घेऊन महाराष्ट्रात राजकारण करावं लागत होतं. त्यामुळे कधीतरी मोदी की महाजन असा संघर्ष निर्माण झाला असता, तर कदाचित मोदी सरस ठरले असते. पण औद्योगिक घराण्यांनी महाजनांच्या पाठीशी स्वत:चं माप टाकलंही असतं. इतिहासानं ती वेळ येऊ दिली नाही. त्यामुळे मोदी आणि महाजन यांच्यातले मैत्रीपूर्ण संबंधच समोर येत राहिले," मृणालिनी नानिवडेकर पुढे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

हेमंत देसाई मात्र वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते, "प्रमोद महाजनांचं पक्षात वरचं स्थान होतं. महाराष्ट्रात युतीचे शिल्पकार असण्याचं श्रेय त्यांच्याकडे गेलं. तसं गुजरातमध्ये भाजप वाढवण्याचं मुख्य श्रेय मोदींना जात नाही. कारण त्यावेळी तिथं केशूभाई पटेल आणि शंकरसिंह वाघेला यांचं प्रस्थ होतं."

मोदी विरुद्ध महाजन यांची तुलना योग्य होणार नाही, असं चावके यांना वाटतं.

ते सांगतात, "गुजरात हे राज्य सुरुवातीपासूनच म्हणजे नरेंद्र मोदींचा उदय होण्याच्या आधीपासूनच भाजपची एकहाती सत्ता असलेलं आणि वर्चस्व असलेलं राज्य होतं. तसं महाराष्ट्र कधीच राहिलेलं नाही. आत्ता अलीकडे भाजपचं महाराष्ट्रात वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. त्यामुळे तशी तुलना करणं योग्य नाही. शिवाय गुजरात 26 जागांचं आहे, महाराष्ट्रात भाजप तितक्या जागा लढतं. त्यामुळे ही तुलना तशी योग्य नाहीये."

"ज्या पद्धतीने दिल्लीच्या राजकारणात मोदींनी प्रवेश केला, तो प्रवेश महाजन हयात असते, तर तेवढ्या सहजपणे शक्य झाला असता का, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण राज्य पातळीवरचे नेते हे राज्य पातळीवरच राहतात. वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान, रमण सिंह, कल्याण सिंह ही याची उदाहरणं आहेत," ते पुढे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)