राज ठाकरे म्हणतात.. नरेंद्र मोदींच्या मूळगावी वडनगरमध्येच पुरेशी शौचालयं नाहीत #पाचमोठ्याबातम्या

मोदी ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images/BBC

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :

1) नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधल्या मूळ गावी पुरेशी शौचालयं नाहीत - राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर या गावाची अवस्था बिकट असून, तशीच परिस्थिती त्यांनी दत्तक घेतलेल्या उत्तर प्रदेशातील नागेपूर गावाची आहे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

केंद्रातील भाजप सरकारच्या गेल्‍या पाच वर्षांत जाहीर करण्यात आलेल्या सर्व योजनांचा बोजवारा उडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या मूळ गावातील लोकांनाच शौचालय नसल्‍याने उघड्यावर शौचाला जावे लागते.

मोदी त्यांनी जाहीर केलेल्या एकाही योजनेवर बोलायला तयार नाहीत. मात्र, योजनांच्या जाहिरातींवर साडेचार हजार कोटींचा खर्च करून जनतेला भुरळ घातली जात आहे.

खोटे बोला पण रेटून बोला हाच यांचा उद्योग आहे. संपूर्ण भाजपलाच खोटे बोलण्याचा रोग जडला असल्‍याची टीका राज ठाकरे यांनी केली, असंही या बातमीत म्हटलं आहे.

2) पेप्सिको कंपनीने गुजरातच्या शेतकऱ्यांविरोधात केला 1.05 कोटी रुपयांचा दावा

पेप्सिकोचं 'Lays' चीप्सचं वाण विनापरवानगी उगवल्यामुळं कंपनीनं गुजरातच्या 4 शेतकऱ्यांवर 1.05 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. द हिंदूने ही बातमी दिली आहे .

शुक्रवारी अहमदाबाद कोर्टात या केसवर सुनावणी होणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images

शेतकरी संघटनांनी कंपनीच्या दाव्याविरोधात आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. तर सरकारला यामध्ये हस्तक्षेप करायला सांगितलं आहे.

याचे पडसाद इतर पिकांच्या उगवण्यावर पडू शकतात, अशी शेतकऱ्यांना भीती आहे.

शेतकरी जर ब्रँडेड पिकाचे बी बाजारात अवैधरित्या विकत नसतील ते कोणत्याही पिकाचं वाण उगवू शकतात, असा शेतकरी संघटनांचा दावा आहे.

यााबाबत द हिंदूने कंपनीशी संपर्क साधला असता, हा मुद्दा न्यायालयात असल्यानं कोणतीही प्रतिक्रिया देण्यास कंपनीने नकार दिला, असंही या बातमी म्हटलं आहे.

3) 'मोदी सरकार जात नाही, तोपर्यंत शर्ट घालणार नाही'

मोदी सरकार जाणार नाही, तोपर्यंत शर्ट घालणार नाही, असं येवला तालुक्यातील कृष्णा डोंगरे या कांदा उत्पादकाने म्हटलं आहे.

बुधवारी निफाड येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर त्यानं हे जाहीर केल्याचं लोकसत्तानं म्हटलं आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते.

सभेसाठी शरद पवार उभे राहताच गर्दीतून कृष्णा डोंगरे हा युवा कांदा उत्पादक व्यासपीठावर चढला. कांद्याला भाव मिळत नसल्याने अर्धनग्न आंदोलन करत असल्याचे त्याने सांगितले.

पिंपळगाव येथे झालेल्या नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊ नये म्हणून आदल्या दिवशीच पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले. सभा झाल्यानंतर आपली सुटका करण्यात आली, असंही या बातमीत म्हटलं आहे.

4) 'बालाकोटमधल्या सहापैकी पाच ठिकाणांचा भारतीय हवाई दलाने वेध घेतला'

बालाकोटमधील ठरलेल्या सहा ठिकाणांपैकी पाच ठिकाणांवर अचूक हल्ला केल्याचं भारतीय हवाई दलानं नमूद केलं आहे.

यामध्ये सहा इस्राएल बनावटीच्या लक्षवेधी Spice 2000 Penetrator type PGM (precision-guided munition)चा वापर केला होता. द इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिली आहे.

"बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद आतंकवादी प्रशिक्षण केंद्रावर हा हल्ला केल्याचं," IAF Review मध्ये नमूद केलं आहे.

फोटो स्रोत, @OFFICIALDGISPR

35 वर्षं जुन्या मिराज विमानातून सहावं Spice 2000 Penetrator type PGM टाकता आलं नसल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.

5) पुण्याच्या योगेंद्र पुराणिक यांनी जपानची महापलिका निवडणूक जिंकली

टोकियोतील एडोगावा येथील महापलिका निवडणुकीत मूळचे पुण्याचे आणि आता जपानमध्ये स्थायिक झालेले योगेंद्र पुराणिक यांनी विजय मिळवला आहे. ABP माझानं ही बातमी दिली आहे.

योगेंद्र पुराणिक हे कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपान या पक्षाकडून ( CDP) निवडणूक लढले. हा पक्ष जपानमधील मोठा विरोधी पक्ष आहे.

जपानमध्ये निवडणूक जिंकणारे पुराणिक पहिलेच भारतीय ठरले आहेत.

तसंच जपानमध्ये सर्वाधिक मते मिळणाऱ्या उमेदवारांमध्ये ते पाचव्या क्रमांकावर आहेत. महापलिका निवडणुकीत ते सुमारे 6 हजार 477 मतांनी निवडून आले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)