कन्हैया कुमार आणि तन्वीर हसन यांच्या लढाईमुळे बेगूसरायमध्ये गिरिराज सिंह यांचा मार्ग सोपा?

  • रजनीश कुमार
  • बीबीसी प्रतिनिधी, बेगूसरायहून
कन्हैया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कन्हैया

बेगूसराय मतदारसंघातून विजय कोणाचाही होवो परंतु आपल्या शहराची देशभरात चर्चा होत असल्याचं श्रेय इथले लोक कन्हैया कुमारला देत आहेत.

आयुष्यात कधीही बिहारला न आलेले शेकडो लोक कन्हैयामुळे इथं आले आहेत. त्यामुळे इथल्या चांगल्या हॉटेलांमध्ये जागाच राहिलेली नाही. परदेशातूनही संशोधक इथं आले असून ते कन्हैयाचा प्रचार कार्यक्रम जवळून पाहात आहेत.

फ्रान्समधून आलेले थॉमससुद्धा त्यांच्यापैकीच एक आहेत. बुधवारी दुपारी कन्हैयाचा प्रचार अनुभवल्यावर जेवताना थॉमस यांची ओळख झाली.

"कन्हैया जातींची वोट बँक तोडताना दिसून येत आहे. त्याला प्रत्येक जातीचं मत मिळेल असं थॉमस यांचं निरीक्षण आहे. कन्हैयाला आपल्याच जातीची म्हणजे भूमिहारांची कमी मतं मिळतील", असं थॉमस यांना वाटतं.

गेले 12 दिवस थॉमस बेगूसरायमध्ये आहेत. मुस्लीम वस्त्यांमध्ये ते जात आहेत. दलितांना भेटून एखादा तरुण जातीय व्होट बँक तोडू शकतो का, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. झारखंडचे सर्फराज त्यांना बेगूसरायच्या गल्ल्यांमध्ये आणि गावांमध्ये फिरवत आहेत.

सर्फराज गेले 20 दिवस बेगूसरायमध्ये मुस्लीम वस्त्यांमध्ये फिरून लोकांचं मत समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

सर्फराज सांगतात, "कन्हैयाकडून मुसलमानांना भरपूर अपेक्षा आहेत. कन्हैयाचं म्हणणं ते लक्ष देऊन ऐकत आहेत. तन्वीर हसन यांच्या नावामुळे मनामध्ये थोडी चल-बिचल नक्कीच आहे. परंतु कन्हैयाला मुसलमानांची 50 टक्क्यांहून अधिक मतं मिळतील हे निश्चित.''

फोटो स्रोत, KANHAIYA KUMAR, TWITTER

फोटो कॅप्शन,

कन्हैया कुमार

"बेगूसरायमध्ये मुसलमान मतदारांची संख्या सुमारे 3 लाख इतकी आहे. तसंच भूमिहार जातीचे लोक इथं सर्वाधीक आहेत. भूमिहार मतदारांची संख्या 4 लाखांहून जास्त आहे. भूमिहारांनंतर दलित मतदारांची संख्या सर्वांत जास्त आहे. कन्हैयाला आपल्या जातीची भरपूर मतं मिळणार नाहीत", असं सर्फराज म्हणतात.

बेगूसरायचे मुसलमान आपला पाठिंबा राजदचे उमेदवार तन्वीर हसन यांना असल्याचं सांगतात परंतु ते कन्हैयाचं कौतुकही करतात.

'कन्हैया अपक्ष लढला असता तर जास्त चांगलं ठरलं असतं'

सोमवारी बेगूसरायमधील बछवाडामध्ये तेजस्वी यादव यांची प्रचारसभा झाली. मुसलमानांचं मत काय आहे? असं या प्रचारसभेत आलेल्या मोहम्मद तबरेज यांना विचारलं.

त्यावर ते म्हणाले, "तन्वीर हसन बरे आहेत. कन्हैयासुद्धा बरा आहे. परंतु कन्हैयानं सीपीआयकडून लढायला नको होतं. तो अपक्ष लढला असता तर जास्त चांगलं झालं असतं."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कन्हैया कुमार, गिरिराज सिंह

भूमिहारांशिवाय इतर जातींमध्ये कन्हैयाची प्रतिमा चांगली आहे, पण त्यांच्या पक्षाची प्रतिमा चांगली नाही. इतकंच नव्हे तर मुसलमानांमध्येही सीपीआयची प्रतिमा फारशी चांगली नाही.

सीपीआय म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पार्टीची प्रतिमा इतर जातींमध्ये उच्च जातीची पार्टी अशी आहे. बेगूसरायमधील सीपीआयची रचना पाहिली की ते बरोबर वाटतं. सीपीआय ही बिहारमध्ये एका जिल्ह्यापुरती आणि एका जातीपुरती मर्यादीत पार्टी असल्याचं तेजस्वी यादव यांनी नुकतंच सांगितलं.

'कन्हैयाची व्होट बँक नाही'

बेगूसरायमधील सीपीआय नेते आणि डावे विचारवंत भगवान प्रसाद सिन्हा म्हणतात, तेजस्वीला शिकवलं जात आहे आणि त्या शिकवणीप्रमाणे तो बोलत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कन्हैया कुमार

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

सिन्हा सांगतात, लालू प्रसादसुद्धा सीपीआय भूमिहारांचा पक्ष असल्याचं सांगत. 90 च्या दशकात जलालुद्दीन अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली सीपीआय वाढली. कम्युनिस्ट पार्टीमध्ये जातीच्या नावाने नेतृत्व मिळत नाही. ज्याच्याकडे क्षमता असते तो नेतृत्व करू शकतो. रामावतार यादव शास्त्री पाटण्याचे खासदार होते. रामअसरे यादव खासदार झाले, चंद्रशेखर सिंह यादव खासदार झाले, सूरजप्रसाद सिंह कुशवाहा खासदार झाले. सीपीआयची बिहारमध्ये चांगली स्थिती होती तेव्हा असं चित्र होतं. अनेक मुसलमान आमदार झाले. अजूनसुद्धा तुम्ही याला भूमिहारांचाच पक्ष म्हणाल का?

भगवान सिन्हा म्हणतात, "कन्हैयानं जातीचं राजकारण केलं असतं तर त्याला आपल्या जातीची सर्वाधीक मतं मिळाली असती. पण खरंतर त्याला त्याच्या जातीची कमी मतं मिळतील. कन्हैयाकडे कोणतीही व्होट बँक नाहीय. तन्वीर हसन आणि भाजपाची व्होट बँक आहे. व्होट बँकेचं राजकारण कन्हैया मोडायचा प्रयत्न करत आहे आणि ते दिसायलाही लागलं आहे."

सिन्हा म्हणतात, कन्हैयाच्या उदयामुळे तेजस्वी यांना असुरक्षीत वाटू लागलं आहे. त्यामुळेच आश्वासन देऊनही त्यांनी बेगूसरायमध्ये महागठबंधनतर्फे तन्वीर हसन यांना उमेदवारी दिली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

तेजस्वी यादव, शरद यादव, कन्हैया कुमार

तन्वीर हसन म्हणतात, सीपीआय वरवर जातीविरोधात बोलते, पण त्यांच्या नेत्यांचं वागणं पाहिलं की त्याच्यामधील जातीय श्रेष्ठतेची भावना दिसून येते.

यावर भगवान सिन्हा म्हणतात, तन्वीर हसन भूमिहार मुसलमान आहेत. त्यामुळे तो हा आरोप करू शकत नाहीत.

हसन यांचं कुटुंब भूमिहारापासूनच मुस्लीम झालं आहे, असं सिन्हा सांगतात.

तन्वीर हसन यांचा 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपाकडून 58 हजार मतांनी पराभव झाला होता. मोदी लाटेतसुद्धा तन्वीर हसन यांना इतकी मतं कशी मिळाली होती?

सर्फराज सांगतात, "तन्वीर हसन यांना 3 लाख 61 हजार मतं मिळाली होती. ती मतं केवळ राजदची नव्हती. मोदींमुळे मुसलमानांनी त्यांना एकगठ्ठा मतं दिली होती. 2014मध्ये तन्वीर यांना सीआयएमएलची मतंही मिळाली होती. आता तशी स्थिती नाही.

बेगूसरायचे भूमिहार कन्हैयाला भावी काळातला नेता म्हणून स्वीकारण्यास का तयार नाही? असं विचारल्यावर, "कन्हैया कुमार एखाद्या विशिष्ट गटाचा नेता व्हायला आलेला नाही असं भगवान सिन्हा सांगतात."

पण भूमिहार नक्की कोणाला मतदान करणार ? हिंदुस्तान दैनिकाच्या बेगूसरायमधील ब्यूरो प्रमुख स्मित पराग सांगतात, कन्हैया जल्लेवाड भूमिहार आहे आणि बेगूसरायमध्ये जवळपास निम्मे भूमिहार जल्लेवाड भूमिहार आहेत. जल्लेवाड कन्हैयाला मतदान करतील.

कन्हैया आणि तन्वीर यांच्या लढाईत भाजपाचा फायदा

बेगूसरायमध्ये सर्वांत जास्त लढाई कन्हैया आणि तन्वीर हसन यांच्यामध्ये आहे. कारण दोघांचं लक्ष्य एकच आहे. या दोघांच्या लढाईत आपला फायदा होईल असं भाजपाला वाटत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

तन्वीर हसन, गिरिराज सिंह, कन्हैया कुमार

गिरिराज सिंह यांच्या कंपूमध्ये फिरून आलं की त्याचा अंदाज येऊ शकतो. गिरिराज सिंह मंगळवारी त्यांच्या काफिल्यासह राष्ट्रकवी दिनकर यांच्या सिमरियासह आठ गावांमध्ये जाऊन आले. परंतु सिंह गाडीमधून उतरलेही नाहीत. कोणासमोर भाषणही दिलं नाही. इतकेच नव्हे तर दिनकर यांच्या घरीही गेले नाहीत.

आपल्या विजयाची गिरिराज सिंह यांना खात्री आहे असं अनेक लोकांना वाटतं. तन्वीर आणि कन्हैया मैदानात असल्यामुळे त्यांचा हा समज दृढ झाला आहे.

गिरिराज गाडीमधून न उतरल्याबद्दल सिमरियाच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली, परंतु मोदींमुळे आपण गिरिराज यांनाच मत देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

गिरिराज यांचा काफिला सिमरियामधीस गंगाप्रसाद गावातून जात होता. अरुंद गल्लीमुळे गाड्या थांबल्या. गिरिराज यांच्याविरोधात कोण आहे, असं एका घराबाहेर उभ्या असलेल्या हीरा पासवान यांना विचारलं त्यावर ते म्हणाले, डफलीवाला (कन्हैया) ठीक वाटतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)