IPL 2019 : बंगळुरूचा सलग तिसरा विजय, 'प्ले ऑफ'मध्ये खेळण्याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह
- आदेश कुमार गुप्त
- क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदी

फोटो स्रोत, Getty Images
आयपीएलच्या बुधवारी झालेल्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं किंग्ज इलेव्हन पंजाबला 17 धावांनी हरवलं. 82 धावांची खेळी करणारा एबी डी'व्हिलियर्स हा बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
पंजाबसमोर विजयासाठी 203 धावांचं मोठं लक्ष्य होतं. मात्र पंजाबचा संघ निर्धारित 20 षटकांत सात विकेट गमावून केवळ 185 धावाच करू शकला. पंजाबचा सलामीचा फलंदाज ख्रिस गेलनं 23, केएल राहुलनं 42, निकोलस पूरननं 46 आणि डेव्हिड मिलरनं 24 धावा केल्या.
बंगळुरूच्या उमेश यादवनं 36 धावांच्या बदल्यात 3 तर नवदीप सैनीनं 33 धावांच्या बदल्यात 2 विकेट घेतल्या.
नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चार विकेटमध्ये 202 धावा केल्या. बंगळुरूचा सलामीवीर पार्थिव पटेलनं 43, एबी डी'व्हिलियर्सनं नाबाद 82 आणि मारकस स्टोइनिसनं नाबाद 46 धावा केल्या.
एबी डी'व्हिलियर्सनं 44 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि सात षटकारांच्या मदतीनं 82 धावा काढल्या. मार्कस स्टोइनिसनं 36 चेंडूंमध्ये नाबाद 26 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीमध्ये दोन चौकार आणि तीन षटकारही लगावले.
पंजाबच्या मोहम्मद शमीनं 53 धावांच्या बदल्यात 1 तर विलजोईननं 51 धावांच्या बदल्यात 1 विकेट घेतली.
एबी डी'व्हिलियर्सनं केवळ नाबाद 82 धावाच केल्या नाहीत, तर क्षेत्ररक्षणातही आपली कमाल दाखवली. डी'व्हिलियर्सनं फॉर्ममध्ये येऊन फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड मिलर, ख्रिस गेल आणि निकोलस पूरनचे कॅच पकडून त्यांना बाद केलं.
बुधवारच्या विजयानंतर गुणतक्त्यामध्ये बंगळुरूची पहिल्यांदाच किंचित प्रगती पहायला मिळाली. आठव्या स्थानावरून बंगळुरूचा संघ सातव्या स्थानावर पोहोचला. 11 सामन्यांमध्ये बंगळुरूनं चार विजय मिळवले तर सात सामन्यांमध्ये पराभव पत्करला. त्यांच्या खात्यात आतापर्यंत 8 पॉइंट्स जमा झाले आहेत.
दुसरीकडे 11 सामन्यांमध्ये पाच विजय आणि सहा पराभवांसह पंजाबचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
डी'व्हिलियर्सचा करिष्मा
आपण जगातील इतर फलंदाजांपेक्षा वेगळे कसे आहोत, हे पंजाबविरूद्धच्या सामन्यात डी'व्हिलियर्सनं पुन्हा एकदा दाखवून दिलं.
एबी डी'व्हिलियर्सच्या बॅटमधून जेव्हा धावा बरसायला लागतात, तेव्हा भल्याभल्या गोलंदाजांची कशी दमछाक होते, याचा अनुभव बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर उपस्थित क्रिकेटरसिकांनी घेतला.
फोटो स्रोत, Getty Images
बंगळुरूचा स्कोअर एक विकेट गमावून 35 असताना एबी डी'व्हिलियर्स फलंदाजीसाठी मैदानात उतरला. तेव्हा कर्णधार विराट कोहली 13 धावा काढून मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला होता.
डी'व्हिलियर्स आणि पार्थिव पटेलनं बंगळुरूचा स्कोअर 71 धावांपर्यत पोहोचवला. त्यानंतर पार्थिव पटेल अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. पार्थिव पटेलनं 24 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या.
71 धावांपासून 81 धावांपर्यंत पोहोचताना बंगळुरूनं चार विकेट गमावल्या होत्या. पार्थिव पटेलनंतर मोईन अली 4 आणि आकाशदीप नाथ 3 धावा काढून बाद झाले.
बंगळुरूचा संघ अडचणीत आला असताना डी'व्हिलियर्सला मार्कस स्टोइनिसनं साथ दिली.
या दोघांनी पहिल्यांदा खूप सांभाळून खेळ केला आणि त्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. डिव्हिलियर्ल आणि स्टोइनिसनं शेवटच्या दोन षटकामध्ये 48 धावा काढल्या.
शमीच्या एका षटकात 21 धावा
19 वं षटक मोहम्मद शमीनं टाकलं. यामध्ये डी'व्हिलियर्सनं तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार ठोकले. शमीच्या या एका षटकात एकूण 21 धावा निघाल्या.
पहिले दोन षटकार त्यानं मिडऑफला लगावले. तिसरा षटकार चांगलाच अवघड होता. केवळ डी'व्हिलियर्सच अशापद्धतीनं खेळू शकतो.
मोहम्मद शमीला यॉर्कर टाकायचा होता, मात्र चेंडू थेट फुलटॉस पडला. डी'व्हिलियर्स ऑफ स्टंपच्या बाजूला झुकला. जो चेंडू थेट त्याच्या हॅल्मेटवर जाऊन आदळेल असं वाटत होतं, तो त्यानं मिडविकेटच्या दिशेनं भिरकावला. त्याचं टायमिंग इतकं जबरदस्त होतं, की चेंडू थेट बाउंड्री लाइनच्या बाहेर पोहोचला.
हा जबरदस्त फटका पाहिल्यानंतर समालोचक पण आश्चर्यचकित झाले. 'या स्टाइलमुळंच डी'व्हिलियर्सला मिस्टर 360 डिग्री म्हटलं जातं,' असं त्यांनी सांगितलं.
फोटो स्रोत, Getty Images
मारकस स्टोइनिस
शेवटचं षटक हर्डस विलजोइनंन टाकलं. त्याच्या या षटकात बंगळुरूनं 27 धावा काढल्या. या षटकात डी'व्हिलियर्सनं नाही, स्टोइनिसनं फटकेबाजी केली.
त्यानं तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्यावर षटकार, पाचव्यावर पुन्हा चौकार आणि सहाव्या चेंडूवर षटकार लगावला. या षटकातल्या पहिल्या चेंडूवर डी'व्हिलियर्सनंही षटकार लगावला होता.
अशातऱ्हेनं या दोन षटकांत काढलेल्या 48 धावांच्या मदतीनं डी'व्हिलियर्स आणि स्टोइनिसनं पाचव्या विकेटसाठी 68 चेंडूंमध्ये नाबाद 121 धावांची भागीदारी केली.
फोटो स्रोत, Getty Images
एबी डी'व्हिलियर्स आणि विराट कोहली
'10 धावांमध्ये तीन विकेट गमावल्यानंतर आमची परिस्थिती बिकट झाली होती. तेव्हा 160 धावाच होऊ शकतील असं वाटत होतं. मात्र स्टोइनिससोबतच्या भागीदारीमुळं चांगला स्कोअर करणं शक्य झालं,' असं डी'व्हिलियर्सनं नंतर सांगितलं.
सलग तीन सामन्यात मिळालेल्या विजयानं कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं आहे. आता उरलेले सर्व सामने जिंकून बंगळुरू प्ले ऑफमध्ये पोहचणार का, याबद्दल अजूनही साशंकता आहे. मात्र ज्या कोणत्या संघाला बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागेल, त्याचं पुढचं गणित बिघडेल हे मात्र नक्की.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)