वाराणसीत नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो, तर काँग्रेसकडून प्रियंका गांधींना नव्हे तर अजय राय यांना उमेदवारी

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

"आधी मला असं वाटत होतं, की भाजपनं मला इथं पाठवलंय. मी काशीला जात आहे, असंही कधीकधी मनात यायचं. पण आता इथं आल्यावर जाणवतंय की ना मला कोणी पाठवलंय ना मी स्वतःहून इथं आलोय. गंगेनं मला बोलावलं आहे." (मुझे किसी ने नहीं भेजा और न ही मैं स्वयं यहां आया हूं...माँ गंगा ने मुझे यहा बुलाया है)

2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज भरताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे भावूक उद्गार काढले होते. भाजपकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून निवडणूक लढवताना नरेंद्र मोदींनी वडोदऱ्यासोबतच वाराणसीचीही निवड केली होती.

लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशमधील मतदारांना आकर्षित करून घेणं हा यामागचा उद्देश होताच. पण त्याबरोबरच हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या काशी अर्थात वाराणसीमधून निवडणूक लढवणं हे भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यालाही पूरक होतं.

या लोकसभा निवडणुकीतही मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून लढत आहेत. सध्या तरी या मतदारसंघात मोदींसमोर कडवं आव्हान नाहीए. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका गांधी वाराणसीमधून निवडणूक लढणार अशी चर्चा होती. मात्र काँग्रेसनं वाराणसीमधून अजय राय यांना उमेदवारी देत, या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अजय राय गेल्यावेळेसही वाराणसीमधून मोदींविरोधात लढले होते.

मात्र तरीही उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपाची झालेली युती, पूर्वांचलच्या प्रभारी म्हणून प्रियंका गांधींनी स्वीकारलेली सूत्रं यांमुळे मोदींसाठी इथली समीकरणं कशी आणि किती बदलली आहेत, हा प्रश्न आहे.

ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाईंच्या मते मोदी वाराणसीमधून निवडून येतील यामध्ये काहीच शंका नाहीये. पण 2014 च्या तुलनेत इथली परिस्थिती काही प्रमाणात बदलली आहे, हे नक्की.

'मोदींच्या विजयाबद्दल साशंकता नाही'

बीबीसी मराठीशी बोलताना रशीद किडवाई यांनी सांगितलं, की पंतप्रधानपदाचा उमेदवार दुसऱ्या राज्यातून येऊन आपल्या मतदारसंघातून लढतोय याचं नावीन्य आता वाराणसीच्या लोकांमध्ये नाहीए. मोदींना लोकांचा पाठिंबा असला तरी इथे झालेल्या कामांबद्दल प्रश्नही उपस्थित होत आहेत. एकूणच आता 2014 चा उत्साह व्यावहारिक मुद्द्यांमध्ये रुपांतरित झाला आहे. त्यामुळंच मोदींच्या विजयाबद्दल साशंकता नसली, तरी गेल्यावेळेप्रमाणे केवळ भावनांच्या आधारे मतदान होणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेसनं उत्तर प्रदेशमध्ये पूर्वांचलची जबाबदारी प्रियंका गांधींकडे सोपवली आहे. पूर्वी केवळ अमेठी आणि रायबरेलीतील प्रचारापुरतं स्वत:ला मर्यादित ठेवणाऱ्या प्रियंकांनी उत्तर प्रदेशवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. वाराणसीमध्ये काँग्रेससाठी 'प्रियंका फॅक्टर' किती यशस्वी होईल, हाही प्रश्न आहे.

'निकाल माहीत असल्यानंच प्रियंकांची माघार'

"गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या विरुद्ध अरविंद केजरीवाल उभे राहिले होते. केजरीवाल हा आंदोलनांमधून पुढे आलेला चेहरा होता. ठराविक वर्तुळात त्यांची लोकप्रियता होती. पण ते वाराणसीमधून नरेंद्र मोदींना लढत देऊ शकले नाहीत. आजही हीच परिस्थिती आहे. प्रियंका गांधींनी कितीही आक्रमक प्रचार केला तरी तरी मोदींच्या मताधिक्यात कोणताही फरक पडणार नाही, असं मत बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांनी व्यक्त केलं."

फोटो स्रोत, TWITTER

प्रियंकांच्या निवडणूक न लढविण्याबद्दल प्रदीप सिंह यांनी म्हटलं, की ज्या जागेचा निकाल आधीपासूनच माहिती आहे, त्या जागेवर काँग्रेस प्रियंकांना उमेदवारी देण्याची शक्यता नव्हतीच.

"2014 साली वाराणसीसाठी पंतप्रधानपदाचा चेहरा होते. आता ते पंतप्रधान आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी वाराणसीचा कायापालट केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात इथल्या मतदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. शिवाय मतदार पंतप्रधानांना सोडून दुसऱ्या उमेदवाराला मत का देतील," असंही प्रदीप सिंह यांनी म्हटलं.

वाराणसीतली राजकीय गणितं

मोदींमुळं वाराणसी हाय-प्रोफाईल मतदारसंघ झाला असला तरी पारंपरिकरित्या हा भाजपचाच बालेकिल्ला राहिला आहे. 1991 नंतर एका निवडणुकीचा अपवाद वगळला तर ही जागा कायम भाजपकडेच राहिली आहे. गेल्यावेळेस मोदी आणि केजरीवालांव्यतिरिक्त वाराणसीमधून काँग्रेसचे अजय राय उभे होते. समाजवादी पक्षानं कैलाश चौरासिया आणि बसपनं विजय प्रकाश जायसवालांना उमेदवारी दिली होती.

या पंचरंगी लढतीत नरेंद्र मोदींना पाच लाख 81 हजार मतं मिळाली होती. केजरीवालांना त्यांच्या निम्मीच म्हणजे जवळपास दोन लाख 10 हजार मतं मिळाली होती. काँग्रेसच्या अजय राय यांना 75 हजार, सपाच्या उमेदवाराला 45 हजार आणि बसपाला 60 हजार मतं मिळाली होती.

सप-बसप या निवडणुकीत एकत्र लढत आहे. पण गेल्या वेळेच्या त्यांच्या जागांची बेरीज लाखाच्याच घरात जाते. केजरीवालांची 2 लाख 10 हजार मतं विरोधकांमध्ये विभागली तरी आकडा मोदींना मिळालेल्या मतांच्या आसपास पोहोचत नाही. त्यामुळे आकड्यांच्या हिशोबात पाहिलं तर मोदींच्या मताधिक्याला धक्काही लागणार नाही असंच चित्र उभं राहतं.

वाराणसीच्या विकासाचं चित्र

निवडून आल्यापासून मोदी सातत्यानं वाराणसीला भेट देत आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही त्यांनी वाराणसीला 'प्रोजेक्ट' करण्याची संधी सोडली नाही. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांना घेऊन मोदींनी काशीचं दर्शन घडवलं होतं.

पाच वर्षांपासून अनेक योजनांचा ओघही वाराणसीच्या दिशेनं सुरू होता. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी एका कार्यक्रमात 'मेरी काशी' या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं. वाराणसीसाठीच्या 300 योजनांची यादीच या पुस्तकात देण्यात आली होती. जवळपास 30 हजार कोटी रुपयांच्या योजनांचा यामध्ये उल्लेख होता.

वाराणसीकडे जाणारे तीन राष्ट्रीय महामार्ग आणि वाराणसी रिंग रोडच्या विस्तारासाठी 4 हजार कोटी, वाराणसी कन्व्हेन्शन सेंटरसाठी 185 कोटी रुपये, वाराणसी एअरपोर्टपासून शहरापर्यंत चार पदरी महामार्गासाठी 800 कोटी रुपये, पंडित मदन मोहन मालवीय कॅन्सर सेंटर आणि होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटलसाठी 600 कोटी रुपये, सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 533 कोटी रुपये, पेयजलासाठी 131 कोटी रुपये अशी भरघोस तरतूद करण्यात आल्याचं या पुस्तकात नमूद केलं आहे.

पंतप्रधानांनी आपल्या मतदारसंघातलं जयापूर हे गावही दत्तक घेतलं आहे. एकीकडे वाराणसीसाठी कोट्यवधींचा निधी देणाऱ्या पंतप्रधानांनी आपल्या गावातही अनेक सरकारी योजना राबविल्या. मात्र या योजनांचा गेल्या पाच वर्षांत पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं वृत्त 'द वायर' या वेबसाईटनं प्रसिद्ध केलं आहे. द वायरच्या ग्राउंड रिपोर्टनुसार इथल्या रस्त्यांची स्थिती खराब आहे, इथे केवळ आठवीपर्यंतच शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत, आरोग्य केंद्राची दुरवस्था आहे, स्वच्छ भारत अभियानही इथं अयशस्वी ठरलं आहे.

"माँ गंगा ने मेरे लिए कुछ काम तय किए हैं. जैसे-जैसे माँ गंगा मेरा मार्गदर्शन करती रहेगी, मैं उन कामों को पुरा करता जाऊंगा," असं मोदी यांनी 2014 च्या एका प्रचारसभेत म्हटलं होतं. त्यामुळं वाराणसीतली जी काही कामं अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यासाठी 'माँ गंगा' मोदींना किती मताधिक्याचा आशीर्वाद देणार, हे 23 मे लाच स्पष्ट होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)