मुंबई लोकसभा निवडणूक: आर्थिक राजधानीत मतदारांचा कौल कोणाला?

मुंबईतल्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फोटो कॅप्शन,

मुंबईतल्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकांसह महाराष्ट्रातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी होत आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही जागांवर हे मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात पुण्यामध्ये अत्यंत कमी मतदान झाल्यानंतर आता मुंबईत किती टक्के मतदान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या मतदारसंघासह नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरूर, शिर्डी येथे सोमवारी 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे.

गेल्या निवडणुकीमध्ये मुंबईतील सर्व जागांवर भाजपा-शिवसेना युतीचा विजय झाला होता. मुंबई उत्तर मतदारसंघामध्ये मतदार भाजपाचे गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसतर्फे निवडणूक लढणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यापैकी कोणाला कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

यापूर्वी माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांचा 2004 साली याच मतदारसंघात अभिनेते गोविंदा यांनी पराभव केला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष आहे.

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तीकर आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यामध्ये लढत होत आहे. गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या निरुपम यांनी यंदा मतदारसंघ बदलला आहे.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. गेल्या निवडणुकीत पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता.

मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात शिवसेनेतर्फे राहुल शेवाळे, काँग्रेसतर्फे एकनाथ गायकवाड यांना तर मुंबई दक्षिणमध्ये शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि काँग्रेसकडून मिलिंद देवरा यांना तिकीट मिळाले आहे. मिलिंद देवरा मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

गेल्या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देवरा यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट होताच हा मोठ्या चर्चेचा विषय झाला होता.

फोटो कॅप्शन,

काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित करताना माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार प्रिया दत्त, माजी खासदार मुरली देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर

ईशान्य मुंबईमध्ये भाजपचे मनोज कोटक आणि राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघातील उमेदवाराचे नाव भाजपने अत्यंत उशिरा जाहीर केले. मावळते खासदार किरीट सोमय्या यांचे तिकीट कापून कोटक यांना तिकीट देण्यात आले आहेत.

मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पार्थ पवार आणि शिवसेनेतर्फे श्रीरंग बारणे यांच्यामध्ये निवडणूक होत आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. रायगड मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादीतर्फे सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत.

भिवंडी मतदारसंघामध्ये भाजपतर्फे कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कल्याणममध्ये शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी बाळाराम पाटील निवडणूक लढवत आहेत. ठाण्यात गेल्या वेळेस विजयी झालेले शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यात निवडणूक होत आहे.

फोटो कॅप्शन,

ईशान्य मुंबईमध्ये किरीट सोमय्यांचे तिकीट कापून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

2014 साली पालघरमध्ये भाजपचे चिंतामण वनगा यांचा विजय झाला होता. चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यानंतर राजेंद्र गावित यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करून पोटनिवडणूक जिंकली होती.

या पोटनिवडणुकीमध्ये चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वगना यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेनेचा या निवडणुकीत पराभव झाला होता. या निवडणुकीमुळे शिवसेना-भाजपा यांच्यामध्ये मोठी नाराजी निर्माण होऊन युती तुटण्यापर्यंत चर्चा होऊ लागल्या होत्या.

आता राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेचे तिकीट मिळवले आहे. त्यांच्याविरोधात माजी खासदार आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे. बहुजन विकास आघाडीला पालघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.

शिरुर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांच्याविरोधात राष्ट्रवादीने अभिनेते अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे कोल्हे प्रसिद्ध आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी ते शिवसेनेत होते.

शिर्डी मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे आणि काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे निवडणूक लढवत आहेत. नंदुरबार मतदारसंघात भाजपाच्या हीना गावित यांच्याविरोधात काँग्रेसने के. सी. पडवी यांना संधी दिली आहे. धुळे मतदारसंघामध्ये संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याविरोधात काँग्रेसचे कुणाल पाटील निवडणूक लढवत आहेत.

दिंडोरी मतदारसंघात भाजपाच्या भारती पवार आणि राष्ट्रवादीचे धनराज हरिभाऊ महाले निवडणूक लढवत आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे समीर भुजबळ निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)