साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणतात गोमूत्राने कॅन्सर बरा झाला.. पण हे खरंच शक्य आहे?

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर Image copyright Getty Images

मालेगाव बाँबस्फोटाच्या आरोपी आणि भाजपच्या भोपाळ मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गोमूत्राने कॅन्सर बरा झाल्याचा दावा केल्यानंतर गोमूत्राने खरंच कॅन्सर बरा होऊ शकतो का अशी चर्चा ट्विटरवर सुरू झाली.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की गोमूत्र आणि पंचगव्यापासून बनलेल्या औषधीपासून माझा कॅन्सर बरा झाला.

प्रज्ञासिंह यांच्या दाव्यामुळे रुग्णांची दिशाभूल होऊ शकते असं कॅन्सरतज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुंबई मिररने केलेल्या बातमीनुसार प्रज्ञासिंह यांचा दावा फसवा आहे असं मत टाटा मेमोरियलचे संचालक राजेंद्र बडवे यांनी मांडलं आहे.

'शपथपत्रावर सांगितलं होतं की कॅन्सर आहे'

आपल्याला कॅन्सर आहे असा दावा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला होता. प्रज्ञासिंह ठाकूर या मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी आहेत आणि सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत. 2017मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला. आपल्याला कॅन्सर आहे त्यामुळे मला जामीन मिळावा असं त्यांनी अर्जात म्हटलं होतं.

त्यांनी जोडलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. त्यांना 2017मध्ये कॅन्सर होता आणि 2019 मध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे की त्यांचा कॅन्सर बरा झाला आहे.

गोमूत्राने खरंच कॅन्सर बरा होऊ शकतो का?

गोमूत्राने कॅन्सर बरा होऊ शकत नाही असं कॅन्सर तज्ज्ञांचं मत आहे. मुंबई येथील कामा रुग्णालयात ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेले डॉ. दिलीप निकम सांगतात की "गोमूत्राने कॅन्सर बरा होऊ शकतो या विधानाला वैज्ञानिक आधार नाही."

Image copyright Getty Images

"एखादं औषध कॅन्सर बरा करू शकते असा वैज्ञानिक दावा करायचा असेल तर त्यासाठी एका मोठी प्रक्रिया असते," डॉ. दिलीप निकम समजावून सांगतात.

"एखाद्या औषधाला बाजारात आणण्याआधी प्रयोगशाळेत क्लिनिकल ट्रायल्स केल्या जातात. त्या औषधावर आधी प्राण्यांवर नंतर माणसांवर टप्प्याटप्याने प्रयोग केले जातात."

"जेव्हा एखादं औषध प्रयोगशाळेत सिद्ध होतं त्यानंतर ते बाजारात उपलब्ध होण्यासाठी किमान 10-15 वर्षांचा कालावधी लागतो. पण या अशा प्रकारच्या ट्रायल्स गोमूत्रावर झाल्या नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं," डॉ. निकम सांगतात.

कॅन्सर कसा बरा होतो?

"आपलं शरीर हे अब्जावधी पेशींचं बनलेलं असतं. शरीरातल्या एखाद्या भागात पेशींची अनावश्यक आणि भरमसाठ, अनियंत्रित वाढ होते त्यालाच कॅन्सर म्हणतात. अनियंत्रित वाढीमुळेच त्या भागात गाठी निर्माण होतात. त्या नियंत्रित करण्यासाठी ऑपरेशन, किमोथेरपी, रेडियोथेरपी केली जाते," डॉ. निकम सांगतात.

Image copyright SPL

अल्टरनेटिव मेडिसिन

किमोथेरपी ऐवजी इतर औषधी (अॅलोपॅथीव्यतिरिक्त) भारतात मोठ्या प्रमाणात घेतली जातात त्याकडे डॉ. निकम लक्ष वेधतात.

"भारतात अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणजे अॅलोपॅथीव्यतिरिक्त पर्यायी औषधी घेणाऱ्या रुग्णांची संख्या खूप आहे. एक संशोधन असं सांगतं की भारतातले किमान 60 टक्के रुग्ण हे अल्टरनेटिव्ह मेडिसिनचा वापर करतात."

"त्यापैकी बहुतांश लोक हे किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी सोबत या पर्यायी औषधांकडे वळतात. पण काही लोक असेही असतात उपचार घेत नाही आणि फक्त अल्टरनेटिव्ह मेडिसिनच घेतात. त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येतं," निकम सांगतात.

योगामुळे कॅन्सर बरा होऊ शकतो का?

योगामुळे कॅन्सर बरा होतो या सारखे दावे आपल्या कानावर येत असतात. योगामुळे कॅन्सर बरा होऊ शकतो का असं विचारलं असता डॉ. निकम सांगतात, "योगामुळे कॅन्सर बरा होत नाही पण रुग्णाचं मनोबल वाढवण्यासाठी योग उपयुक्त आहे. व्यायाम करणे, योगा करणे, योग्य आहार घेणं यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास मदत होते."

"जर रुग्ण योग्य उपचाराबरोबर या गोष्टी करत असतील तर त्याला डॉक्टरांची काहीच हरकत नसते पण फक्त याच गोष्टीवर अवलंबून राहणं हे अयोग्य आहे," असं डॉ. निकम सांगतात.

साध्वी प्रज्ञांचा जामीन रद्द होऊ शकतो का?

साध्वी प्रज्ञांनी आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर आहे असं सांगितलं होतं. प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना न्यायालयाने जामीन दिला होता. जर आता त्यांची प्रकृती चांगली असेल तर त्यांचा जामीन रद्द होऊ शकता का असा प्रश्न देखील विचारला जात आहे.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील या मुद्द्यावर ट्वीट केलं होतं. प्रज्ञा ठाकूर या प्रकृती ठीक नाही या कारणामुळे जर बाहेर असतील तर त्या निवडणूक कशा लढवू शकतात असा प्रश्न ओमर अब्दुल्ला यांनी उपस्थित केला होता.

आधाराशिवाय चालता देखील येत नाही असं म्हणणाऱ्या साध्वी रणरणत्या उन्हात प्रचार करताना दिसत आहेत असं ओमर म्हणाले.

Image copyright Getty Images

ठाकूर यांचा जामीन रद्द होऊ शकतो का? याबद्दल कायदेतज्ज्ञ काय म्हणतात बघा.

आई-वडिलांची प्रकृती ठीक नाही, त्यांचा मृत्यू झाला किंवा स्वतःची प्रकृती नीट नाही या कारणावर जर जामीन दिला असेल आणि पुढे चालून ते कारणच नष्ट झालं असेल जामीन रद्द केला जातो. प्रज्ञासिंह ठाकूर या कायद्याच्या पळवाटांचा वापर करताना दिसत आहेत.

2008च्या बाँबस्फोटातील मृताचे वडील निसार सईद यांनी NIA न्यायालयात तक्रार दाखल केली आहे की जर साध्वी यांनी 'हेल्थ ग्राउंड'वर अर्ज केला आहे तर त्या प्रचार करताना कशा दिसत आहे. त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी असं त्यांनी म्हटलं होतं पण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. निवडणूक लढवण्यावर न्यायालय बंदी घालू शकत नाही. तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे.

'प्रज्ञासिंह ठाकूर यांना कॅन्सर झालाच नाही?'

मुंबईच्या जेजे हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी मुंबई मिररला सांगितलं की 2010मध्ये त्यांनी प्रज्ञा ठाकूर यांची तपासणी केली होती. त्यांच्या तपासण्या घेतल्या होत्या तेव्हा कोणत्याही मोठ्या आजाराची लक्षणं त्यांच्यात दिसली नव्हती. या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीने डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयावर भाष्य करण्यास नकार दिला.

'द हिंदू' वृत्तपत्राशी बोलताना राम मनोहर लोहिया रूग्णालयातील डॉक्टरांनी काय म्हटलं?

लखनौमधील राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे डॉक्टर एस.एस.राजपूत यांनी 'द हिंदू' सोबत बोलताना सांगितलं की, "प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर 'बायलॅटरल मस्टक्टॉमी' अर्थात स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया झाली आहे.

डॉ.राजपूत पुढे सांगतात, "प्रज्ञासिंह यांना स्टेज 1 कॅन्सरचं निदान झालं होतं. जो आक्रमकपणे शरीरात पसरण्याची भीती होती."

Image copyright BBC/AbhijeetKamble

दरम्यान प्रज्ञासिंह यांनी गोमूत्राने कॅन्सर बरा होऊ शकतो असा दावा केलाय, त्यावर तुमचं म्हणणं काय आहे असा प्रश्न विचारल्यानंतर डॉ.राजपूत म्हणाले, "प्रज्ञासिंह यांनी कॅन्सरवर शस्त्रक्रियेनं उपचार केले आहेत. मी 2008 मध्ये पहिल्यांदा मुंबईच्या जेजे रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळी त्यांच्या उजव्या स्तनामध्ये ट्यूमर होता. 2012 मध्ये ट्यूमर पुन्हा उद्भवला. त्यानंतर शस्त्रक्रिया करून त्यांच्या उजव्या स्तनाचा एक तृतीयांश भाग शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला. दुसरी शस्त्रक्रिया भोपाळच्या खासगी रुग्णालयात झाली."

"त्यानंतर ट्यूमर आणि पेशी तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आल्या. ज्यातून त्यांना स्टेज वन कॅन्सर असल्याचं निदान झालं. ज्याचे रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आले आहेत."

"2017 मध्ये प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्यावर 'बायलॅटरल मस्टक्टॉमी' अर्थात स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली."

अर्थात त्यांनी रेडिएशन किंवा किमोथेरपी करण्यात आली का? याची माहित डॉ.राजपूत यांनी दिली नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)