राधाकृष्ण विखे पाटीलांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा राहुल गांधींनी स्वीकारला

राधाकृष्ण विखे पाटील Image copyright Getty Images

राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा स्वीकारला असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

राहुल गांधी यांनी विखे पाटील यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा स्वीकारला असल्याचं, अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर दक्षिणमधून भाजपकडून निवडणूक लढवली आहे.

विखे यांच्यासंदर्भात जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्याबाबत फॅक्ट फाइडिंग करावं लागेल, त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं सुद्धा अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

'विखेंनी काँग्रेसमध्येच रहावं'

विखेंच्या राजीनाम्याच्या विषयावर बीबीसीशी बोलताना अशोक चव्हाण यांनी विखेंनी यापुढेही काँग्रेसचं काम करावं असं त्यांना वाटत असल्याचं सांगितलं आहे.

"राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा याआधीच दिलेला आहे आणि पक्षश्रेष्ठींकडून तो स्वीकारण्यात आलाय. विखे यांनी काँग्रेसचं काम करावं असं मला वाटतं.

वडील एका पक्षात आणि मुलगा दुसर्‍या पक्षात अशी राजकारणात अनेक उदाहरणं आहेत. सिधिंया परिवाराच उदाहरण आहे. यासाठी मी आजही विखेंशी बोललो आहे, मला ते सकारात्मक वाटले. विखे पाटील हे पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या जिल्यात राहुल गांधींची सभा होते आहे. स्वाभाविकपणे राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावं हे अपेक्षित आहे."

...तर काँग्रेसला तोटा

"विखे पाटील हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा आधीच सुरू झाली होती. मुलगा भाजपमध्ये गेल्यावर कॉंग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम करणं हे विखे-पाटलांसाठी कठीण होतं. मुलगा भाजपमध्ये गेल्यावरच विखेंची भाजपकडे वाटचाल सुरू झाली होती असं म्हणता येईल," असं मत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदिप प्रधान यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं आहे.

ते पुढे सांगतात, "याचं कारण सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळं खापर राष्ट्रवादी कॉंग्रेसवर फोडलं होतं. निवडणूकीतही त्यांनी भाजपला छुपी मदत केल्याचं उघड झालं. त्यानंतरही राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेते पदावर ठेवलं असतं तर आघाडीतही वितुष्ट निर्माण झालं असतं. त्यामुळे त्यांचा राजीनामा स्विकारणं हे सहाजिकच आहे. पण त्यांची भाजपच्या दृष्टीने जी वाटचाल सुरू आहे तो कॉंग्रेससाठी सर्वात मोठा धक्का असेल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)