लोकसभा 2019: शरद पवार उद्धव ठाकरे यांना ठाण्यात म्हणाले: बाबा, तू एकदा निवडणूक लढवून दाखव #5मोठ्याबातम्या

उद्धव ठाकरे, शरद पवार Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. उद्धव, बाबा तू एकदा मैदानात उतर, निवडणूक लढवून दाखव - शरद पवार

"उद्धव, बाबा तू एकदा मैदानात तर, निवडणूक लढवून दाखव," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते ठाण्यातील प्रचारसभेत बोलत होते. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

ते म्हणाले, "मी मैदानातून पळ काढला, असं उद्धव म्हणत आहेत. पण मी 14 वेळा निवडणूक लढून जिंकलो आहे. एकदाही पराभूत झालेलो नाही. बाबा, तू एकदा मैदानात उतर. निवडणूक लढून दाखव.

"मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मैदान मला माहीत आहे. तुम्ही एकदा तरी मैदानात उतरा," असं ते प्रत्युत्तरात म्हणाले.

"गुजरात मॉडेलच्या नावाखाली, देशाला विकासाचे मॉडेल बनविण्याच्या नावाखाली सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांना विकासाचे काय झाले, याचा जाब विचारण्याचा हक्क तुम्हा आम्हाला आहे. पण नरेंद्र मोदी विकासाबाबत बोलण्याचं टाळून राष्ट्रवादीच्या नावाखाली लोकांच्या भावना भडकावित आहेत," असंही त्यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रातील मतदानाचा अंतिम टप्पा सोमवारी 29 एप्रिल रोजी असून मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

2. गोगोई यांच्यावरील लैंगिक आरोपांची चौकशी आधी होणार, मग कटाची

रंजन गोगोई यांच्याविरोधातील लैंगिक छळाची तक्रार ही एका व्यापक कटाचा भाग आहे का, याची चौकशी त्यांच्याविरोधातल्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच केली जाणार आहे, असं न्यायाधीश ए. के. पटनाईक यांनी म्हटलं आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रंजन गोगोई

रंजन गोगोई यांच्याविरोधातील लैंगिक छळाची तक्रार ही एका व्यापक कटाचा भाग आहे का, याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी न्यायाधीश ए. के. पटनाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

माझ्या चौकशीचा अहवाल कधीपर्यंत सादर करावा, याबाबत काहीएक वेळेची मर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही. लैंगिक छळाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर कटाविषयीची चौकशी सुरू होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

3. वाराणसीत शंभराहून अधिक जवान मोदींविरोधात लढणार

वाराणसीत 100 हून अधिक निवृत्त आणि निलंबित लष्कर आणि निमलष्कराच्या जवानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कराला दुर्बळ करत असून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत, असं या जवानांचं म्हणणं आहे. हे सर्व जवान वाराणसीमधील मडुआ डीह येथे थांबले आहेत.

Image copyright Getty Images

हे सर्व जवान जेवणाच्या निकृष्ट दर्जाची तक्रार करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान तेज बहादूर यांच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत.

"आपण एक खरे चौकीदार असून, खोट्या चौकीदाराविरोधात लढत आहोत," असं तेज बहादूर यांनी सांगितलं आहे.

4. दाभोळकर हत्येच्या चौकशीत CBIला मदत करा - हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या चौकशी प्रकरणात CBIला शक्य तेवढी मदत करा, असा आदेश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिला आहे. द हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

न्यायाधीश एस. सी. धर्माधिकारी आणि बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दाभोळकरांच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.

Image copyright FACEBOOK/NARENDRA DABHOLKAR

20 ऑगस्ट 2013ला नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात हत्या झाली होती. या हत्येप्रकरणात वापरण्यात आलेल्या शस्त्रांचा शोध घेण्यासाठी पावलं उचललं जात आहेत आमणि 4 ते 6 आठवड्यांत त्याचा शोध लागेल, असं CBIचे अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंह यांनी खंडपीठाला सांगितलं आहे.

5. महाराष्ट्रात उष्णतेची लाट

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे शुक्रवारी तापमानाने उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

महाबळेश्वर आणि कोकण वगळता सर्व जिल्ह्यांत 40 अंशाच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात या हंगामातील सर्वाधिक 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातील सर्वाधिक तापमान 46.8 अंश सेल्सिअस अकोल्यामध्ये नोंदविण्यात आलं आहे.

दरम्यान, शुक्रवारी जगातील सर्वाधिक 15 उष्ण शहरं ही भारतातील आहेत, असं El Dorado या हवामानविषयी वेबसाईटनं म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)