IPL 2019: मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला 46 धावांनी हरवलं, रोहित शर्माचं अर्धशतक

रोहित शर्मा Image copyright Twitter / @ImRO45

शुक्रवारी खेळलेल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या घरच्याच मैदानावर 46 रन्सनी पराभूत केलं. विजयासाठी चेन्नईसमोर 156 रन्सचं लक्ष्य होतं, पण तो संघ 17.4 ओवरमध्ये 109 रन्सवरच आटोपला.

चेन्नईचा सलामीचा फलंदाज मुरली विजयने 38, मिचेल सँटवनरने 22 आणि ड्वेन ब्रावोने 22 धावा केल्या. याशिवाय चेन्नईचा इतर कोणताही फलंदाज लसिथ मलिंगा, कृणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराहच्या चेंडूंचा सामना करू शकला नाही.

शेन वॉटसन, सुरेश रैना, अंबाती रायडू आणि केदार जाधवसारखे फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. लसिथ मलिंगाने 37 रन्सच्या बदल्यात 4, कृणाल पांड्याने 7 रन्सच्या बदल्यात 2 आणि बुमराहने 10 रन्स देऊन 2 विकेट घेतल्या.

रोहितचे अर्धशतक

तत्पुर्वी प्रथम नाणेफेक हरल्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने कॅप्टन रोहित शर्माच्या 67, इवायन लुईसच्या 32, हार्दिक पांड्याच्या नाबाद 32 रन्सच्या मदतीने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 155 रन्स केल्या.

चेन्नईच्या मिचेल सँटनरने केवळ 13 रन्सच्या बदल्यात 2 विकेट घेतल्या. आता जो संघ 156 रन्सही करू शकला नाही तसेच 46 रन्सनी पराभूत होतो तेव्हा याला मोठा पराभवच म्हणावा लागेल. चेन्नई सुपरकिंग्ज हा गतविजेता संघ आहे तसेच यावेळेस 16 अंकांसह सर्वात आधी प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे.

या पराभवाची दोन-तीन कारणं असू शकतात

आजारी असल्यामुळं महेंद्र सिंग धोनी खेळू शकला नाही. तसेच मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मानं या IPL मध्ये त्याचं पहिलंच अर्धशतक पूर्ण केलं. त्याचबरोबर मुंबईच्या बॉलर्समध्ये कृणाल पांड्यानं केवळ सात रन्स देऊन 2 विकेट घेतल्या.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा महेंद्र सिंह धोनी

महेंद्रसिंह धोनी नसला की चेन्नईची ताकद निम्मीच राहाते. शुक्रवारीही तेच दिसून आलं. अचानक आजारी पडल्यामुळं धोनी खेळला नाही, त्यामुळची धुरा सुरेश रैनाकडे आली. धोनी सामना खेळत नसणं हे समोरच्या संघाचं मनोबल वाढवण्यासाठी पुरेसं आहे, असं सामना संपल्यावर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मानं मान्यही केलं.

ज्याप्रकारे धोनी बॉलर्समध्ये बदल करत विरोधी संघाच्या बॅट्समनवर दबाव आणतो तसे इतरांना जमत नाही. त्याचप्रमाणे चेन्नईचे बॅटिंग या सामन्यात आयाराम-गयाराम झालं, तसं धोनी असता तर झालं नसतं. अर्थात आपण विचार करू तसंच होणं क्रिकेटमध्ये शक्य नाही. परंतु धोनीने ते एकदाच नाही तर अनेकदा सिद्ध करून दाखवलं आहे. धोनीवर त्यामुळेच भरवसा टाकला जातो. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मानंही प्रामाणिकपणे ते स्वीकारलं.

चेन्नईच्याविरोधात रोहित शर्माने अत्यंत उत्तम बॅटिंग केली. त्यानं 48 बॉल्समध्ये 6 चौकार आणि 3 सिक्ससह 67 रन्स केल्या. हे त्याचं या IPL मधलं पहिलंच अर्धशतक आहे. आपण 30-40 रन्स तर करत होतो, मात्र मोठी खेळी खेळण्यात अपयश येत होतं, हे त्यानं नंतर मान्य केलं.

चेन्नईपाठोपाठ दुसरे संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बरोबर यावेळेसच रोहितने अर्धशतक केलं आहे.

Image copyright BCCI
प्रतिमा मथळा किरेन पोलार्ड

तसंही चेन्नईच्या मैदानावर रन्स करणं इतकं सोपं नाही. रोहित बाद झाल्यावर तुफान बँटिंग करणारा खेळाडू म्हणून ओळखला जाणारा हार्दिक पांड्या आणि किरन पोलार्डला वेगाने रन्स करण्यासाठी भरपूर परिश्रम करावे लागले. हार्दिक पांड्याने 18 बॉलमध्ये नाबाद 23 तर पोलार्डने 12 चेंडूंमध्ये 13 रन्स केल्या.

रोहित शर्माने यापूर्वी बंगळुरूविरोधात 48 आणि राजस्थान रॉयल्सच्या विरोधात 47 रन्स केल्या होत्या.

तुफान कृणाल पांड्या

या सामन्यात कृणाल पांड्याने जबरदस्त बॉलिंग केली. लसिथ मलिंगाने 37 रन्सच्या बदल्यात 4 विकेट घेतल्या असल्या तरी कृणालने मधल्या फळीतल्या अंबाती रायडू आणि केदार जाधवला बाद करून चेन्नईचं कंबरडं मोडलं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा कृणाल पांड्या

अंबाती रायडू आपलं खातंही उघडू शकला नाही. केदार जाधव केवळ 6 रन्स करू शकला. कृणालने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये केवल 7 रन्स देऊन 2 विकेट घेतल्या. शुक्रवारी विजय मिळाल्यामुळे मुंबई इंडियन्सने सूटकेचा निःश्वासही सोडला.

आता मुंबई इंडियन्स 11 सामॊन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवून 14 अंकांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. चेन्नईचा काल पराभव झाला असला तरी 12 सामन्यांमध्ये 8 विजय व 16 अंकांसह तो संघ सर्वात वरच्या स्थानावर आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)