लोकसभा निवडणूक 2019: मी जेव्हा हिंदुत्ववादी सैनिकांना भेटतो तेव्हा...

शरद शर्मा Image copyright Mansi Thapliyal

जेव्हा नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेवर आले तेव्हापासून हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना मोठ्या प्रमाणात वाढीस लागली. मोदींच्या सध्याच्या प्रचाराचाही तो केंद्रबिंदू आहे. बीबीसीचे प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांनी अशाच एका हिंदू सैनिकाची भेट घेतली आणि भारतात अति उजव्या विचारसरणीच्या विस्ताराचं कारण समजून घेतलं.

शरद शर्मा अयोध्येत राहतात. या शहरातील बाबरी मशीद जेव्हा पाडण्यात आली तेव्हा ते फक्त वीस वर्षांचे होते. याच घटनेनंतर भारतात मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या होत्या.

या घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. काही तरूण त्या उद्धवस्त झालेल्या इमारतीसमोर भगवे झेंडे घेऊन उभे होते. तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने तिथल्या स्थितीचं वर्णन करताना सांगितलं, "त्या ढिगाऱ्यावर लाल रंगाची धूळ साचली होती. हिंदू सहनशील आहे या समजुतीचे अवशेष उरले होते." या घटना घडल्यानंतर झालेल्या दंगलीनंतर 2000 लोकांचा मृत्यू झाला होता.

"मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. शहरात लोक सैरावैरा धावत असल्याचं मला आठवतं. ते जय श्रीरामच्या घोषणा देत होते." शर्मा मला सांगत होते. मी नुकतीच त्यांची अयोध्येत भेट घेतली.

मंदिरांच्या या शहरात ते लहानाचे मोठे झाले. धार्मिक संघर्षाच्या अनेक कहाण्या त्यांनी ऐकल्या. गेल्या शतकापासून हिंदू आणि मुस्लीम यांच्यात जागेवरून वाद सुरू आहे.

त्याच वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी बजरंग दलात प्रवेश केला होता. बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधावं यासाठी बजरंग दल सुरुवातीपासून आग्रही आहे. ही संघ परिवारशी निगडीत संघटना आहे. हिंदू समाजाचे रक्षणकर्ते अशी बिरुदावली ही संघटना मिरवते.

Image copyright Getty Images

ऑस्ट्रेलियन मिशनरी आणि त्यांच्या दोन बालकांना मारण्याचा या संघटनेवर आरोप झाला. तसंच चर्चवर हल्ला करणं, मुस्लिमांचे धर्मांतर करणं अशा कारवाया करण्याचे आरोप त्यांच्यावर झाले. अमेरिकन राजकीय शास्त्रज्ञ पॉल ब्रॉस म्हणतात, "हिंदू धर्माचं रक्षण करणं हे संतापजनक आहेच पण नाझींइतकं वाईटही नाही."

"बजरंग दलात मी बैठका घ्यायचो आणि काही संघटनात्मक कामं करायचो. बस्स इतकंच" शर्मा पुढे सांगतात.

चार वर्षांनंतर 1996 मध्ये त्यांनी विश्व हिंदू परिषदेत प्रवेश केला. ही संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कट्टरवादी संघटना आहे असं वर्णन राजकीय शास्त्रज्ञ मंजरी काटजू करतात.

दोन वर्षांनंतर शर्मा यांना प्रसारमाध्यमं हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली तसंच त्यांची संघटनेचा प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. मंदिराच्या प्रकरणात प्रसारमाध्यमांना रस येऊ लागला. त्यांच्या मते हल्ली ते फक्त स्थानिक पत्रकारांशीच बोलतात.

"आम्ही फक्त मंदिरासाठीच संघर्ष करत नाही. आम्ही शाळा, औषधालय चालवतो. देशभरात आदिवासी समुदायासाठीही काम करतो. आम्ही खूप वेगवेगळी कामं करतो." ते पुढे सांगत होते.

त्यांच्या सुरुवातीच्या काळात शर्मा यांचा बराचसा काळ वडिलांबरोबर प्रवास करण्यात गेला. ते वकील होते आणि वर्तमानपत्रात स्तंभलेखन करायचे. त्यांचे आजोबा इंजिनिअर होते. आणि अयोध्येत सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करायचे.

जेव्हा ते विद्यार्थीदशेत होते, तेव्हा ते स्थानिक शाखेत जात असत. तिथे राष्ट्रवाद, समाजशास्त्र, नैतिकता आणि इतिहासाचे धडे दिले जात असत. "एका संध्याकाळी शरयू नदी किनारी मी काही मुलांना हातात हात घेऊन कविता म्हणताना पाहिले. ते शाखेतले विद्यार्थी होते. अशा प्रकारे आम्ही इथे बऱ्याच गोष्टी शिकलो," शर्मा म्हणाले.

ते या शहरात लहानाचे मोठे झाले. आता या शहरात आता भेदभाव, तक्रार यांचं राजकारण खेळलं जातं.

Image copyright Mansi Thapliyal

1989 मध्ये जेव्हा हिंदू राष्ट्रवाद्यांनी जिथे बाबरी मशीद होती तिथे राम मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात मुस्लीम गटांनी निदर्शनं केली. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने मंदिरापर्यंत एक रॅलीही काढली. निरीक्षकांच्या मते हा दोन्ही बाजूंनी फूट पाडण्याचा कट होता.

त्याचवर्षी काही हिंदू गटांनी राम असं लिहिलेल्या विटा गोळा करण्याचा कार्यक्रम आखला. या विटा अयोध्येला घेऊन जाण्याचं नियोजित होतं. मंदिर उभारणीला पाठिंबा देण्यासाठी तिथे काही धार्मिक नेते आणि कारसेवक आले.

वादग्रस्त जागेवरून अनेक वाद झाले. विश्व हिंदू परिषद ज्या इतिहासाचा संदर्भ देतं त्याच्या मते 1,76,000 हिंदूंना मंदिराचं रक्षण करता करता जीव गमवावा लागला. " हा आकडा अनाकलनीय आहे आणि त्याला काही ठोस पुरावे नाहीत. मात्र या आधारावर विंहिंपने इतिहासाला फुटकळ वळण देण्याचा प्रयत्न केला." असं Ayodhya: City of Faith, City of Discord या पुस्तकाचे लेखक वलय सिंह म्हणाले.

Image copyright Getty Images

शर्मा म्हणतात की, तो खूप कठीण काळ होता.

"मी संतमहंतांची भाषणं ऐकली आणि मशिदीबद्दलच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा एकाच वेळी मला प्रेरणाही मिळाली आणि प्रचंड संतापही वाटला. ऐतिहासिक चूक दुरुस्त केलीच पाहिजे, असं मला वाटलं. देशभरातून इथे येणाऱ्या कारसेवकांना अन्न आणि पाणी देण्यासाठी आम्ही रस्त्यांवर उभे राहायला लागलो."

पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले होते, तसंच जागीच गोळ्या घालण्याचेही आदेश आले होते. जमावबंदीचे आदेश झुगारल्याबद्दल 1990मध्ये पोलिसांनी कारसेवकांवर गोळीबार केला. यात काही जण ठार झाले आणि परिस्थिती चिघळली.

"आमच्यासाठी ती घटना म्हणजे सहनशक्तीची परिसीमा होती. त्या निष्पाप श्रद्धाळू लोकांना मारलं, यावर माझा विश्वासच बसत नव्हता," शर्मा सांगतात.

"आमच्या कारसेवकांच्या हत्येची प्रतिक्रिया दोन वर्षांनी मशिदीच्या पतनाद्वारे उमटली."

हिंदीत पदव्युत्तर शिक्षण घेतलेले शर्मा व्यक्तिगत आयुष्यात आपला विश्वास बसणार नाही, एवढे नम्र आणि साधे आहेत. त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत. त्या समाजसेवाही करतात. त्यांचा मुलगा अयोध्येपासून 135 किलोमीटर अंतरावरच्या लखनऊमध्ये वकिलीचं शिक्षण घेत आहे. त्यांच्या भावाचा गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. ते सांगतात की, त्यांचे काही मुस्लिम मित्र आहेत आणि त्यांनाही 'मंदिर बांधलेलं हवं आहे'.

शर्मा यांचं बातम्यांवर बारीक लक्ष असतं. ते म्हणतात की, आपल्या सहकाऱ्यांबरोबर आणि पत्रकारांबरोबर त्या बातम्यांची चर्चा करणं हा त्यांचा छंद आहे.

त्यांच्या ट्विटर अकाउंटवरची त्यांची ट्वीट्स त्यांच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा जास्त जहाल आहेत. 'देशद्रोह्यां'विरोधात ते ठाम भूमिका घेतात आणि म्हणतात की, ही निवडणूक म्हणजे 'देशभक्त आणि देशद्रोही यांच्यातील लढाई' आहे. नेमकी हीच भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात मांडली आहे. त्यांच्या व्हॉट्सअॅपवरचा त्यांचा प्रोफाईल फोटोही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरचा आहे.

नव्याने डोकं वर काढलेल्या हिंदू अस्मितेच्या केंद्रस्थानी आपण नाही, हे सत्य शर्मा यांना डाचत नाही. एक सच्चा सैनिक राहण्याबद्दल ते आनंदी आहेत आणि संयमाने मंदिर बांधलं जाण्याची ते वाट बघत आहेत. त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून अगदी थोड्याच अंतरावर एका कार्यशाळेत रामनाम लिहिलेल्या साडेतीन लाख विटा आणि चुन्याचे खांब पडून आहेत. हे सगळं सामान मंदिराच्या बांधणीसाठी वापरलं जाणार आहे.

Image copyright Mansi Thapliyal
प्रतिमा मथळा शरद शर्मा एका हिंदुत्ववादी संघटनेशी निगडीत आहेत.

अजून मंदिर बांधलं गेलं नाही, त्याबद्दल त्रागा होत नाही का, असं मी त्यांना विचारलं. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ या जागेच्या मुद्द्यावर भारताच्या विविध न्यायालयांमध्ये वाद सुरू आहे. या वादावर काही तोडगा निघेल, असं नजीकच्या भविष्यात तरी दिसत नाही.

"स्वातंत्र्यासाठी भारताने ब्रिटिशांशी जवळपास 100 वर्षं लढा दिला. बाबरी मशीद पडून फक्त 26 वर्षं झाली आहेत. त्या घटनेने आमच्या धार्मिक गुलामगिरीचा अंत झाला आहे. मंदिर बांधलं जाणारच. आम्ही वाट पाहू. लोक आमच्याबरोबर आहेत."

"कदाचित पुढली पिढी मंदिर बांधेल, कोणास ठाऊक!"

मंदिरावरून झालेल्या दंगलींमध्ये आणि हिंसाचारात जीव गमावलेल्या लोकांचं काय? विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यापैकी बहुतांश घटना घडवून आणल्या होत्या.

"पूर्वी कधी हल्ले झाले असतील, तर ते इतिहासातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी झाले असतील. या चुका दुरुस्त झाल्यानंतर आपण सगळेच एकत्र राहू शकतो."

Image copyright Mansi Thalpiyal

अल्पसंख्याकांविरोधात झालेल्या हल्ल्यांमागे विश्व हिंदू परिषदेचा हात होता, हा दावा शर्मा फेटाळतात.

"हिंदू कधीच दंगेखोर असू शकत नाहीत. हिंदू दहशतवाद असं काहीच अस्तित्त्वात नाही. आम्ही कधीच आक्रमण करत नाही. आमची देवळं फोडली आणि गायी कापल्या, तर मात्र आम्ही प्रतिकार करू आणि उत्तर देऊ. आम्ही संख्येने वरचढ असू, तर आम्ही नक्कीच शत्रुला दंड देऊ," ते सांगतात.

"आपण माणूस आहोत. गोष्टी घडत असतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)