IPL 2019 - RR v SRH: राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादवर विजय, धोनीची चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये

चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद Image copyright AFP
प्रतिमा मथळा महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफ प्रवेश पक्का झाला आहे.

दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादवर 7 विकेट्सनी विजय मिळवला. हैदराबादचा पराभव झाल्याने चेन्नई सुपर किंग्सने औपचारिकरीत्या प्लेऑफ अर्थात बाद फेरीत प्रवेश केला आहे.

चेन्नई गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यांचा बाद फेरीतला प्रवेश बऱ्यापैकी पक्का होता. मात्र प्रत्येक मॅचगणिक बदलत्या समीकरणांमुळे औपचारिकदृष्ट्या चेन्नईचा संघ बाद फेरीत पोहोचला नव्हता.

हैदराबादचा पराभव होताच चेन्नईचं बाद फेरीतलं स्थान पक्कं झालं आहे. आतापर्यंत खेळलेल्या सर्व हंगामांमध्ये चेन्नईने प्लेऑफ गाठण्याची परंपरा कायम राखली. मधली दोन वर्षं संघावर बंदी आली होती, तीच अपवाद.

राजस्थान आणि हैदराबाद दोन्ही संघांचे महत्त्वपूर्ण खेळाडू वर्ल्डकपपूर्वी आयोजित वनडे मालिकेत खेळण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतले. यामुळे दोन्ही संघांचं आव्हान कमकुवत झालं आहे.

राजस्थानचे बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर तर सनरायझर्सचा जॉनी बेअरस्टो मायदेशी परतले.

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 160 धावांची मजल मारली. मनीष पांडेने 36 चेंडूत 9 चौकारांसह 61 धावांची खेळी केली. डेव्हिड वॉर्नर (37) धावांचा अपवाद वगळता मनीषला अन्य फलंदाजांची साथ मिळू शकली नाही.

राजस्थानतर्फे श्रेयस गोपाळ, वरुण आरोन, जयदेव उनाडकत आणि ओशाने थॉमस यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि बेन स्टोक्स

बटलर मायदेशी परतल्याने संधी मिळालेल्या इंग्लंडच्याच लिआम लिव्हिंगस्टोन आणि अजिंक्य रहाणे जोडीने 78 धावांची खणखणीत सलामी दिली. लिव्हिंगस्टोनने 39 तर रहाणेने 44 धावांची खेळी केली. संजू सॅमसनने नाबाद 48 धावांची खेळी करत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

जयदेव उनाडकतला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)