रामदास आठवलेंचा प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीवर आक्षेप #पाचमोठ्याबातम्या

रामदास आठवले आणि प्रज्ञासिंह Image copyright Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :

1) रामदास आठवलेंचा प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीला आक्षेप

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या भाजपच्या निर्णय घेतला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ठाकूर यांचे नाव आरोपी म्हणून आले आहे आणि हेमंत करकरे यांच्याकडे त्यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा होता, असे ठाकूर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आठवले म्हणाले.

RPIने लोकसभा निवडणुकांसाठी मध्य प्रदेशात जबलपूर, सतना, रतलाम, मुरेना व सिधी या ठिकाणांहून उमेदवार उभे केले आहेत. तर उरलेल्या 24 मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा असल्याचे आठवले यांनी सांगितले, असंही या बातमीत म्हटलं आहे.

2) मतदानासाठी मुंबईच्या कामगारांना भरपगारी सुट्टी

मुंबईत सोमवारी होत असलेल्या निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश कामगार विभागाने दिले आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले आहे.

Image copyright Getty Images

मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकाने वगळून इतर सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळात बंद ठेवण्यात यावी असा 3 एप्रिलला अधिसूचना काढण्यात आली आहे.

तसेच मतदानाच्या दिवशी बंद राहिलेल्या दुकाने/आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये, असेही या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

3) श्रीलंका बाँबस्फोटाचं केरळ कनेक्शन, दोघेजण NIAच्या ताब्यात

गेल्या आठवड्यात ईस्टर संडेला झालेल्या साखळी बाँबस्फोटाचे धागेदोरे भारतातही सापडले आहेत. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (NIA) केरळमूधन दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. दैनिक सकाळने ही बातमी दिली.

अबू बाकर सिद्दकी आणि अहमद अराफथ अशी त्या तरुणांची नावे आहेत. दोघांकडून मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. सध्या NIAच्या मुख्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे.

केरळमधल्या कासरगोड जिह्ल्यातून राष्ट्रीय सुरक्षा पथकाने रविवारी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांचा संबंध श्रीलंका बाँबस्फोटातील सुत्रधार जहरान हाशीम यांच्याशी असल्याचं या बातमी म्हटलं आहे.

4) देशात पहिल्यांदाच मसाला पान खाऊन थुंकल्यामुळे दंड

अहमदाबादमधल्या नरोडा भागात मसाला पान खाऊन थुंकल्यामुळं महापालिकेनं पहिल्यांदाच 100 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. जागरणने ही बातमी दिली आहे

वाहतुकीचे नियम तोडल्यावरून आतापर्यंत अनेकजणांना दंड आकारण्यात आला आहे. पण मसाला पान खाऊन थुंकल्यामुळं देशात पहिल्यांदाच असा दंड आकरण्यात आला आहे.

Image copyright Getty Images

शहराच्या स्वच्छतेसाठी हे पाऊल उचलावं लागलं आहे असं अहमदाबाद महानगरपालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

मोबाईल फोनवर बोलत असताना एका व्यक्ती रस्त्यावर मसाला पान खाऊन थुंकला तेव्हा ही कारवाई केली आहे,असंही या बातमी म्हटलं आहे.

5) मेळघाटात वर्षभरात 247 बालमृत्यू

मेळघाटातल्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात वर्षभरात सहा वर्षांखालील तब्बल 247 बालकं दगावली आहेत. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

कुपोषण आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू थांबत नसल्याने निर्मूलनासाठी राबवलेल्या नवसंजीवनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Image copyright Hindustan Times
प्रतिमा मथळा प्रतिकात्मक

अमरावती जिल्ह्यातल्या 12 तालुक्यांमध्ये एका वर्षांत 141 बालमृत्यू झाल्याची नोंद आहे.

एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीत धारणी तालुक्यात 170, तर चिखलदरामध्ये 77 बालके विविध आजारांनी दगावल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. यातील बहुतांश बालके कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कमी वजनाची बालके काही दिवसांतच आणखी खंगू लागतात, असे वारंवार निदर्शनास आले आहे. गेल्या काही वर्षांत मेळघाटातील बालमृत्यूंचे प्रमाण कमी झाले असले, तरी जिल्ह्याच्या इतर भागांच्या तुलनेत हे प्रमाण लक्षणीय आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)