या 8 कारणांमुळे यंदाच्या IPL हंगामामधली चमक हरवणार

डेव्हिड वॉर्नर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डेव्हिड वॉर्नर

वर्ल्डकपच्या तयारीसाठी आयोजित शिबिरांमुळे तसंच एकदिवसीय मालिकांमुळे अनेक विदेशी खेळाडू IPL स्पर्धा सोडून मायदेशी परतत आहेत. महत्त्वपूर्ण खेळाडू परतत असल्याने बहुतांश संघांचं आव्हान कमकुवत होणार आहे.

1. वॉर्नर-बेअरस्टो माघारी; हैदराबादला दणका

डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो ही बिनीची जोडी मायदेशी परतल्याने सनरायझर्स हैदराबादच्या चिंता वाढल्या आहेत. बॉल टेंपरिंग प्रकरणी बंदीची कारवाई झाल्याने वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता.

आठ अर्धशतकांसह वॉर्नरने खेळणं विसरलेलो नाही हे सिद्ध केलं. 12 सामन्यात वॉर्नरने 69.20 च्या सरासरीने तब्बल 692 धावा केल्या. वॉर्नर-बेअरस्टो जोडीने सलामीला एकत्र खेळताना 733 धावा केल्या आहेत.

पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या बेअरस्टोने 10 सामन्यात 55.62च्या सरासरीने 445 धावा केल्या. विकेटकीपिंगही करणाऱ्या बेअरस्टोने 9 झेल आणि 2 स्टंपिंगही करत आपली उपयुक्तता सिद्ध केली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जॉनी बेअरस्टो

वॉर्नर-बेअरस्टोच्या अनुपस्थितीत केन विल्यमसन आणि मार्टिन गप्तील यांच्यावरील जबाबदारी वाढणार आहे.

अफगाणिस्तानचे रशीद खान आणि मोहम्मद नबी स्कॉटलंड आणि आयर्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी रवाना होणार असल्याने हैदराबादचं आव्हान आणखी कमकुवत होणार आहे.

बांगलादेशचा शकीब अल हसनने वर्ल्डकप शिबिराऐवजी IPLला प्राधान्य दिलं आहे.

2. स्मिथ, बटलर, स्टोक्स, आर्चर- राजस्थानची चौकडी मायदेशी

भरवशाचा सलामीवीर आणि विकेटकीपर जोस बटलर, अष्टपैलू बेन स्टोक्स, चांगलं प्रदर्शन करणारा गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्यासह स्टीव्हन स्मिथ माघारी परतल्याने राजस्थान रॉयल्सचं आव्हान कमकुवत होणार आहे. वर्ल्डकपसाठी खेळाडू मायदेशी जाण्याचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे.

बटलरने 8 सामन्यात 38.7च्या सरासरीने 311 धावा केल्या. वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडची आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध मालिका आहे. यामुळे इंग्लंडचे खेळाडू परतत आहेत. दरम्यान पत्नी गरोदर असल्याने बटलर काही सामने आधीच इंग्लंडला परतला. बटलर आणि त्याच्या पत्नीला कन्यारत्न झालं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जोस बटलर परतल्याने राजस्थान रॉयल्सचं नुकसान झालं आहे.

बेन स्टोक्सला यंदाच्या हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र त्याचा अनुभव राजस्थानसाठी मोलाचा ठरू शकला असता. स्टोक्स मायदेशी परतल्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर नुकसान होणार आहे.

यंदाच्या हंगामात जोफ्रा आर्चरने 11 विकेट्स घेत राजस्थानचा प्रमुख गोलंदाज असल्याचं सिद्ध केलं. तो मायदेशी रवाना झाल्याने राजस्थान संघाच्या चिंता वाढल्या आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जोफ्रा आर्चर मायदेशी परतला आहे.

अजिंक्य रहाणेकडून संघाची धुरा हाती घेतलेला स्टीव्हन स्मिथ वर्ल्डकप शिबिरासाठी ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. फलंदाजीसह स्मिथच्या नेतृत्वाची उणीव राजस्थानला भासणार आहे.

दरम्यान ओशाने थॉमस, अश्टन टर्नर, इश सोधी हे संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असल्याने राजस्थानला आधार आहे.

3. चेन्नई डू प्लेसिस आणि ताहीरला गमावणार?

भरवशाचा फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डू प्लेसिस आणि अफलातून फॉर्मात असणारा फिरकीपटू इम्रान ताहीर प्लेऑफपूर्वी मायदेशी परतण्याची शक्यता असल्याने चेन्नईच्या चिंतेत वाढ झाली आहे.

डू प्लेसिस यंदा सगळे सामने खेळलेला नाही. महत्त्वाच्या लढतीत फॅफची उपस्थिती संघाला बळकट करू शकते. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना परतण्यासाठीच्या तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र विविध संघांकडून खेळणारे आफ्रिकेचे खेळाडू प्लेऑफपूर्वी मायदेशी परतण्याची शक्यता आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इम्रान ताहीर आणि फॅफ डू प्लेसिस मायदेशी परतल्यास चेन्नईला फटका बसू शकतो.

इम्रान ताहीर चेन्नईसाठी हुकूमी एक्का आहे. यंदा त्याने 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचं मायदेशी परतणं चेन्नईसाठी नुकसानदायी आहे.

इंग्लंडचा सॅम बिलिंग्ज आधीच मायदेशी परतला आहे. सॅम आक्रमक फलंदाज आहे आणि तो विकेटकीपिंगही करतो.

दरम्यान ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, स्कॉट कुलेजिन, मिचेल सँटनर सर्व सामने खेळणं चेन्नईच्या पथ्यावर पडू शकतं.

4. दिल्लीचा वेग मंदावणार

घोटीव यॉर्कर आणि भन्नाट वेग यासह भल्याभल्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा कागिसो रबाडा प्लेऑफपूर्वी मायदेशी परतल्यास दिल्ली कॅपिटल्सचा वेग मंदावू शकतो.

रबाडा यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 25 विकेट्ससह रबाडा परपल कॅपचा मानकरी आहे. मात्र तो मायदेशी परतला तर दिल्लीकडे ट्रेंट बोल्टचा पर्याय आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कागिसो रबाडा मायदेशी परतल्यास दिल्ली कॅपिटल्सला फटका बसू शकतो.

कॉलिन इन्ग्राम, संदीप लमीचाने, कॉलिन मुन्रो, ख्रिस मॉरिस, किमो पॉल, शेरफेन रुदरफोर्ड हे अन्य विदेशी खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असल्याने दिल्लीला चिंता नाही. सात वर्षांनंतर प्लेऑफमध्ये स्थान पटकावणाऱ्या दिल्लीला रबाडाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवणार आहे.

5. पंजाब मिलरला गमावणार

अनेक वर्ष किंग्ज इलेव्हनच्या ताफ्यात असणारा डेव्हिड मिलर वर्ल्डकप तयारीसाठी मायदेशी परतणार आहे. यंदाच्या हंगामात मिलरला सूर गवसलेला नाही. त्यामुळे पंजाबचं मोठं नुकसान होणार नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डेव्हिड मिलर

फिरकीपटू मुजीब उल रहमान आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी रवाना होईल.

सॅम करन, ख्रिस गेल, मॉइझेस हेन्रिक्स, अँड्यू टाय, हार्डुस व्हिलऑन हे अन्य विदेशी खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध आहेत. गेल वर्ल्डकपसाठीच्या वेस्ट इंडिज संघाचा भाग आहे. मात्र तरीही त्याला संपूर्ण हंगाम खेळण्याची अनुमती देण्यात येणार आहे.

6. डेन्ली परतणार, कोलकाताचं मर्यादित नुकसान

इंग्लंड वर्ल्डकप संघात निवड झाल्यामुळे जो डेन्ली मायदेशी परतणार आहे. डेन्लीला केवळ एका सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जो डेन्ली

अन्य खेळाडूंपैकी आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, हॅरी गुर्ने, लॉकी फर्ग्युसन, ख्रिस लिन, सुनील नरिन यापैकी कोणीही वर्ल्डकपसाठी रिंगणात नसल्याने कोलकाताला चिंता नाही.

7. क्विंटन करणार मुंबईचं वजन कमी

मुंबईने यंदाच्या हंगामासाठी विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डी कॉकला ताफ्यात समाविष्ट केलं. क्विंटनने 12 सामन्यात 393 धावा केल्या आहेत.

रोहित शर्माच्या बरोबरीने सलामीला येत क्विंटनने मुंबईला सातत्याने चांगली सुरुवात करून दिली आहे. मात्र वर्ल्डकप तयारीसाठी त्याला मायदेशी परतावे लागेल. हा मुंबईलाठी मोठा फटका आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा क्विंटन डी कॉक

गोलंदाजीत उंचपुरा जेसन बेहनड्रॉफ मायदेशी परतणार आहे. मुंबईने यंदाच्या हंगामात त्याला एकाही सामन्यात खेळवलेलं नाही.

अन्य खेळाडूंपैकी बेन कटिंग, ब्युऑन हेन्ड्रिंक्स, इव्हिन लुईस, मिचेल मक्लेघान, लसिथ मलिंगा, कायरेन पोलार्ड हे संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध आहेत.

8. प्लेऑफच्या आशा मावळल्याने नुकसान नाही

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा प्लेऑफचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे मोईन अली आणि मार्कस स्टोनिअस हे अष्टपैलू खेळाडू मायदेशी परतत असूनही बेंगळुरूला फटका बसणार नाही.

मोईन अली जबरदस्त फॉर्मात आहे. मोईनने 220 धावा केल्या आहेत तसंच 6 विकेट्सही घेतल्या आहेत.

स्टोनिअसने फलंदाजीत आणि गोलंदाजीत चमक दाखवली आहे मात्र बेंगळुरूच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या आहेत.

अन्य विदेशी खेळाडूंपैकी कॉलिन डी ग्राँडहोम, एबी डी'व्हिलियर्स, शिमोरन हेटमेयर, हेनरिच लासेन, टीम साऊदी उर्वरित सामने खेळू शकतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)