ईव्हीएमबाबत शरद पवारांनी केलेलं 'ते' वक्तव्यं बारामतीतल्या पराभवाच्या भीतीतून?

शरद पवार Image copyright Getty Images

बारामतीमध्ये जर धक्कादायक निकाल लागला तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वासच उडेल, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केल्यानं अनेक चर्चांना तोंड फुटलं आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकतो, हे पुन्हा एकदा म्हटलंय.

अर्थात, शरद पवारांचं वक्तव्य हे ईव्हीएमबद्दलच्या अविश्वासातून आलंय की पराभवाच्या धास्तीनं असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

"ईव्हीएम चीपमध्ये बाहेरून छेडछाड केली जाऊ शकते. गुजरातमध्ये अशा घटना झाल्याची माहिती मला एकजणानं दिली होती. मध्य प्रदेशमध्येही ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचं मी वाचलं होतं. अर्थात, याबद्दल खात्रीलायक माहिती नाही," असं शरद पवार यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.

बारामतीची लढत सुप्रिया सुळेंसाठी अवघड जाणार असल्याचं भाजपकडून वारंवार म्हटलं जात होतं. भाजपच्या याच आत्मविश्वासाबद्दल बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, "ज्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही, तेही बारामतीची जागा जिंकणार असल्याचं धाडसानं सांगत आहेत. त्यामुळेच तंत्रज्ञानाच्या मदतीनं काही फेरफार केला आहे का, अशी शंका अनेकांच्या मनात येत आहे."

शरद पवार यांच्या या वक्तव्याचा रोख भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्याकडे होता. कांचन कुल या रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बीबीसी मराठीनं कांचन कुल यांच्याशी संपर्क साधला.

23 मे च्या दिवशी गोष्टी स्पष्ट होतील

बारामतीमध्ये काय होईल हे 23 मे च्या दिवशी समजेलच. बारामतीमध्ये भाजप जिंकणार असल्याचा अंदाज शरद पवारांना आला असल्यानंच त्यांनी हे वक्तव्यं केलं, अशी प्रतिक्रिया कांचन कुल यांनी दिली.

कधीही निवडणूक न जिंकणारे बारामतीची जागा जिंकण्याचा दावा करत आहेत, या शरद पवारांच्या विधानावर बोलताना कांचन कुल यांनी म्हटलं, "सुप्रिया सुळे जेव्हा पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा त्यांनी कुठली निवडणूक लढवली नव्हती. मावळमधून पार्थ पवार उभे आहेत. त्यांनी पूर्वी कुठलीही निवडणूक लढवली नाहीये. तरीही ते जिंकतील असा विश्वास शरद पवारांना वाटतो. मग आम्हीही बारामतीच्या संदर्भात हा विश्वास दाखवत आहोत."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सुप्रिया सुळे-कांचन कुल

"मला लोकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे, की मी पहिल्यांदाच निवडणूक लढवतीये असं वाटतच नाहीये. आमदार सुभाष कुल यांच्या निधनानंतर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना रंजना कुल निवडून आल्या होत्या. आजपर्यंत बारामतीमध्ये केवळ एका तालुक्यापुरताच विकास झाला आहे. कुल कुटुंबियांनी केलेलं काम मोठं आहे," असंही कांचन कुल यांनी म्हटलं.

ईव्हीएम छेडछाड संदर्भात पवारांनी उपस्थित केलेल्या शंकेसंबंधी बोलण्यास मात्र कांचन कुल यांनी नकार दिला. 23 तारखेला गोष्टी स्पष्ट होतील, एवढंच त्यांनी म्हटलं.

ईव्हीएमबद्दल विरोधकांनी शंका घेणं ही काही नवीन गोष्ट नाहीये. शरद पवारांनी आपल्या हक्काच्या मतदारसंघातील विजयाबद्दल साशंकता व्यक्त केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विरोधकांचा आत्मविश्वास वाढलेला

"एवढ्या मोठ्या नेत्याकडून ईव्हीएममुळे पराभव होऊ शकतो हे विधान येणं गैर वाटतंय. त्यांचं हे विधान व्यंगात्मक असावं," असं मत ज्येष्ठ पत्रकार अभय खैरनार यांनी व्यक्त केलं.

"बारामती लोकसभा शरद पवारांचं होमग्राउंड आहे. त्यांचा तिथे चांगला संपर्क आहे. मात्र अलीकडे हे चित्र बदललं आहे. 2014 मध्ये सुप्रिया सुळे अगदी थोडक्या म्हणजे 69 हजार मतांच्या फरकानं जिंकून आल्या होत्या. एवढ्या कमी मतांनी निवडून आल्याने सुळेंना मतदार संघाकडे अधिक लक्ष द्यावं लागलं. पूर्वी विरोधकांना बारामती लोकसभा मतदारसंघातून योग्य उमेदवारही मिळायचे नाहीत. मात्र कांचन कुल यांच्या उमेदवारीमुळे विरोधक बारामतीतही आपण 'काँटे की टक्कर' देऊ शकतो, हे चित्र निर्माण करण्यात यशस्वी झाले" असं अभय खैरनार यांनी म्हटलं.

खैरनार यांनी सांगितलं, की पूर्वी शरद पवार, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे किंवा विलासराव देशमुख लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या मतदारसंघासाठी तडजोड करताना दिसायचे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारची कोणतीही तडजोड केली नसल्याचं चित्र आहे.

Image copyright Getty Images

बारामतीमध्ये कांचन कुल यांची उमेदवारी भाजपसाठी किती फायद्याची ठरू शकते याबद्दल बोलताना अभय खैरनार यांनी म्हटलं, की दौंडमध्ये कुल कुटुंबीय अनेक वर्षे सत्तेत आहे. शहरात येणाऱ्या खडकवासल्यामध्ये भाजपची बाजू वरचढ आहे. पुरंदर तालुक्यात शिवसेनेचे आमदार आहेत. कुल यांना त्यांचीही मदत होऊ शकते. इंदापूर विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील की राष्ट्रवादीचे मामा भरणे यांच्यामध्ये वाद आहे. हे सर्व चित्र पाहता विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे.

शरद पवारांना निकालाची धाकधूक

ज्येष्ठ पत्रकार किरण तारे यांनीही या निवडणुकीत विरोधकांचं पारडं नेहमीपेक्षा जड असल्याचं मत व्यक्त केलं.

"शरद पवारांच्या तोंडून बारामतीमध्ये आम्ही हरलो तर असं वक्तव्यं येणं हेच खूप सूचक आहे. यापूर्वी पवारांनी कधीही बारामतीच्या निकालाबद्दल चिंता व्यक्त केली नव्हती. पवारांच्या या विधानातून त्यांच्या मनात विजयाबद्दल धाकधूक असल्याचं स्पष्ट होतं," असं किरण तारे यांनी म्हटलं.

किरण तारे यांनी म्हटलं, की ईव्हीएमवर शंका घेतल्यानं निवडणुकीचा निकाल प्रतिकूल लागला तर आम्ही आधीच ईव्हीएममध्ये गडबड असल्याचं म्हटलं होतं असा युक्तिवाद करता येऊ शकतो. शरद पवारांच्या ईव्हीएमसंदर्भातल्या वक्तव्याकडे यादृष्टिनं पाहणंही गरजेचं आहे.

Image copyright Getty Images

"गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचं मताधिक्य कमी झालं होतं. यावेळेस कांचन कुल यांच्या उमेदवारीनं प्रचारात रंगत आली होती. बारामती मतदारसंघातील काही ठिकाणी कांचन कुल यांना पाठिंबा मिळू शकतो. उदाहरणार्थ खडकवासला. त्यामुळेच शरद पवार हे निकालाबद्दल दबावाखाली असू शकतात," असं किरण तारे यांनी म्हटलं.

लोकांच्या मनातील शंका दूर होणं गरजेचं

शरद पवारांचं वक्तव्य हे पराभवाच्या भीतीतून आलं आहे, या विरोधकांच्या टीकेबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं, की कोण जिंकणार हे २३ मेच्या दिवशी सर्वांनाच कळेल. बारामतीची आमची जागा हमखास येणार.

ईव्हीएमबद्दल नवाब मलिक यांनीही शंका व्यक्त केली. "व्हीव्हीपॅट स्लीपची मोजदाद व्हावी यासाठी निवडणूक आयोग मार्गदर्शक तत्त्वं तयार करत नाहीये. ईव्हीएमच्या संदर्भात अशी मार्गदर्शक तत्त्वं बनविण्याची मागणी होत आहे. लोकांच्या मनात शंका असेल तर ती दूर करण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे. पण निवडणूक आयोग ते करत नाहीये," असं नवाब मलिक यांनी म्हटलं.

हे वाचलं का?

(पाहा 'बीबीसी विश्व' - मराठीतलं पहिलं डिजिटल बुलेटिन सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप, तसंच आमच्या फेसबुक, यूट्यूब, ट्विटर अकाउंट्सवर)