महेंद्रसिंग धोनी फिट, चेन्नई सुपर किंग्स हिट; दिल्ली कॅपिटल्स पराभूत

धोनी, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स Image copyright AFP
प्रतिमा मथळा महेंद्रसिंग धोनी

संपूर्ण शंभर टक्के फिट नसतानाही खेळणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 22 चेंडूत 44 धावांच्या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्सवर 80 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. शेन वॉटसन भोपळाही न फोडता तंबूत परतला. फॅफ डू प्लेसिस आणि सुरेश रैना यांनी डाव सावरला. डू प्लेसिस 39 धावांवर बाद झाला.

सुरेश रैनाने 37 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकारासह 59 धावांची खेळी केली. रैना बाद झाल्यावर धोनीने सामन्याची सूत्रं हाती घेतली. धोनीने 4 चौकार आणि 3 षटकारांसह 44 धावांची खेळी सजवली.

रवींद्र जडेजाने 10 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 25 धावांची उपयुक्त खेळी केली. दिल्लीकडून जगदीश सुचिथने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इम्रान ताहीर

प्रत्युत्तरादाखल खेळताना इम्रान ताहीर आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी गुडघे टाकले.

ताहीरने 12 धावांत 4 तर जडेजाने 9 धावांत 3 विकेट्स मिळवल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 44 धावांची खेळी केली.

दिल्लीच्या नऊ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. धोनीने श्रेयस अय्यर आणि ख्रिस मॉरिस यांनी वेगवान पद्धतीने स्टंपिंग केलं.

धोनीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. दिल्ली आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी याआधीच पात्र ठरले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)