बुरखाबंदी : शिवसेना आणि सामना यांची भूमिका सोयीस्करपणे बदलते का?

संजय राऊत, शिवसेना, बुरखा
प्रतिमा मथळा शिवसेना खासदार संजय राऊत

शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना वृत्तपत्राने बुरखाबंदीला समर्थन देणारी भूमिका घेतली. मात्र शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पुढे येत ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं म्हटलं आहे.

आतापर्यंत शिवसेनेनं वेळोवेळी सामनामधून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मग आता असं काय झालं की शिवसेनेनं ही अधिकृत भूमिका नसल्याचं म्हटलंय. शिवसेना अशी सोयीस्कर भूमिका का घेत आहे?

बुरख्यावर बंदी घालण्याच्या श्रीलंकेच्या निर्णयाला पाठिंबा देत भारतातही अशा स्वरुपाच्या निर्णयाची मागणी सामनाच्या महाराष्ट्रदिनी म्हणजे बुधवारी छापून आलेल्या अग्रलेखात मांडण्यात आली होती.

शिवसेनेची आणि सामनाची भूमिका ही वेगळी आहे असं याआधीही सांगण्यात आल्याचं ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य सांगतात.

"ही उद्धव यांची डबलनीती आहे. याआधीही अनेकदा असं घडलं आहे. लोकप्रिय किंवा महत्त्वाच्या मुद्यावर संजय राऊत एखादी भूमिका मांडतात. मच्छी खाण्याचा मुद्दा असो किंवा जैन मुनींचा विषय- राऊत यांची भूमिका शिवसेनेची नाही असं स्पष्ट करण्यात आलं होतं," असं ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी सांगितलं.

"दिलेला शब्द फिरवत नाही असं शिवसेनेबाबत सांगितलं जातं. मात्र उद्धव ठाकरेंनी गेल्या काही काळात शब्द फिरवला आहे. लोकप्रिय विषयावर मांडलेलं मत पक्षप्रतिमेला अंगलट ठरत असेल तर अन्य नेत्याद्वारे ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही अशी खेळी केली जाते. मात्र अशा मुद्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मौन बाळगून असतात," असंही त्यांनी सांगितलं.

"संजय राऊत हे शिवसेनेत सेकंड-इन-कमांड आहेत. ते राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, खासदार आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी फारकत घेत उपनेत्याने भूमिका मांडणं हे पक्षाची प्रतिमा आणि विश्वासार्हतेला तडा देण्यासारखं आहे," असं आचार्य म्हणाले.

आतापर्यंत बऱ्यापैकी, सामनानं मांडलेली भूमिका ही शिवसेनेची अधिकृत भूमिका मानली जाते. पण मग यापुढे आता सामनातून छापून येणाऱ्या अग्रलेखांमधली भूमिका अधिकृत नसणार का? किंवा त्यांच्याकडे मग लोकांनी शंकेच्या नजरेतून पाहावं का, असा प्रश्न बीबीसीनं शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांना विचारला.

त्यावेळी "एखाद्या अपवादामुळे असा नियम बनवण्याची गरज नाहीये. पक्षाची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सामनात काय लिहिलं आहे?

"फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहऱ्या झाकणाऱ्या व्यक्ती राष्ट्रीय किंवा सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरुपाचं कृत्य ठरेल, असं जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल श्रीसेना यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवलं. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न," अशा शब्दांत सामन्याच्या अग्रलेखात बुरखाबंदी संदर्भात भूमिका मांडण्यात आली होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उद्धव ठाकरे

यासंदर्भात शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी ट्वीट करून स्वतंत्र भूमिका मांडली. त्या म्हणतात, "शिवसेना पक्षाच्या भूमिका नेत्यांच्या बैठकीतून ठरत असतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्या अंतिमत: ठरतात. आजची भूमिका ना चर्चेतून आली ना आदेशातून. त्यामुळे कदाचित हे चालू घडामोडींवर वैयक्तिक मत असेल. ही शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका नाही."

नीलम गोऱ्हे यांच्या भूमिकेचा प्रियांका चतुर्वेदी यांनीही पुनरुच्चार केला.

संजय राऊतांकडून भूमिकेचं समर्थन

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून अग्रलेख लिहिण्यामागची भूमिका मांडली.

ते म्हणतात, "बुरखाबंदीच्या अग्रलेखाने ओवैसी यांनी इतके लाल हिरवे का व्हावे? शिवसेनाप्रमुख हीच भूमिका मांडत होते. श्रीलंकेतील दहशतवादी हल्ला आणि तेथील सरकारने घेतलेल्या भूमिकेचं हे विश्लेषण आहे. या भूमिकेत नवीन काय? महिला नेत्यांनी मुस्लीम महिलांचे दु:ख समजून घ्यावे."

"चॅनेलवर ज्या महिला बुरखाबंदी चुकीची असं बोलत आहेत त्या स्वत: बुरखा परिधान करत नाहीत. तुम्ही बुरखा का घालत नाही? तुम्ही सक्षम होतात म्हणून तुम्ही बुरख्याचा त्याग केला परंतु 90 टक्के मुस्लीम भगिनींचा आवाज दबलेल्या स्थितीत आहे. त्यांना सक्तीने बुरखा परिधान करावा लागतो, स्वेच्छेने नाही. या मुस्लीम भगिनींना घुसमटीतून मुक्त करा. त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या," असं त्यांनी पुढे लिहिलं आहे.

ते पुढे म्हणतात, "सामन्याच्या भूमिकेचे आभार मानणाऱ्या मुस्लीम भगिनींचे मी आभार मानतो. बुरख्याच्या कुप्रथेप्रकरणी आम्ही घेतलेल्या भूमिकेचं त्या महिलांनी समर्थन केलं आहे. गिरिराज सिंह, साध्वी प्रज्ञा आणि तस्लीमा नसरीन यांचेही मी आभार मानतो. बुरख्याची सक्ती बंद व्हायला हवी. नव्या रचनेत पारंपरिक कर्मठ विचारांना स्थान नाही."

संजय राऊत यांनी ट्वीट करून मांडलेल्या भूमिकेवर मात्र प्रतिक्रिया देण्यास नीलम गोऱ्हे यांनी नकार दिला आहे.

हे आचारसंहितेचं उल्लंघनः ओवैसी

Image copyright Getty Images

शिवसेनेच्या बुरखा बंदीच्या मागणीवर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी कडाडून टीका केली आहे. "सर्वोच्च न्यायालयाच्या यासंदर्भातल्या भूमिकेची शिवसेनेला बहुधा कल्पना नसावी, असा टोला ओवैसी यांनी लगावला आहे. "आपल्या आवडीनुसार आचरण करणं हा मुलभूत अधिकार प्रत्येकाला मिळालेला आहे. भारतात अनेक धर्म आहेत आणि आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य आहे. धर्माचं पालन न करण्याचं स्वातंत्र्यही आपल्याला आहे. शिवसेनेला कदाचित हे माहिती नसावं," असं ओवैसी यांनी सांगितलं.

शिवसेनेची ही भूमिका म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचा आरोपही ओवैसी यांनी केला आहे. "अशा विधानांमधून धार्मिक विद्वेष पसरवला जातो. हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे करत आहोत," असं ओवैसींनी म्हटलं.

शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावरही ओवैसींनी टीका केली. "जी व्यक्ती शहीदांबद्दल बेताल वक्तव्यं करू शकते, तिच्याकडून बुरखा बंदीसारख्या निर्णयाला समर्थन मिळणं स्वाभाविक आहे," असं ओवैसींनी म्हटलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)